"ज्या मोहमायेच्या त्यागाने विशिष्ट स्थळी पोहोचण्याच्या माणूस विचार करतो, धडपड करतो, याची सांग्रसंगीत तयारी तो अगोदरच करून ठेवतो. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, 'माझ्याच तिरडीस लागणारे शब्दफुलांचे हार मीच तयार करून ठेवले आहेत, तेही इतरांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी' हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे."
भाग -१
असं म्हणतात की अंतरात्मात ज्ञानाचा दिवा पेटला कि सायंकालीन धूसर पर्वात खोवलेली
साधीसुधी फुलेही या ज्योतीच्या प्रकाशाने उजळू लागतात तीच मुळी प्रकाशाशी कायमचे
नाते जॊडण्यासाठी! असे असताना त्याच प्रकाशाने वियोगाने कोमजणे हा फुलाचा
स्थायीभाव. पण धुसर प्रकाशाची आस प्राजक्ताला असतेच, नाही का? निसर्गाची किमयाच अशी की अशा धुसर सरमिसळीतून त्यानी आपले
वेगळेपण जपले आहे ते फुले आणि चांदण्या याना नवीन उमेद देण्यासाठी अर्थात हा केवळ
स्वप्नभास आहे असे कल्पिले तर माझ्या भावगर्भात उमलली आणि उमलण्याच्या भरात असलेली
ही काव्याची फुले मला एका वेगळ्या स्वप्नभासात अडकवू पहात आहेत असेच म्हटले पाहिजे.
माझे आकाश आणि त्याला गवसणी घालू पहाणारे
तारतम्याचे अनेक पक्षी असेच विहरत असताना मला जाणवले की यांचंही एक विलक्षण नाते
आहे. हे नाते मृगजळाच्या अंतरंगात दडी मारून बसलेले आहे की काय असे मला राहून
राहून वाटते. काळाशी अशी सुसंगत नाती जोडताना, भविष्याचा वेध घेताना आणि वर्तमानाचा आलेख मांडताना या
दोन्हींचा संबंध आहे, एवढंच नव्हे तर
भूतकाळाचे प्रतिबिंबच या दोहोंवर नजर ठेवून आहे याची सांप्रत जाणीव मला आहे. या
सर्वांची सांगड मी कुठल्या क्षणी घातली हे पूर्णांशाने जरी आठवत नसले तरी ज्या
दिनी या साऱ्या कोलाहलाचा मुहूर्त माझ्या अंतर्मनात झाला ती वेळ अशाच एका
गजबजलेल्या चांदण्याची असावी यात काही प्रत्यवाय नसावा. आज याच विविध पक्ष्यांची
स्वैर उड्डाणे पहाताना थोडेसे भावूक होणे साहजिकच!
माझ्या या भावगर्भ आकांताची सांगड दुर्बोधतेशी
घालीत तर कधी आलोचना करीत दुर्बोधतेच्या नवनवीन वळणांच्या जाणिवा करून देत असताना
सुबोध आणि साधी कविता, तिची परिमाणे या
विषयी साधक बाधक चर्चा होणे अपरिहार्य, पण माझा रस्ता मी निवडला नाहीच मुळी! मात्र
रस्ता माझा नसला तरी तरी या रस्त्यावरचे खाचखळगे हे माझ्या अस्तित्वाचे ठसठशीत पुरावे आहेत हे मात्र मी कबूल करतो. याच
आकांतातून माझ्या काही कवितांचा जन्म झाला. माझ्या उन्हभरल्या काळजाच्या एका
तुकड्याचा आधार घेऊन बोलायचे झाल्यास...
ज्ञानियाच्या मायेने
उजळली काया
दूरदेशी सोडून
आलो मोहमाया
ज्या मोहमायेच्या त्यागाने विशिष्ट स्थळी
पोहोचण्याच्या माणूस विचार करतो, धडपड करतो, याची सांग्रसंगीत तयारी तो अगोदरच करून ठेवतो. थोडक्यात
सांगावयाचे झाल्यास, 'माझ्याच तिरडीस लागणारे शब्दफुलांचे हार मीच
तयार करून ठेवले आहेत, तेही इतरांची होणारी
कुचंबणा टाळण्यासाठी' हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे
आहे. आपला भागदेय आहे याकडे डोळेझाक करून त्या पलीकडले इच्छित स्थळ गाठणे हे
कुणालाही कठीणच असते. पण त्यासाठी जेव्हा मनुष्य निराशेने निर्माणकर्त्याच्या
भूमिकेकडे बोट दाखवितो, तेव्हा या निर्माण प्रक्रियेतील त्रुटींची सम्यक कल्पना
विचारात घेणे आवश्यक आहे.
क्रमश:
-भिवा रामचंद्र परब
Nice writeup
ReplyDelete