आकेरीच्या
नाईक कुटुंबात सध्या जे काय चाललेले आहे ते बघून माझ्यासारख्या अस्सल मालवणी
माणसाला फार वाईट वाटले. दुसऱ्याच्या सुखात आपला सुख शोधणारा मालवणी माणूस नाईक
कुटुंबावर एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटांनी व्यथित झाला नसता तर नवलच, त्यात छायाचा होणारा नवरा आणि गुप्त पोलीस हवालदाराच्या मृत्यूने तो
आणखी काय काय होणार म्हणून चिंतेने ग्रासला. घरातला जाणता दत्ता याची सध्या चौकशी
चालू आहे. मधेच कोणीतरी बातमी आणली या सगळ्यामागे निलीमाचा आणि सुसल्याचा हात आहे, आता नियमाने तो रात्री १०.३० वाजता आता पुढे काय घडेल म्हणून लवकर जेवून टीव्ही चालू करून बसतो. नाईक कुटुंब काही
धुतल्या तांदळासारखे नाही, अण्णांनी आणखी काय काय घाण करून
ठेवली म्हणून सगळे जण काळजीत आहेत. त्यांना अजूनही वेडी आशा आहे कि विश्वास नावाचा
पोलीस अधिकारी तोतया असावा नाहीतर एवढे दिवस त्या घरात ऱ्हवाक त्येचो कुठ्लो पोलीस
अधिकारी त्याका परमिशन देयत. पण येड घेवून पेडगावला जाणारी माणसे काय कमी नाहीत
आणि आमच्या मालवणी माणसाला काय सांगायला नको (काय येतय काय काही ध्यानात? मालिका संपली कि विचारा, मग सांगतो) पण वादी-दुष्मनी कोणी असू दे त्याच्या घरात सुख नांदू दे
यासाठी माझ्यासारख्या अनेक मालवणी माणसांनी देवांक गारायणी घातल्यांनी. त्यातल्या
एका गारायण्यांक मिया उभो होतय. जा आयकल ता गारायणा :
बा
देवा म्हाराजा, नाईक घराण्यावर जी काय संकटा इली
ती निवारूच्या साठी तुका गारायणा घालतत ता मान्य करून घे. हे आदि नारायण परमेश्वरा, बारा पाच पुरी, देवी सातेरी, मायेचो पूर्वस, नाईक वस, रामेश्वर, रवळनाथ, आगयो येताळ, काळो देवचार, भावो वेताळ, बाराचो चव्हाटो, बाराची नीत, खैरोबोद, सिद्धमहापुरुष, गावडो गिरो, आज खासाखुस मालक,
(व्हय म्हाराजा) तर देवा, आज हय् तुमका बारा पंच्यायतनाक तुळशीपानाचो इडो,
(व्हय म्हाराजा) नारळ, केळी ठेयली आसत (व्हय म्हाराजा) त्यावर तू देवता राजी व्हवन, जी काय त्यांची मनोकामना आसा ती पूर्ण कर (व्हय म्हाराजा) आणि तुझी
सेवाचाकरी करून घे.(व्हय म्हाराजा) त्याचपरमाणे तिऱ्हाईत देवतेक पाच तुळशीपाना
ठेयली आसात. तुझा आणि त्या देवतेचा याक गणित करून तुझी तिऱ्हाईतकी घट करून ह्या
लेकरांचा कल्याण कर....(व्हय म्हाराजा) त्याचपरमाने घरचो वस, निर्वशी, काशि कल्याणी बिरामण, दांडेकर बिराम, अवगत देवचार, मेलेली पितरगत, गिरोबा, इट्टलादेवी, सगळ्या देवांना मानपरमाणे पानपाकळी ठेयली आसा. (व्हय
म्हाराजा)त्याच्यावर सर्व देवता राजी होवन तुमचा आणि पंचायतनाचा याक गणित करून या
जमलेल्या लेकरांकडे, त्याच्या कुटुंबाकडे,
(व्हय म्हाराजा) घरमटीकडे, जो काय किलेस आसात तो परिहार करून लेकरांची इच्छा, मनोकामना पूर्ण करून त्यांची सेवाचाकरी करून घे. (व्हय म्हाराजा)
त्याचप्रमाणे आकेरीचा ह्या नाईक कुटुंब तुका गारायणा घालता म्हाराजा गेली काही वर्षा त्यांच्या घरावर संकटावर संकटा येतत. तेतुत्सून
मार्ग काढूच्यासाठी तिराइत देवान सांगल्याप्रमाणे भावकीतल्या
पाचांका बोलवन पाच तुळशीपाना, योक आंब्याच्यो टाळ, ताब्यांची तार, गुंजभर सोना, सगळ्या देवांका नारळ, पांच केळी, जी कोण अवदसा त्रास दिता तिका
केळीच्या पानावर हळद पिंजर लावलेलो दहीभात ह्या सगळा रस्त्याच्या जमिनीच्या वरच्या बाजूक ठेयला. नेणे वकिलांची जर काय त्या जागेवर आशा ऱ्हवली आसत
म्हणान देवाच्या टेंभावर दोन कोंबे कापले पण देवा त्यांची संकटा काय कमी होनत नाय
(व्हय म्हाराजा) देवा आमचो दत्तो घरातलो जाणतो. तरी ता लेकरू अज्ञानी आसा(व्हय
म्हाराजा) त्याच्या सगळ्या गुन्ह्यावर पांघरून घाल. जो कोण विश्वास नावाचो पोलीस
घरात शिरलो त्याका सुबुदधी दे. तो काय काय नको ता खोदून काढता त्याका पायबंद घाल.
(व्हय म्हाराजा) मुळात तो पोलीस घरात घुसलो कसो? त्यांका परमिशन कोणी दिली? खाल्ल्या मीठाक जागाची त्याका बुद्धी दे. जर तो बरोबर काय पंचाक्री
घेवन इलो आसत तर ता तियाच बघ. अभिराम देविकाचा लगीन जावन कितके दिवस झाले पण आजून
काय पाळणा हालाचा नाव नाय. तो गणेश तसो. छायाचा लगीन ठरणा नाय. (व्हय म्हाराजा)
यांच्या घरात कायमची रात.. कायमचो अंधार.. त्यांच्या लवकरात लवकर उजाडू दे रे
देवा... (व्हय रेsssम्हाराजाssssss)
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment