Friday, 28 October 2016

आठवणीतले मास्तर

काल गांवी जाऊन आलो. पोटापाण्यासाठी या मायानगरीत पाऊल टाकल्यापासून दरवर्षाला दोन किंवा तीन वेळा माझे कोकणात जाणे असतेच. मातीच्या-मायेच्या ओढीने निसर्गाच्या कुशीत पहुडलेल्याचारी बाजूने डोंगरांनी वेढलेल्या आंब्या-फणसाच्या बागांनी भरलेल्या माझ्या गावाचे मला फारच अप्रूप आहेपरंतु आता पूर्वी सारखी मजा नाही राहिली. जो तो आपापल्या व्यापात एवढा अडकला की कालपरवापर्यंत हेच का ते आपले मित्रसगे सोयरे होते का असा प्रश्न पडावा.

पूर्वी गावाला गेलो कि माझी काही ठरलेली कामे असायची. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे आपल्या शाळा कॉलेजातील मित्रांना भेटणे. कुणाची तरी सायकल घेऊन गावातील मित्रांना गोळा करणे आणि निवांत जागी बसून गावात घडलेल्या छोट्या मोठ्या घटनांवर चर्चा करणे. परंतू आता तसे होत नाही त्याची दोन कारणे एक तर आता कुणाकडेही सायकल नाहीप्रत्येकाकडे दुचाकी आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या रिकामटेकड्या बरोबर गप्पा मारायला कुणाला वेळ नाही.

त्या दिवशी असाच फिरत फिरत माझ्या शाळेकडे गेलो. आम्ही शिकून बाहेर पडता पडता म्हणजे सुमारे पंचेचाळीस- सत्तेचाळीस वर्षांपूर्वी गावातील लोकांनी शासन आणि लोकसहभागातून श्रमदान करून शाळेची एक छोटीशी इमारत बांधली आणि आज त्याच्याच आजूबाजूला शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातंर्गत आणखी दोन इमारती उभ्या राहिल्या. पण शाळेत मुले कुठे आहेतबालवाडी ते चौथी पर्यंत वीस सुद्धा मुले त्या तीन इमारतीत नाहीत आणि  आम्ही शिकत होतो तेव्हा....?

शाळेच्या पायरीवर बसता बसता शाळेचे मला दिवस आठवले आणि आठवले ते म्हापणकर मास्तर. आमच्या गावात असलेल्या अनेक भाग शाळांपैकी एक भाग शाळा माझी आणि त्या शाळेतील नुकतेच बदलून आलेले म्हापणकर मास्तर!

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा मास्तर हा शब्द अपमानित झाला नव्हतागुर्जी या शब्दाला सर ची बाधा झाली नव्हतीविलक्षण आदर आणि होता मास्तर आणि गुर्जीला! अशा काळात एका भल्या सकाळी सात वाजता एका हातात पाटी-पेन्सिल आणि दुसऱ्या हाताने चड्डी सावरत जेव्हा शाळेच्या दाराशी पोहचलो तेव्हा शाळेच्या पडवीत असलेले बैल हंबरत होते. अर्थात माझी शाळा म्हणजे जिजी सावंताचा भाताची मळणी घालावयाचा मांगर होता. मांगरात पहिली ते चौथीच्या वर्गातील पोरं दाटीवाटीने बसली होती. चार कोनात गवताच्या-भाताचा ढीग होता. शाळेत एक टेबल.. एक खुर्चीमोडक्या हाताची ... खुर्चीवर एक वृद्ध सा-काळाकभिन्न माणूस.. टेबलावर दोन्ही पाय सोडून पेंगत होता. पेंगत नव्हता तर चक्क झोपून गेला होता... हेच ते माझे प्रथम गुरुवर्य म्हापणकर मास्तर. मी माझ्या मोठ्या भावाबरोबर गुपचूप जाऊन एका वर्गात बसलो तरी मास्तरांची झोपमोड झाली नाही आणि कुणा पोरांनेही  "गुरुजींनु sssssवर्गात आला" म्हटलं नाही. कदाचित पोरानेही विचार केला असेल. मास्तरांची झोपमोड करून कशास मार खा.

