Friday, 28 October 2016

आठवणीतले मास्तर

काल गांवी जाऊन आलो. पोटापाण्यासाठी या मायानगरीत पाऊल टाकल्यापासून दरवर्षाला दोन किंवा तीन वेळा माझे कोकणात जाणे असतेच. मातीच्या-मायेच्या ओढीने निसर्गाच्या कुशीत पहुडलेल्याचारी बाजूने डोंगरांनी वेढलेल्या आंब्या-फणसाच्या बागांनी भरलेल्या माझ्या गावाचे मला फारच अप्रूप आहेपरंतु आता पूर्वी सारखी मजा नाही राहिली. जो तो आपापल्या व्यापात एवढा अडकला की कालपरवापर्यंत हेच का ते आपले मित्रसगे सोयरे होते का असा प्रश्न पडावा.

पूर्वी गावाला गेलो कि माझी काही ठरलेली कामे असायची. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे आपल्या शाळा कॉलेजातील मित्रांना भेटणे. कुणाची तरी सायकल घेऊन गावातील मित्रांना गोळा करणे आणि निवांत जागी बसून गावात घडलेल्या छोट्या मोठ्या घटनांवर चर्चा करणे. परंतू आता तसे होत नाही त्याची दोन कारणे एक तर आता कुणाकडेही सायकल नाहीप्रत्येकाकडे दुचाकी आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या रिकामटेकड्या बरोबर गप्पा मारायला कुणाला वेळ नाही.

त्या दिवशी असाच फिरत फिरत माझ्या शाळेकडे गेलो. आम्ही शिकून बाहेर पडता पडता म्हणजे सुमारे पंचेचाळीस- सत्तेचाळीस वर्षांपूर्वी गावातील लोकांनी शासन आणि लोकसहभागातून श्रमदान करून शाळेची एक छोटीशी इमारत बांधली आणि आज त्याच्याच आजूबाजूला शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातंर्गत आणखी दोन इमारती उभ्या राहिल्या. पण शाळेत मुले कुठे आहेतबालवाडी ते चौथी पर्यंत वीस सुद्धा मुले त्या तीन इमारतीत नाहीत आणि  आम्ही शिकत होतो तेव्हा....?

शाळेच्या पायरीवर बसता बसता शाळेचे मला दिवस आठवले आणि आठवले ते म्हापणकर मास्तर. आमच्या गावात असलेल्या अनेक भाग शाळांपैकी एक भाग शाळा माझी आणि त्या शाळेतील नुकतेच बदलून आलेले म्हापणकर मास्तर!

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा मास्तर हा शब्द अपमानित झाला नव्हतागुर्जी या शब्दाला सर ची बाधा झाली नव्हतीविलक्षण आदर आणि होता मास्तर आणि गुर्जीला! अशा काळात एका भल्या सकाळी सात वाजता एका हातात पाटी-पेन्सिल आणि दुसऱ्या हाताने चड्डी सावरत जेव्हा शाळेच्या दाराशी पोहचलो तेव्हा शाळेच्या पडवीत असलेले बैल हंबरत होते. अर्थात माझी शाळा म्हणजे जिजी सावंताचा भाताची मळणी घालावयाचा मांगर होता. मांगरात पहिली ते चौथीच्या वर्गातील पोरं दाटीवाटीने बसली होती. चार कोनात गवताच्या-भाताचा ढीग होता. शाळेत एक टेबल.. एक खुर्चीमोडक्या हाताची ... खुर्चीवर एक वृद्ध सा-काळाकभिन्न माणूस.. टेबलावर दोन्ही पाय सोडून पेंगत होता. पेंगत नव्हता तर चक्क झोपून गेला होता... हेच ते माझे प्रथम गुरुवर्य म्हापणकर मास्तर. मी माझ्या मोठ्या भावाबरोबर गुपचूप जाऊन एका वर्गात बसलो तरी मास्तरांची झोपमोड झाली नाही आणि कुणा पोरांनेही  "गुरुजींनु sssssवर्गात आला" म्हटलं नाही. कदाचित पोरानेही विचार केला असेल. मास्तरांची झोपमोड करून कशास मार खा.

