Tuesday, 18 October 2016

आकांताचे मृगजळ -भाग ३

अहिल्या आणि अरुणा शानभाग..दोघीही पुरुष वासनेच्या बळी.. दोन पुरुषांपैकी एक देव आणि दुसरा देवानेच निर्माण केलेला मानव. अहिल्येला उद्धारायला प्रभू रामचंद्र आले पण बेचाळीस वर्षे कोमात असलेल्या अरुणा शानभागसाठी नियती कुठल्याही डॉक्टरला राम बनवून पाठवू शकली नाही”   
भाग- २ इथे वाचा ... 
नियतीने ओंजळीत टाकलेले विचार निसटू पहाताना वेचलेल्या चांदण्यांचे काय करायचे हा माझ्यासमोर मोठाच प्रश्नच आहे. माळ केली तर ती कुणाच्या गळ्यात जाऊन पडेल याचा नेम नाही आणि या चांदण्याचा गजरा करावा म्हटल तर त्यांना जोडून ठेवणारा धागा हवा. आयुष्य हे सुख दु::खाच्या धाग्यांनी बनलेले आहे. नाती जोडायलाही एक अदृश्य धागा लागतोच. त्यातलाच एखादा माणुसकीचा धागा मिळतो काय पहावं लागेल. धागा शब्द आला की मला गदिमांचे, 
        एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे,
        जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे
हे गीत आठवते. सुखाचे चांदणे ही वैयक्तिक माझी मक्तेदारी नाही. चांदण्यावर हक्क सांगायला अवकाशातले ग्रहतारे आले तर माझ्या ललाटी काय लिहिले ते वाचून शहाजोगपणे सल्ले देतील. पण मी करतो त्यापेक्षा ते वेगळ काय सांगणार? माझ्या हाताच्या रेषा आणि माझे ललाट यापेक्षा जर मी काही वेगळ करीत असेन तर ते माझे कर्तृत्व मानायला हवे अर्थात हे कुणाला पटो वा न पटो. मला एक कळते की मक्तेदारी निर्माण करण्यासाठी अगोदर अंगण आपले करायला हवे. येथे मला आपलेसे म्हणायचे आहे. कारण आपले आणि आपलेसे यात खूप फरक आहे. एकदा त्यांना आपलेसे केले कि हक्काने आपली बाजू घ्यायला कोणी तरी असेल. मागून मिळत नाही आणि ओरबाडून घेणे आपल्या तत्वात बसत नाही, त्यामुळे जमत नाही. केव्हां केव्हा आयुष्यातले क्षण दंवमोती सारखे भासतात. भासतात, निसटतात. काही जण घट्ट पकडून ठेवू पहातात. पण खरं सांगू तो केवळ भ्रम असतो! भास असतो.

काळाला कोणी बांधून ठेवू शकतो का? मागे एकदा मी नियतीशी करार केला (म्हणूनच माझ्या ओंजळीत त्यांनी विचारांची फुले आली) माझ्या वाटेवरच्या काट्यांना फुले मानून वाटचाल करीन पण तुझ्या वचनाला धक्का नाही लावू देणार. तुला बांधून ठेवणार नाही. पण शेवटी नियतीचं ती.. माणूस तिच्या पासंगाला पुरणार नाही. हे तीन वेळोवेळी दाखवून दिले. नक्षत्रांची भूल आणि अवकाशाचे क्षितिज याचा मागोवा घेताना, रेषांची लांबी रुंदी मोजता मोजता निराशेने माझा हात नियतीनं मागे केव्हा खेचला कळलंच नाही. ओसाड अरण्य आणि उजाड वाळवटांचे एक बरे आहे, त्यांच्याकडून कसल्याच अपेक्षा करता येत नाहीत. ज्याचे भोग आहेत,त्यानेच भोगायचे ते. जेथे भक्कम तटबंदीच्या आत सुरक्षित समजावयाचे दिवस आता राहिले नाहीत तेथे वाळूची तटबंदी काय कामाची? कारण वर्तमान हा भूतकाळाशी निगडीत असतो आणि भविष्यकाळ येणाऱ्या घटनांचा सूचक असतो. भुतकाळ पुसून टाकता येत नाही आणि भविष्यकाळ टाळता येत नाही.

अहिल्याचे शिळा होणे, उल्केचे शिळा होऊन आकाशातून कोसळणे आणि अरुणा शानबागचे कोमात जाणे या साऱ्या एकाच घटना काळाच्या नियतीच्या साखळीत जोडल्या गेल्या असाव्यात असे मला राहून राहून वाटते. ही साखळी भूतकाळ-वर्तमानाला जोडून भविष्यकाळालाही आपल्या सोबत फरफटत घेऊन चालली आहे. त्यातील उल्केचे कोसळणे हे निसर्ग निर्मित असले तरी त्या मागे निसर्गाचा काही कार्यकारणभाव तरी असावा. संवेदनशील असलेल्या अहिल्येचा आक्रोश तीनही जगात पोहोचला आणि ती सचेत झाली, मात्र अरुणा शिळा बनून मातीमोल झाली. अहिल्या आणि अरुणा शानभाग... दोघेही पुरुष वासनेच्या बळी.. दोन पुरुषापैकी एक देव आणि दुसरा देवानेच निर्माण केलेला मानव. अहिल्येला उद्धारायला प्रभू रामचंद्र आले पण बेचाळीस वर्षे कोमात असलेल्या अरुणा शानभागसाठी नियती कुठल्याही डॉक्टरला राम बनवून पाठवू शकली नाही. आज समाजात अशा अनेक अहिल्या,अरुणा शिळा होऊन पडल्या आहेत अशाच एखाद्या रामाच्या प्रतीक्षेत.. रामाच्या पदस्पर्शासाठी आतुरलेल्या.. अन्यथा नशिबी मातीमोल होणे...  नियतीचा खेळ, दुसरं काय?  
क्रमश:
-भिवा रामचंद्र परब 


No comments:

Post a Comment