प्रथम रडत रखडत येणारा मी लवकरच शाळेत रुळलो. म्हापणकर मास्तरांची एक एक लकब लक्षात येऊ लागली. मास्तर समजू लागले. पोरांचा आरडाओरडा जेवढा जास्त तेवढी मास्तरांना झोप अधिक. उशिरा आलेला पोरगा वर्गात शिरताच त्याला आता मार मिळणार या विचाराने बाकीची पोरं चिडीचूप व्हायची आणि कुणाला खरं वाटणार नाही पण मास्तर धडपडून जागे व्हायचे. त्यांचा हात आपोआप टेबलावर परजून ठेवलेल्या शस्त्रावर (पक्षी:लाकडी पट्टी)जायचा.
'हं बोल उशीर का केलास?'
'माका उठाक जावंक नाय'
'अस्सा कायअसा कसा उठाक जावक नाय तुका?काय बापाशीच्या मयताक गेला व्हतास'
'नाय गुर्जी '
'आणखी पुढे बोलतंय,घे हात पुढे करमास्तर सपासप पाच सहा पट्ट्या हातावर मारीत आणि 'पोरानुअभ्यास करा रे' म्हणत पेंगत बसत. मनाला वाटेल तेव्हा उठायचेतास दिडेक तास शिकवायचे. आसनस्थ व्हायचे. आम्ही खूष... मास्तर ही!

या शाळेची एक गंमत होती. शाळेतल्या पडवीतले बैल केव्हा केव्हा दावी सोडून वर्गात घुसायचे आणि पायाखाली आमच्या पाटी दप्तरांची मळणी करून निघून जायचे. ज्या ज्या दिवशी जिजीच्या भाताची मळणी असायची त्या दिवशी आमचा वर्ग मांगराच्या समोरच्या खळ्यात भरायचा आणि संपूर्ण दिवस त्या खळ्यातल्या दगडात आमचा अभ्यास व्हायचा. तो दिवस आम्हां पोरांचा सर्वात आंनदी दिवस असायचा.

मास्तर तालुक्यावरून बदलून आलेले असल्यामुळे आणि शाळेच्या आजुबाजूस रहावयास खोली न मिळाल्यामुळे ते शाळेपासून तसे लांब रहात. शाळा दुबार पद्धतीने भरत असल्यामुळे ते सकाळी येत आणि संध्याकाळी एकदमच घरी जात. मास्तरांचे कुटुंब त्याच्याबरोबर नसल्यामुळे त्यांनी कधी दुपारचा डबा आणला असं मला तरी आठवत नाही.  साडेदहा वाजता शाळा सुटली की दरवाजा वगैरे बंद करून पुन्हा झोपी जात. दुपारच्या शाळेची मुले यायला सुरवात झाली की उठून जवळच्याच झऱ्यावर आंघोळीला जात. मास्तरांचे एक एक्स्ट्रा धोतर शाळेतच असायचे. दुपारची शाळा पूर्ण भरली की मास्तर खांद्यावर धुतलेले धोतरहातात ग्रामपंचायतीने शाळेला दिलेला तांब्याउघड्याबंब देहाने ते शाळेत घुसायचे. तो महिना फेब्रुवारीमार्च असेल तर तांब्या अर्धाअधिक काजूच्या बियांनी भरलेला असायचा.

शाळा भरून दहा पंधरा मिनिटे होतात न होतात तोच "ज्यांनी आंघोळ केली नसेल त्यांनी उभे रहावे" मास्तरांचे फर्मान सुटे. आम्ही शेतकरी कुटूंबातली पोरंत्यामुळे आम्ही संपूर्ण दिवस घामाच्या धारातमातीत मळलो ही आईबापांची खात्री पटल्याशिवाय आम्हाला आंघोळ नाही. पण आम्ही बेरके जरा दुपार व्हायला आली की आईबापाचा डोळा चुकवून तळीत पोहायला जायचो आणि किती तरी तास वेळ डुंबत बसायचो नाहीतर दोन दोन दिवस आम्हांला आंघोळच  नसायची. सकाळी उठल्याउठल्या आंघोळ हे सूत्र गावगाड्यात उपयोगाचे नाही.आताही नाही आणि पूर्वीही नव्हतं. तर मास्तरांच्या फर्मानावर अख्ख्या शाळेतली निम्म्यापेक्षा जास्त मुले उभी रहात. मास्तर पोरांच्या हातावर हलकेच छडी मारून 'झऱ्यावर' पिटाळीत. पुढे काय करायचे हे ते सांगत नसत. पण पुढे काय काय करायचे हे पोरांना अचूक ठाऊक. येताना पोर वानराप्रमाणे सावंतांच्या काजूबागातून फेरफटका मारीत आणि मधल्या सुट्टीपर्यत काजूबिया जमा करीत दादा कोंडके टाईप पँटीचे खिसे लोंबकळवित हजर व्हायची.  तो पर्यंत मास्तर मागे राहिलेल्या पैकी एकेकाला जेवणात आज काय खाल्ले याची चौकशी करीत बसलेले असायचे.

