Wednesday, 12 October 2016

आकांताचे मृगजळ -भाग २

“प्रत्यंचेतून सुटलेला बाण कुणाचा बळी घेईल सांगता येणार नाही. बाणाला कांही कळत नाही. त्या बाणावर असेल क्रौंच पक्षी, भीष्म असतील, स्वतः भगवान श्रीकृष्ण असतील किंवा आताच्या काळात त्याच्या टोकावर कुणीही असू शकतो. तुम्ही-आम्ही कुणीही...काळ बदलला, पण ईर्षा तीच जीवघेणी!”
या आकांतातील जाणिवा हा एक वेगळा विषय आहे. या जाणीव कधी मृत्यूच्या चिरंतन सत्याकडे नेऊ पहातात तर कधी उन्मत्त आकाशाला गवसणी घालू पहातात. झरोक्यातून दिसणारे विश्व आणि संपूर्ण विश्वदर्शन हा वेगळा भाग आहे. आज फक्त 'मी' चा बोलबाला जास्त आहे. माझ्या अलिकडे पलिकडे एवढंच नव्हे तर माझ्या अवतीभवती 'मीच' ही विचारसरणी नांदते आहे. पण असा एक झरोका असू द्या, त्यातून निदान निर्वाणीच्या वेळी तरी कोणीतरी तुमच्या हाकेला ओ देईल किंवा त्या झरोक्यातून तुमच्या अस्तित्वाचा ठावठिकाणा कुणाला समजेल. म्हणूनच म्हणतो, आपण फक्त झरोक्याकडे लक्ष द्यावयाचे आहे. कारण संपूर्ण विश्व् पहाणे हे आपले काम नोहे, ते श्रीकृष्ण आणि त्यांचा शिष्योत्तम अर्जुन जाणे.आपण फक्त त्यांनी गीतेत सांगितल्या-प्रमाणे 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन:' या उक्तीवर ठाम राहून वर्तन करणे एवढेच करू शकतो. संपूर्ण विश्व पहाण्याचा हव्यास धरता धरता आपण त्या शिष्योत्तम अर्जुनास आव्हान देतो असे विनाकारण कोणासही वाटू नये. कारण आमची बुद्धी आणि शक्ती याचा ताळमेळ बसताना मुष्किल, तेथे हे फुकटचे दुखणे विकत का घ्या. कारण प्रत्यंचेतून सुटलेला बाण कुणाचा बळी घेईल सांगता येणार नाही. बाणाला कांही कळत नाही. त्या बाणावर असेल क्रौंच पक्षी, भीष्म असतील, स्वतः भगवान श्रीकृष्ण असतील किंवा आताच्या काळात त्याच्या टोकावर कुणीही असू शकतो. तुम्ही-आम्ही कुणीही... काळ बदलला, पण ईर्षा तीच जीवघेणी! 

लालसा, हव्यासापायी दुबळ्याला चिरडण्याची वृत्ती नसानसात भिनलेली. मातीतुन येशी, मातीत मिळशी याचा विसर पडलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम महाराष्ट्रातील कवीने  केले. मातीचा आकांत, तिचा तळतळाट त्यांनी काव्यात मांडला.
          माती सांगे कुंभाराला,पायी मज तुडवीशी
          तुझ्याच आहे शेवट,वेड्या माझ्या पायांशी
ज्या भूमीच्या उपकाराच्या ओझ्याखाली जगाने वाकायला हवे. त्याच भूमीवर हैदोस घालणाऱ्यांना या मातेचा आक्रोश का समजत नाही? सहनशक्तीचा कडेलोट झाला कि मग हीच छिन्नविछिन्न धरती निसर्गाच्या सहाय्याने उत्पात माजविते तेव्हा त्याच्या सामर्थ्याखाली सगळेच दबले जातात, दाबले जातात. कबीराला तर हे अगोदरच कळले होते. म्हणून माणसाच्या कळवळ्यापोटी पूर्वी हेच तर त्यांनी सांगून ठेवले.
          माटी कहे कुम्हार से तू क्या रौदे मोय
          एक दिन ऐसा आयेगा मैं रौदूंगा तोय
साधे सरळ तत्वज्ञान तुमची पण वेळ येईलच हे सांगणारे, बाणाच्या जागी आलेली आजची अग्निशस्त्रे मोडून टाकायची आहे का कुणाची हिंमत? असो. 

आवर्तनाच्या कडेकोट बंधनात स्वतःला बांधून घ्यावे असे कितीही वाटले तरी ते सहज शक्य नाही. कारण दूर डोंगरावरून झेपावणारा वारा कोणती बातमी आणून हे बंधन तोडायला भाग पाडेल, हे सांगता यायचे नाही. वाऱ्याला भान नसते, हे एक बरं आहे. जन्माजन्मांतरीचे हिशोब मागायला तो एका जागी थांबतही नाही.तो बरगडीच्या आतून (किंवा बरगडी पोखरून) जर निमिषार्धात परतला तर ठिकच आहे,अन्यथा बरगडीच्या जखमेवर विंचवाच्या नांग्या ठेवूनच त्याचा लेप लावावा लागेल.तेच एक गुणकारी औषध आहे. एक बरं आहे, नांग्याच्या लेपानी बरगडीच्या जखमा बऱ्या होतील पण अंतर्मनात झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी कोणते औषध लावायचे आणि त्यासाठी कुठल्या डॉक्टरकडे जायचे या विचारात सध्या मी आहे. कुणी काही सांगितले तर मी आज्ञाधारकपणे ऐकतो. होता होईल तेवढं करतोही.कारण करणे हे माझे कर्म आहे. नियतीचा फेरा कुणालाच चुकलेला नाही. भले भले या फेऱ्यात अडकले आणि नेस्तनाबूत झाले. रंकाचा राजा आणि राजाचा रंक ही नियतीची खेळी असेल तरी या खेळीचा एक भाग आपल्याही हातात असतो हे विसरून चालणार नाही. तो भाग म्हणजे आपले कर्तृत्व!
क्रमश: 
-भिवा रामचंद्र परब


No comments:

Post a Comment