प्रथम रडत रखडत येणारा मी लवकरच शाळेत रुळलो. म्हापणकर मास्तरांची एक एक लकब लक्षात येऊ लागली. मास्तर समजू लागले. पोरांचा आरडाओरडा जेवढा जास्त तेवढी मास्तरांना झोप अधिक. उशिरा आलेला पोरगा वर्गात शिरताच त्याला आता मार मिळणार या विचाराने बाकीची पोरं चिडीचूप व्हायची आणि कुणाला खरं वाटणार नाही पण मास्तर धडपडून जागे व्हायचे. त्यांचा हात आपोआप टेबलावर परजून ठेवलेल्या शस्त्रावर (पक्षी:लाकडी पट्टी)जायचा.
'हं बोल उशीर का केलास?'
'माका उठाक जावंक नाय'
'अस्सा कायअसा कसा उठाक जावक नाय तुका?काय बापाशीच्या मयताक गेला व्हतास'
'नाय गुर्जी '
'आणखी पुढे बोलतंय,घे हात पुढे करमास्तर सपासप पाच सहा पट्ट्या हातावर मारीत आणि 'पोरानुअभ्यास करा रे' म्हणत पेंगत बसत. मनाला वाटेल तेव्हा उठायचेतास दिडेक तास शिकवायचे. आसनस्थ व्हायचे. आम्ही खूष... मास्तर ही!

या शाळेची एक गंमत होती. शाळेतल्या पडवीतले बैल केव्हा केव्हा दावी सोडून वर्गात घुसायचे आणि पायाखाली आमच्या पाटी दप्तरांची मळणी करून निघून जायचे. ज्या ज्या दिवशी जिजीच्या भाताची मळणी असायची त्या दिवशी आमचा वर्ग मांगराच्या समोरच्या खळ्यात भरायचा आणि संपूर्ण दिवस त्या खळ्यातल्या दगडात आमचा अभ्यास व्हायचा. तो दिवस आम्हां पोरांचा सर्वात आंनदी दिवस असायचा.

मास्तर तालुक्यावरून बदलून आलेले असल्यामुळे आणि शाळेच्या आजुबाजूस रहावयास खोली न मिळाल्यामुळे ते शाळेपासून तसे लांब रहात. शाळा दुबार पद्धतीने भरत असल्यामुळे ते सकाळी येत आणि संध्याकाळी एकदमच घरी जात. मास्तरांचे कुटुंब त्याच्याबरोबर नसल्यामुळे त्यांनी कधी दुपारचा डबा आणला असं मला तरी आठवत नाही.  साडेदहा वाजता शाळा सुटली की दरवाजा वगैरे बंद करून पुन्हा झोपी जात. दुपारच्या शाळेची मुले यायला सुरवात झाली की उठून जवळच्याच झऱ्यावर आंघोळीला जात. मास्तरांचे एक एक्स्ट्रा धोतर शाळेतच असायचे. दुपारची शाळा पूर्ण भरली की मास्तर खांद्यावर धुतलेले धोतरहातात ग्रामपंचायतीने शाळेला दिलेला तांब्याउघड्याबंब देहाने ते शाळेत घुसायचे. तो महिना फेब्रुवारीमार्च असेल तर तांब्या अर्धाअधिक काजूच्या बियांनी भरलेला असायचा.

शाळा भरून दहा पंधरा मिनिटे होतात न होतात तोच "ज्यांनी आंघोळ केली नसेल त्यांनी उभे रहावे" मास्तरांचे फर्मान सुटे. आम्ही शेतकरी कुटूंबातली पोरंत्यामुळे आम्ही संपूर्ण दिवस घामाच्या धारातमातीत मळलो ही आईबापांची खात्री पटल्याशिवाय आम्हाला आंघोळ नाही. पण आम्ही बेरके जरा दुपार व्हायला आली की आईबापाचा डोळा चुकवून तळीत पोहायला जायचो आणि किती तरी तास वेळ डुंबत बसायचो नाहीतर दोन दोन दिवस आम्हांला आंघोळच  नसायची. सकाळी उठल्याउठल्या आंघोळ हे सूत्र गावगाड्यात उपयोगाचे नाही.आताही नाही आणि पूर्वीही नव्हतं. तर मास्तरांच्या फर्मानावर अख्ख्या शाळेतली निम्म्यापेक्षा जास्त मुले उभी रहात. मास्तर पोरांच्या हातावर हलकेच छडी मारून 'झऱ्यावर' पिटाळीत. पुढे काय करायचे हे ते सांगत नसत. पण पुढे काय काय करायचे हे पोरांना अचूक ठाऊक. येताना पोर वानराप्रमाणे सावंतांच्या काजूबागातून फेरफटका मारीत आणि मधल्या सुट्टीपर्यत काजूबिया जमा करीत दादा कोंडके टाईप पँटीचे खिसे लोंबकळवित हजर व्हायची.  तो पर्यंत मास्तर मागे राहिलेल्या पैकी एकेकाला जेवणात आज काय खाल्ले याची चौकशी करीत बसलेले असायचे.

हे त्यांचे नेहमीचं जेवणाचे विचारणे हा कोणता प्रकार असायचा हे मला अद्याप  समजले नाही.वर उल्लेखलेल्या काही गोष्टी अधूनमधून घडायच्यापण त्यांची झऱ्यावरची आंघोळ आणि जेवणाच्या गोष्टी या नेहमीच्याच. ते शाळेत डबा आणायचे नाहीत. संपूर्ण दिवस उपाशी राहायचे. हे आमच्या वाडीतील सर्वाना माहिती होते.  परंतु महिन्यातून दोन-चारदा आमच्या घरातून फक्त त्यांच्यासाठी जेवणाचा डबा जायचा. त्याला कारणही तसेच होते. माझा मोठा भाऊ जो माझ्यापेक्षा दोन यत्ता वर होता. तो त्यांचा अत्यंत लाडका. मास्तर उपाशी रहातात म्हणून तो आयेकडे हट्ट करायचा. परंतु आमच्या चार खांबावर कसेबसे उभे राहिलेल्या खोपट्यातील अठराविश्व दारिद्रामुळे दादाला केव्हा केव्हा आईचा मार आणि मास्तरांना डबा मिळायचा. माझ्या आयेला त्यावेळी शक्य असते तर त्यांनी त्यानां कायमचा जेवणाचा डबा दिला असतापण जिथे आम्हीच भावंड दोन दोन दिवस नुसते भाताची पेज  पिऊनकधी नुसते पाणी पिऊन दिवस काढीत होतो,तेथे मास्तरांना डबा नेहमी कसा देणार?आम्ही मास्तराना वशिला लावतो म्हणून आजूबाजूची पोरं आम्हांला चिडवायचीतरीसुद्धा माझ्या दादाने मास्तरांना डबा द्यायचे व्रत सोडले नाहीअर्थात त्याचा एक फायदा असा  झाला की त्याकाळी शासनाकडून मुलांना मोफत वाटली जाणारी 'दुधाची पावडरमाझ्या दादाची तोलामासाची प्रकृती लक्षात घेऊन जास्त मिळायची. असो हे झाले थोडेसे विषयांतर!