हे त्यांचे नेहमीचं जेवणाचे विचारणे हा कोणता प्रकार असायचा हे मला अद्याप  समजले नाही.वर उल्लेखलेल्या काही गोष्टी अधूनमधून घडायच्यापण त्यांची झऱ्यावरची आंघोळ आणि जेवणाच्या गोष्टी या नेहमीच्याच. ते शाळेत डबा आणायचे नाहीत. संपूर्ण दिवस उपाशी राहायचे. हे आमच्या वाडीतील सर्वाना माहिती होते.  परंतु महिन्यातून दोन-चारदा आमच्या घरातून फक्त त्यांच्यासाठी जेवणाचा डबा जायचा. त्याला कारणही तसेच होते. माझा मोठा भाऊ जो माझ्यापेक्षा दोन यत्ता वर होता. तो त्यांचा अत्यंत लाडका. मास्तर उपाशी रहातात म्हणून तो आयेकडे हट्ट करायचा. परंतु आमच्या चार खांबावर कसेबसे उभे राहिलेल्या खोपट्यातील अठराविश्व दारिद्रामुळे दादाला केव्हा केव्हा आईचा मार आणि मास्तरांना डबा मिळायचा. माझ्या आयेला त्यावेळी शक्य असते तर त्यांनी त्यानां कायमचा जेवणाचा डबा दिला असतापण जिथे आम्हीच भावंड दोन दोन दिवस नुसते भाताची पेज  पिऊनकधी नुसते पाणी पिऊन दिवस काढीत होतो,तेथे मास्तरांना डबा नेहमी कसा देणार?आम्ही मास्तराना वशिला लावतो म्हणून आजूबाजूची पोरं आम्हांला चिडवायचीतरीसुद्धा माझ्या दादाने मास्तरांना डबा द्यायचे व्रत सोडले नाहीअर्थात त्याचा एक फायदा असा  झाला की त्याकाळी शासनाकडून मुलांना मोफत वाटली जाणारी 'दुधाची पावडरमाझ्या दादाची तोलामासाची प्रकृती लक्षात घेऊन जास्त मिळायची. असो हे झाले थोडेसे विषयांतर!

पोरांनी आणलेले आणि एकूण जमा झालेल्या काजूबिया पोरं आग घालायची .काजू फोडून काजूगर मास्तरांच्या पुढ्यात ठेवायचे. केव्हा केव्हा मास्तरांना 'म्होवलाखायची लहर यायची. मग मास्तर एका-दोघांना वाडीतून कुणाकडून तरी  मोठा टोपगुळखोबरे आणायला पिटाळायचे. काजूगरगुळखोबरे एकत्र करून चुलीवर ठेवला कि झाला म्होवला तयार आणि मग सर्वांच्या हातावर थोडा थोडा ठेवून बाकीचा म्होवला मास्तर खाऊन टाकीत. अशा उपदव्यापात सारा दिवस पसार व्हायचा. मलाही शाळेची गोडी वाटू लागली होती. पण पंधरा दिवस केलेली मजा केव्हा तरी अचानक बाहेर पडायची. एखादा दिवस मास्तर पटापट शिकवीत रहायचे आणि दुसऱ्या दिवशी शस्त्र पाजळून एकेकाची पाठ फोडून काढायचे.

