Saturday, 15 October 2016

श्रीगुरुंच्या अलौकिक लीलांचे वर्णन

सद्गुरू दत्तात्रयाचा प्रथम अवतार म्हणजे अत्रि-अनसुयानंदन,द्वितीय अवतार श्रीगुरू श्रीपाद वल्लभ आणि तृतीय अवतार असलेले श्रीगुरू नृसिंहसरस्वती यांचे जन्मस्थळ कारंजपूर, तर निवासस्थान होते नरसोबाची वाडी-औंदुबर, गाणगापूर आणि वृत्तीने ते संन्याशी होते. या तीन अवतारांपैकी श्रीपाद वल्लभ आणि नृसिंहसरस्वती यांनी केलेल्या अलौकिक रसभरीत वर्णन करणारे ‘कृपामूर्ती नृसिंहसरस्वती’ हे पुस्तक यती कृष्णानंद यांनी लिहिलेले आहे. आपल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे जयंतीभाई आचार्य श्री गांधी यांनी गुजराती भाषेतून लिहिलेल्या ‘दत्तलीलासार’ या पुस्तकाने त्यांचे मन वेधून घेतले आणि या पुस्तकाचे मराठी भाषांतर करावे असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. पण पुस्तकाचे भाषांतर न करता केवळ लिला प्रसंगाची निवड दत्तलीलासार या पुस्तकातून करून त्यांनी स्वतंत्रपणे हे पुस्तक लिहिले आहे. श्रीगुरु श्रीपाद वल्लभ यांच्या चार आणि नृसिंहसरस्वती यांच्याविषयी सव्वीस अशा तीस कथांचे प्रस्तुत पुस्तक आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात श्रीगुरुंच्या सेवेत स्वत:ला झोकून दिलेल्या यती कृष्णानंदाची श्रीगुरुवरील निस्सीम,असीम आणि उत्कट भक्ती यांचे दर्शन पुस्तक वाचताना ठायी ठायी होते.

पुराणकाळापासून भगवंताने अनेक विविध कारणांसाठी अनेक अवतार धारण केले आणि त्या अवतारांचे कार्य संपताच ते समाप्त ही केले. पण दत्तात्रयाचे अवतार मात्र अविनाशी आहेत. अज्ञानाचा नाश करणारा आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारा असा हा परमश्रेष्ठ अवतार मानला जातो. श्रीगुरू श्रीपाद वल्लभ यांनी संजीवन समाधी घेतली, तर श्रीगुरू  सरस्वती यांनी नरसोबाची वाडी येथे औंदुबर वृक्षाखाली बारा वर्षे गुप्तपणे प्रखर अनुष्ठान करून नंतर त्यांनी गाणगापूर येथे जवळपास तेवीस वर्षे वास्तव्य केले. अनेक दीन दलितांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे मळे फुलवून त्यांच्यावरील संकटाचे निवारण केले.

दीन दुबळ्यांची सेवा करावयाची असेल, लोकांचे अज्ञान दूर करावयाचे असेल तर चमत्काराशिवाय पर्याय नाही, हे श्रीगुरुंनी जाणले होते. म्हणूनच मानवी जीवनाच्या आणि बुद्धीच्या पलिकडे जाऊन त्यांनी अनेक अतर्क्य अशा घटना आपल्या सामर्थ्याने घडवून आणल्या आणि एकप्रकारे समाजात लोकजागृती निर्माण केली. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, रोगी-निरोगी असे कोणतेही भेदाभेद न करता श्रीगुरुंनी सर्वांसाठी ज्ञानाची कवाडं उघडी केली. भिल्लवडी येथील जिव्हादान, अमरेश्वरी घेवड्यामुळी सुवर्णमुद्रांची निर्मिती, शिरोळच्या गंगाधराच्या मृत पुत्रास सजीव करणे. वांझ म्हैशीला न विताही दुध देण्यास भाग पाडणे, मांगाच्या मुखातून वेद वदविणे. सावित्रीच्या मृत पतीस जिवंत करणे. भास्करने आणलेल्या तीन माणसांसाठीचा शिधा वापरून चार हजार माणसांना भोजन देणे. शुष्क काष्ठास पालवी आणून नरहरीचे कुष्ठ दूर करणे. ब्राह्मणाच्या पोटशुलाचे पंचपक्वानाने निवारण...श्रीगुरुवरील भक्तीच्या भावनेची परिसीमा आणि त्वरित फल अशा चमत्कारांनी सर्वच कथा ओतप्रोत भरलेल्या आहेत.

यती कृष्णानंदानी हे पुसक लिहिले खरं! पण हे करीत असताना त्यांना अर्धांगवायूचा सौम्यसा झटका आला, पण केवळ आठ ते दहा दिवसात ते आश्चर्यकारकरित्या बरे झाले हा त्यांना श्रीगुरूंचा चमत्कार वाटल्यास नवल ते काय? कथा वाचताना याच चमत्काराची अनुभूती सतत येत रहाते. एकदा पुस्तक वाचावयास घेतले की ते खाली ठेवू नये असे वाटते. श्रीगुरुंचे वर्णन करताना, भक्ती याचना करताना त्यांची लेखणी प्रासादिक गोडीची, रसाळ आणि आल्हादकारक होते. श्रीगुरुंच्या भक्तीत आकंठ बुडालेल्या यती कृष्णानंदाचे प्रस्तुत पुस्तक भक्तीमार्गातील प्रत्येकाला भक्तीचा परिपाठ देणारे आहे.

पुस्तकाचे नांव : कृपामूर्ती श्रीनृसिंहसरस्वती
लेखक : यती कृष्णानंद
-भिवा रामचंद्र परब   
(पूर्व प्रसिद्धी दै.सामना रविवार पुरवणी- २२ जानेवारी,२०१२ )

No comments:

Post a Comment