'अभिमन्यू' हा मकरंद बेहेरे यांचा पहिलाच काव्यसंग्रह. पस्तीस गझला,गीत सदृश्य काव्य,आणि मुक्त छंद अशा सुमारे एकशे चाळीस रचना या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. परंतू या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे एकाही काव्यरचनेला शीर्षक नाही.
क्षुल्लकशा आजारावर डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी बेहेरे यांच्या पायातले बळ नियतीने काढून घेतले आणि कुबड्या कायमच्या जीवनसाथी बनल्या, पण त्याही परिस्थितीत डगमगून न जाता त्यावर मात करून नव्या उमेदीनं जगणं सुसह्य केलं. आपल्या मूक वेदना जगाला कळू न देता त्या काव्यात उतरविल्या. अपंगत्व आले म्हणून कुढत न बसता समाजाच्या प्रवाहात मिसळून, भिनवूनही आपलेपण, स्वत्व जपणारा हा मनस्वी कवी बहुतेक काव्यातून आपल्याला भेटत रहातो. पुस्तकाची खरी सुरवात मुखपृष्ठापासून होते. राखेतून पुनःर्जन्म फिनिक्स पक्षी हा त्याचा दुदर्म्य आशावाद अधोरेखित करतो, तर वेदनेचा अपारदर्शीय अथांग डोह पुस्तकाच्या पानापानांतून डोकावत रहातो. कविता वाचताना कवी भोगत असलेल्या वेदना शब्दरूप घेऊन अवतरल्या असे वाटत रहाते.
काही गुपिते ही हृदयात जपून ठेवायची असतात, असे कवी म्हणतो खरा, पण त्याच्या मनावर झालेल्या खोल जखमा उजागर
होतच रहातात. कवी कलंदर आहे असं स्वतःला भासवत असला तरी
आंतरिक तगमग कमी होत नाही.
आकाश मूक आहे, आक्रोशतोय वारा
सॊशिक ही धारा अन पाण्यास नाही थारा
एखाद्या वाटसरूला आसरा देताना समाज कदाचित वेडा ठरवील याची त्याला तमा नाही. वांझोटे विचार
प्रसवण्यापेक्षा कृतीवरच त्याचा भर राहिला आहे. माकडापासून माणूस उत्क्रांत होत गेला गेला हा डार्विनचा सिद्धांत. मग कवीला
प्रश्न पडतो, असे जर असेल तर
समाजात माकडे जिवंत कशी? की त्यांना मर्कटलीला करता याव्यात म्हणून ती शिल्लक आहेत.
सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करताना त्यांची लेखणी कधी तिरकस बनते, तर कधी त्याच्यासारखी कलंदर होते. क्षितिजाला
कवटाळण्याची ताकद आपल्यात आहे, याची होणारी जाणीव ही त्याच्या आत्मविश्वासाची द्योतक आहे.
समाजघटकांत मिसळूनही शेवटी आपण एकटेच ही कधी
कधी वाटणारी जाणीवही फार भयानक असते. कारण ही दुनिया मुखवट्यांनी भरलेली आहे.
खऱ्या खोट्याची शहानिशा करायला वेळ कुणाला आहे! त्याच्या समोर दोनच पर्याय असतात.
एक म्हणजे स्वतः मुखवटा धारण करायचा किंवा या मुखवट्यावरच जगाला उभे करायचे, अत्यंत संवेनशील असलेले मन असंवेनशील समाज पाहून उद्दिग्न होते.
ऋचा असो वा आयता
माणुसकी शिकवितात
पण आजकाल त्यांच्या नावांवर
सीमा रेषा ओढल्या जातात
अशा उदास स्थितीत मन ओढ घेते ते शब्द, लय, नाद, गीत-संगीत याकडे. वारसाहक्काने आलेले संगीत संस्कार तेव्हा कामी
येतात आणि त्यातून एक सुंदर शब्दांना गझलेचे परिमाण लाभते. त्याची गझल कधी
शृंगारिक असते. (अशी साथ दे मला, पहाट होत साजणी), कधी सामाजिक (आलोय नागडा मी, जाणार नागडा मी) आणि कधी राजकीय (दिलेल्या मतांचा उगा मज आहे)
होते.
घेतलेला श्वास माझा दे मला रे पुन्हा
आठवांचा गाव वाटे चेतवावा हा सुना
काव्यसंग्रहाला प्रस्तावना नाही. पण भारती
चंद्रशेखर पाटील यांनी लिहिलेली मक्यादादा ही बेहेरे यांच्यावरील कथा काव्यसंग्रहाच्या
सुरवातीला आहे. ती काव्यसंग्रहाइतकीच वाचनीय आहे.
थोडक्यात, कवीच्या दृष्टीकरणातून या कवितांचा विचार करावयाचा झाल्यास
एका बाजूला समाजात पसरलेली दांभिकता, असंवेदनशीलता एकाकीपण, वेदनेतून आलेले दुबळेपण, नैराश्य अशा अनेक चक्रव्यूहातून आजच्या अभिमन्यूला जावे
लागते. हे अधोरेखित करणारा हा काव्यसंग्रह आहे. बेहेरे यांच्या सारखा अभिमन्यू या
चक्रव्यूहातून बाहेर पडून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे वाड.मयाच्या आकाशात झेप
घेण्यासाठी सिद्ध आहे, हेही नसे थोडके!
पुस्तकाचे नांव : अभिमन्यू
कवी : मकरंद बेहेरे
प्रकाशक
: अनुनिशा प्रकाशन
६३/३०२, साईराज बिल्डींग,
दामले कॉलनी, कांजूरमार्ग पूर्व,
मुंबई ४०००४२.
मोबा. ९९६७३८१८२६
पृष्ठ : १५० किंमत : रु २२०/-
- भिवा रामचंद्र परब
(दैनिक सामना रविवार उत्सव पुरवणी, दि.२८ऑगस्ट,२०१६रोजी प्रसिद्ध)

Good.....best luck
ReplyDeleteGood.....best luck
ReplyDelete