माझ्याबरोबर माझे चुलतभाऊ शेजारी असायचे. या पोरांचा एक वेगळाच प्रकार. मास्तरांचा डोळा चुकवून बैलांच्या गोठ्यातून ते हळूच सटकायचे तर कधी हळूच येऊन बसायचे. मास्तर त्यांना 'गोल्डन गॅंग ' म्हणायचे. यात एकापेक्षा एक आताच्या भाषेत बोलायचे झाले तर उलट्या खोबडीची पोरं होती.  पण जो पर्यंत मास्तरांचा हात पडत नाही तोपर्यत त्यांच्या गमजा! पण एकदा का त्यांच्या हाती सापडला कि त्यांची खैर नाही. दिवसभर पोरं अशीच उंदडतभटकत असायची. कधी कुणाची आडसरे पाडकधी कुणाच्या  काजूबागात जाऊन काजू आण. असे यांचे धंदे. अर्थात आपले भविष्य आपल्याच हातात या न्यायाने त्यातला एखाददुसरा वगळता कुणीही मॅट्रिक पर्यत जाऊ शकला नाही.

मास्तर आम्हांला नेहमी एक विनोद सांगायचे,"त्यांना दोन मुले. छोटा टापटिपीचातर मोठा अव्यवस्थितम्हणून छोटा मोठ्याची पॅण्ट नेहमी घरापासून लांब  टाकीत असे आणि मग मोठा मुलगा ती पॅण्ट घरभर शोधीत राही." बस्स हाच तो विनोद! यात विनोद काय आहे हे मला अद्यापपर्यत तरी कळलेला  नाही. पण त्यावेळी आम्ही मुले या विनोदाला पोट  धरून खदाखदा हसत असू.

आमचे म्हापणकर मास्तर स्वभावाने खूपच गरीब होते. कुणाच्या अध्यातमध्यात नव्हते. पण त्यांची वागणूक मास्तरासारखी खचितच नव्हती. त्यावेळी वय लहान असल्यामुळे समजले नाही. पण आज लक्षात येतेय. ज्यावेळी मुलांच्या विकासाचा पाय घडवायचा असतोत्यावेळी मास्तरांनी सर्व काही शिकविले पण अभ्यास मात्र मनापासून नाही शिकविला. तसे त्यांचे वैयक्तिक प्रश्न असतीलही. एकतर घरापासून खूप दूरजेवण धड नसायचेघरचे प्रॉब्लेम्ससर्व मार्गानी त्यांची कोडी होती. असे नकळत्या त्या वयात कुणी कुणी सांगत असे ते मी ऐकत असे. त्यात त्यांना मिळणार पगार, "मागता येईना भीकतर मास्तरकी शीक" असा जमाना होता. अर्थात मला हे सगळं आता कळतंय. मागच्या आठवणी काढताना म्हापणकर गुरुजींची एकही चांगली आठवण मला रितसर सांगता येत नाही. त्यांच्या दोन वर्षाच्या संपर्कातील  एवढंच  लक्षात राहिलं.
-भिवा रामचंद्र परब