पोरांनी आणलेले आणि एकूण जमा झालेल्या काजूबिया पोरं आग घालायची .काजू फोडून काजूगर मास्तरांच्या पुढ्यात ठेवायचे. केव्हा केव्हा मास्तरांना 'म्होवलाखायची लहर यायची. मग मास्तर एका-दोघांना वाडीतून कुणाकडून तरी  मोठा टोपगुळखोबरे आणायला पिटाळायचे. काजूगरगुळखोबरे एकत्र करून चुलीवर ठेवला कि झाला म्होवला तयार आणि मग सर्वांच्या हातावर थोडा थोडा ठेवून बाकीचा म्होवला मास्तर खाऊन टाकीत. अशा उपदव्यापात सारा दिवस पसार व्हायचा. मलाही शाळेची गोडी वाटू लागली होती. पण पंधरा दिवस केलेली मजा केव्हा तरी अचानक बाहेर पडायची. एखादा दिवस मास्तर पटापट शिकवीत रहायचे आणि दुसऱ्या दिवशी शस्त्र पाजळून एकेकाची पाठ फोडून काढायचे.

माझ्याबरोबर माझे चुलतभाऊ शेजारी असायचे. या पोरांचा एक वेगळाच प्रकार. मास्तरांचा डोळा चुकवून बैलांच्या गोठ्यातून ते हळूच सटकायचे तर कधी हळूच येऊन बसायचे. मास्तर त्यांना 'गोल्डन गॅंग ' म्हणायचे. यात एकापेक्षा एक आताच्या भाषेत बोलायचे झाले तर उलट्या खोबडीची पोरं होती.  पण जो पर्यंत मास्तरांचा हात पडत नाही तोपर्यत त्यांच्या गमजा! पण एकदा का त्यांच्या हाती सापडला कि त्यांची खैर नाही. दिवसभर पोरं अशीच उंदडतभटकत असायची. कधी कुणाची आडसरे पाडकधी कुणाच्या  काजूबागात जाऊन काजू आण. असे यांचे धंदे. अर्थात आपले भविष्य आपल्याच हातात या न्यायाने त्यातला एखाददुसरा वगळता कुणीही मॅट्रिक पर्यत जाऊ शकला नाही.

मास्तर आम्हांला नेहमी एक विनोद सांगायचे,"त्यांना दोन मुले. छोटा टापटिपीचातर मोठा अव्यवस्थितम्हणून छोटा मोठ्याची पॅण्ट नेहमी घरापासून लांब  टाकीत असे आणि मग मोठा मुलगा ती पॅण्ट घरभर शोधीत राही." बस्स हाच तो विनोद! यात विनोद काय आहे हे मला अद्यापपर्यत तरी कळलेला  नाही. पण त्यावेळी आम्ही मुले या विनोदाला पोट  धरून खदाखदा हसत असू.

आमचे म्हापणकर मास्तर स्वभावाने खूपच गरीब होते. कुणाच्या अध्यातमध्यात नव्हते. पण त्यांची वागणूक मास्तरासारखी खचितच नव्हती. त्यावेळी वय लहान असल्यामुळे समजले नाही. पण आज लक्षात येतेय. ज्यावेळी मुलांच्या विकासाचा पाय घडवायचा असतोत्यावेळी मास्तरांनी सर्व काही शिकविले पण अभ्यास मात्र मनापासून नाही शिकविला. तसे त्यांचे वैयक्तिक प्रश्न असतीलही. एकतर घरापासून खूप दूरजेवण धड नसायचेघरचे प्रॉब्लेम्ससर्व मार्गानी त्यांची कोडी होती. असे नकळत्या त्या वयात कुणी कुणी सांगत असे ते मी ऐकत असे. त्यात त्यांना मिळणार पगार, "मागता येईना भीकतर मास्तरकी शीक" असा जमाना होता. अर्थात मला हे सगळं आता कळतंय. मागच्या आठवणी काढताना म्हापणकर गुरुजींची एकही चांगली आठवण मला रितसर सांगता येत नाही. त्यांच्या दोन वर्षाच्या संपर्कातील  एवढंच  लक्षात राहिलं.
-भिवा रामचंद्र परब


No comments:

Post a Comment