Monday, 24 October 2016

कहाणी कुणा प्रेमिकांची-भाग १

"कहाणी कुणा प्रेमिकांची.. ही दीर्घ कथा कॉलेज जीवनातील असफल प्रेमाचे एक दास्तान आहे. १९९० साली एका दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली ही कथा.. कॉलेज जीवनातील प्रेमाच्या आठवणी ताज्या करणारी..कॉलेज जीवनातला 'तो' हळवा कोपरा..त्याची सुखद जाणीव करून दिल्याशिवाय रहाणार नाही"
वेंगुर्ला : (आमच्या वार्ताहराकडून) वेंगुर्ला वेळेवर(समुद्र किनारी) काल संध्याकाळी लाटेवरून आलेले एक प्रेत किनाऱ्याला लागले. संबंधित पोलीस स्टेशनला कळविले असता वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रमेश सावंत आपल्या संपूर्ण लवाजम्यासहित घटनास्थळी पोहचले. या तरुणाने आत्महत्या केली असावी, असा ठाम निष्कर्ष पोलीस अधिकारी सावंत यांनी काढला असून या तर्काला पुष्टी देणारा पुरावा मयताच्या खिशात प्लास्टिकने गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला. जवळपास पाच लिखित पाने असलेल्या या पुराव्यावरून या मयताचे नाव तुषार असून शहरातील नामांकित महाविद्यालयातील तो हुशार विद्यार्थी होता, असे कळते  प्रेमभंगामुळे त्याने आपली जीवन यात्रा संपवली असावी असा प्राथमिक कयास असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्याने लिहिलेले आत्मकथन त्याच्याच शब्दांत देत आहोत.
००० ००० ०००
बरोबर एक वर्ष झालंय या गोष्टीला. काळ चाललाय पुढे. तो कधी कुणासाठी थांबला का? आणि या काळाचा महिमाही अगाध आहे. वर्तमान काळ भूतकाळाला जवळ घेऊनच पुढे जातो ती भविष्यकाळाची तजवीज म्हणून. त्यामुळे तो भूतकाळ कुणालाही विसरू देत नाही. माझंही तसेच झालंय. पण मी तसाच आहे, जसा वर्षापूर्वी होतो तसाच. फक्त बदललीय ती माझी मनस्थिती. उगवत्या काळाच्या प्रवाहाबरोबर केलेली आणि अनुभवलेली प्रत्येक गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करतोय, तेवढीच विरहाची जाणीव तीव्रतेने होते. निरभ्र आभाळ अचानक भरून आल्यासारखे डोळेही ओथंबू लागतात. भरून लागलेल्या जखमा आणखी चिघळू लागतात. मन बधीर होतेय. काय होते आणि काय झाले. आपलं, आपल्या जवळचे माणूस परागंदा झाले तर तर उद्याच्या आशेवर जगता येते. पण त्याच माणसाचे कलेवर समोर आले तर आपले जगच उध्वस्त झाले असेच समजायचे. लोक म्हणतात काळ हे त्यावरचा उत्तम उपाय आहे. पण मला सांगायचे आहे की, असे जे कोणी म्हणतात त्यांनी मनापासून कुणावर प्रेमच केले नाही. फक्त जगव्यवहार संभाळला. खरे प्रेम सांगावं लागत नाही. त्याला डोळ्यांची, स्पर्शाची भाषा कळते. एका अनामिक क्षणी हृदयाची वाढलेली धडधड त्यांना स्पष्टपणे ऐकू येते. त्यामुळे तो किंवा ती आत्मज्ञानी असतील असे समजायला कुणाचीही हरकत नसावी. असं ही म्हणतात की दोन प्रेमींना एकत्र आणायला एक तर नियती आपल्या बाजूला हवी किंवा त्यांचे आईवडील.

विचारांच्या गर्तेत अभिमन्यूसारखा एकदा फसला गेलो की मी भूतकाळाच्या पडद्याआड गडप होतो. असं कित्येक वेळा घडते. अगदी अखेरपर्यतच्या आठवणी मनात गर्दी करतात. जया मुंबईला जाईपर्यंत!

जया! जया!! आणि जया!!! आज वर्ष झाले तरी हे दोन शब्द हरघडी मस्तकात घिरट्या घालतात. जया माझी कॉलेजातील वर्गमैत्रिण होती पण त्याचप्रमाणे हितचिंतक आणि स्फुर्तीदेवताही तीच होती. माझी आणि तिची पहिली भेट झाली ती कॉलेज लायब्ररीत. त्यावेळी मी इंटरला होतो. महाविद्यालयात नवीनच प्रवेश घेतला होता तीही कोलेजात नवीन होती. काळीसावलीच, पण नाकी डोळी नीटस, रूपाने चांगली चारचौघीत उठून दिसण्याइतपत! पण तिच्याबाबतीत एक गैरसमज (की समज) समस्त वर्गात पसरला होता की ती खूपच गर्विष्ठ आहे. अर्थात ती अबोल असल्यामुळेच वर्गात सहसा ती कुणाशी बोलत नसे म्हणून असेल कदाचित तिच्याबाबत हा गैरसमज असावा. पण एक दिवस...

नेहमीप्रमाणे मी ऑफ पिरेडला लायब्ररीत कुठलंतरी पुस्तक शोधात होतो म्हणजे अभ्यासाचेच. घरच्या अठराविश्व दारिद्रयात कॉलेजची सगळी पुस्तके विकत घेणे मला शक्य नव्हते. त्यामुळे माझा अभ्यास हा सगळा लायब्ररीतल्या पुस्तकावर चालायचा. संपूर्ण दिवसात जेव्हा जेव्हा ऑफ पिरीयेड मिळायचा, तेव्हा मी लायब्ररीत अभ्यास करीत बसायचो. हा माझा नित्यक्रमच असायचा. मी पुस्तक शोधण्यात एवढा तल्लीन झालो होतो की माझ्या  बाजूला उभे राहून कोणीतरी मला निरखीत आहे याची मला कल्पना नव्हती!
क्रमश:
-भिवा रामचंद्र परब

Tuesday, 18 October 2016

आकांताचे मृगजळ -भाग ३

अहिल्या आणि अरुणा शानभाग..दोघीही पुरुष वासनेच्या बळी.. दोन पुरुषांपैकी एक देव आणि दुसरा देवानेच निर्माण केलेला मानव. अहिल्येला उद्धारायला प्रभू रामचंद्र आले पण बेचाळीस वर्षे कोमात असलेल्या अरुणा शानभागसाठी नियती कुठल्याही डॉक्टरला राम बनवून पाठवू शकली नाही”   
भाग- २ इथे वाचा ... 
नियतीने ओंजळीत टाकलेले विचार निसटू पहाताना वेचलेल्या चांदण्यांचे काय करायचे हा माझ्यासमोर मोठाच प्रश्नच आहे. माळ केली तर ती कुणाच्या गळ्यात जाऊन पडेल याचा नेम नाही आणि या चांदण्याचा गजरा करावा म्हटल तर त्यांना जोडून ठेवणारा धागा हवा. आयुष्य हे सुख दु::खाच्या धाग्यांनी बनलेले आहे. नाती जोडायलाही एक अदृश्य धागा लागतोच. त्यातलाच एखादा माणुसकीचा धागा मिळतो काय पहावं लागेल. धागा शब्द आला की मला गदिमांचे, 
        एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे,
        जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे
हे गीत आठवते. सुखाचे चांदणे ही वैयक्तिक माझी मक्तेदारी नाही. चांदण्यावर हक्क सांगायला अवकाशातले ग्रहतारे आले तर माझ्या ललाटी काय लिहिले ते वाचून शहाजोगपणे सल्ले देतील. पण मी करतो त्यापेक्षा ते वेगळ काय सांगणार? माझ्या हाताच्या रेषा आणि माझे ललाट यापेक्षा जर मी काही वेगळ करीत असेन तर ते माझे कर्तृत्व मानायला हवे अर्थात हे कुणाला पटो वा न पटो. मला एक कळते की मक्तेदारी निर्माण करण्यासाठी अगोदर अंगण आपले करायला हवे. येथे मला आपलेसे म्हणायचे आहे. कारण आपले आणि आपलेसे यात खूप फरक आहे. एकदा त्यांना आपलेसे केले कि हक्काने आपली बाजू घ्यायला कोणी तरी असेल. मागून मिळत नाही आणि ओरबाडून घेणे आपल्या तत्वात बसत नाही, त्यामुळे जमत नाही. केव्हां केव्हा आयुष्यातले क्षण दंवमोती सारखे भासतात. भासतात, निसटतात. काही जण घट्ट पकडून ठेवू पहातात. पण खरं सांगू तो केवळ भ्रम असतो! भास असतो.

काळाला कोणी बांधून ठेवू शकतो का? मागे एकदा मी नियतीशी करार केला (म्हणूनच माझ्या ओंजळीत त्यांनी विचारांची फुले आली) माझ्या वाटेवरच्या काट्यांना फुले मानून वाटचाल करीन पण तुझ्या वचनाला धक्का नाही लावू देणार. तुला बांधून ठेवणार नाही. पण शेवटी नियतीचं ती.. माणूस तिच्या पासंगाला पुरणार नाही. हे तीन वेळोवेळी दाखवून दिले. नक्षत्रांची भूल आणि अवकाशाचे क्षितिज याचा मागोवा घेताना, रेषांची लांबी रुंदी मोजता मोजता निराशेने माझा हात नियतीनं मागे केव्हा खेचला कळलंच नाही. ओसाड अरण्य आणि उजाड वाळवटांचे एक बरे आहे, त्यांच्याकडून कसल्याच अपेक्षा करता येत नाहीत. ज्याचे भोग आहेत,त्यानेच भोगायचे ते. जेथे भक्कम तटबंदीच्या आत सुरक्षित समजावयाचे दिवस आता राहिले नाहीत तेथे वाळूची तटबंदी काय कामाची? कारण वर्तमान हा भूतकाळाशी निगडीत असतो आणि भविष्यकाळ येणाऱ्या घटनांचा सूचक असतो. भुतकाळ पुसून टाकता येत नाही आणि भविष्यकाळ टाळता येत नाही.

अहिल्याचे शिळा होणे, उल्केचे शिळा होऊन आकाशातून कोसळणे आणि अरुणा शानबागचे कोमात जाणे या साऱ्या एकाच घटना काळाच्या नियतीच्या साखळीत जोडल्या गेल्या असाव्यात असे मला राहून राहून वाटते. ही साखळी भूतकाळ-वर्तमानाला जोडून भविष्यकाळालाही आपल्या सोबत फरफटत घेऊन चालली आहे. त्यातील उल्केचे कोसळणे हे निसर्ग निर्मित असले तरी त्या मागे निसर्गाचा काही कार्यकारणभाव तरी असावा. संवेदनशील असलेल्या अहिल्येचा आक्रोश तीनही जगात पोहोचला आणि ती सचेत झाली, मात्र अरुणा शिळा बनून मातीमोल झाली. अहिल्या आणि अरुणा शानभाग... दोघेही पुरुष वासनेच्या बळी.. दोन पुरुषापैकी एक देव आणि दुसरा देवानेच निर्माण केलेला मानव. अहिल्येला उद्धारायला प्रभू रामचंद्र आले पण बेचाळीस वर्षे कोमात असलेल्या अरुणा शानभागसाठी नियती कुठल्याही डॉक्टरला राम बनवून पाठवू शकली नाही. आज समाजात अशा अनेक अहिल्या,अरुणा शिळा होऊन पडल्या आहेत अशाच एखाद्या रामाच्या प्रतीक्षेत.. रामाच्या पदस्पर्शासाठी आतुरलेल्या.. अन्यथा नशिबी मातीमोल होणे...  नियतीचा खेळ, दुसरं काय?  
क्रमश:
-भिवा रामचंद्र परब 


Saturday, 15 October 2016

श्रीगुरुंच्या अलौकिक लीलांचे वर्णन

सद्गुरू दत्तात्रयाचा प्रथम अवतार म्हणजे अत्रि-अनसुयानंदन,द्वितीय अवतार श्रीगुरू श्रीपाद वल्लभ आणि तृतीय अवतार असलेले श्रीगुरू नृसिंहसरस्वती यांचे जन्मस्थळ कारंजपूर, तर निवासस्थान होते नरसोबाची वाडी-औंदुबर, गाणगापूर आणि वृत्तीने ते संन्याशी होते. या तीन अवतारांपैकी श्रीपाद वल्लभ आणि नृसिंहसरस्वती यांनी केलेल्या अलौकिक रसभरीत वर्णन करणारे ‘कृपामूर्ती नृसिंहसरस्वती’ हे पुस्तक यती कृष्णानंद यांनी लिहिलेले आहे. आपल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे जयंतीभाई आचार्य श्री गांधी यांनी गुजराती भाषेतून लिहिलेल्या ‘दत्तलीलासार’ या पुस्तकाने त्यांचे मन वेधून घेतले आणि या पुस्तकाचे मराठी भाषांतर करावे असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. पण पुस्तकाचे भाषांतर न करता केवळ लिला प्रसंगाची निवड दत्तलीलासार या पुस्तकातून करून त्यांनी स्वतंत्रपणे हे पुस्तक लिहिले आहे. श्रीगुरु श्रीपाद वल्लभ यांच्या चार आणि नृसिंहसरस्वती यांच्याविषयी सव्वीस अशा तीस कथांचे प्रस्तुत पुस्तक आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात श्रीगुरुंच्या सेवेत स्वत:ला झोकून दिलेल्या यती कृष्णानंदाची श्रीगुरुवरील निस्सीम,असीम आणि उत्कट भक्ती यांचे दर्शन पुस्तक वाचताना ठायी ठायी होते.

पुराणकाळापासून भगवंताने अनेक विविध कारणांसाठी अनेक अवतार धारण केले आणि त्या अवतारांचे कार्य संपताच ते समाप्त ही केले. पण दत्तात्रयाचे अवतार मात्र अविनाशी आहेत. अज्ञानाचा नाश करणारा आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारा असा हा परमश्रेष्ठ अवतार मानला जातो. श्रीगुरू श्रीपाद वल्लभ यांनी संजीवन समाधी घेतली, तर श्रीगुरू  सरस्वती यांनी नरसोबाची वाडी येथे औंदुबर वृक्षाखाली बारा वर्षे गुप्तपणे प्रखर अनुष्ठान करून नंतर त्यांनी गाणगापूर येथे जवळपास तेवीस वर्षे वास्तव्य केले. अनेक दीन दलितांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे मळे फुलवून त्यांच्यावरील संकटाचे निवारण केले.

दीन दुबळ्यांची सेवा करावयाची असेल, लोकांचे अज्ञान दूर करावयाचे असेल तर चमत्काराशिवाय पर्याय नाही, हे श्रीगुरुंनी जाणले होते. म्हणूनच मानवी जीवनाच्या आणि बुद्धीच्या पलिकडे जाऊन त्यांनी अनेक अतर्क्य अशा घटना आपल्या सामर्थ्याने घडवून आणल्या आणि एकप्रकारे समाजात लोकजागृती निर्माण केली. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, रोगी-निरोगी असे कोणतेही भेदाभेद न करता श्रीगुरुंनी सर्वांसाठी ज्ञानाची कवाडं उघडी केली. भिल्लवडी येथील जिव्हादान, अमरेश्वरी घेवड्यामुळी सुवर्णमुद्रांची निर्मिती, शिरोळच्या गंगाधराच्या मृत पुत्रास सजीव करणे. वांझ म्हैशीला न विताही दुध देण्यास भाग पाडणे, मांगाच्या मुखातून वेद वदविणे. सावित्रीच्या मृत पतीस जिवंत करणे. भास्करने आणलेल्या तीन माणसांसाठीचा शिधा वापरून चार हजार माणसांना भोजन देणे. शुष्क काष्ठास पालवी आणून नरहरीचे कुष्ठ दूर करणे. ब्राह्मणाच्या पोटशुलाचे पंचपक्वानाने निवारण...श्रीगुरुवरील भक्तीच्या भावनेची परिसीमा आणि त्वरित फल अशा चमत्कारांनी सर्वच कथा ओतप्रोत भरलेल्या आहेत.

यती कृष्णानंदानी हे पुसक लिहिले खरं! पण हे करीत असताना त्यांना अर्धांगवायूचा सौम्यसा झटका आला, पण केवळ आठ ते दहा दिवसात ते आश्चर्यकारकरित्या बरे झाले हा त्यांना श्रीगुरूंचा चमत्कार वाटल्यास नवल ते काय? कथा वाचताना याच चमत्काराची अनुभूती सतत येत रहाते. एकदा पुस्तक वाचावयास घेतले की ते खाली ठेवू नये असे वाटते. श्रीगुरुंचे वर्णन करताना, भक्ती याचना करताना त्यांची लेखणी प्रासादिक गोडीची, रसाळ आणि आल्हादकारक होते. श्रीगुरुंच्या भक्तीत आकंठ बुडालेल्या यती कृष्णानंदाचे प्रस्तुत पुस्तक भक्तीमार्गातील प्रत्येकाला भक्तीचा परिपाठ देणारे आहे.

पुस्तकाचे नांव : कृपामूर्ती श्रीनृसिंहसरस्वती
लेखक : यती कृष्णानंद
-भिवा रामचंद्र परब   
(पूर्व प्रसिद्धी दै.सामना रविवार पुरवणी- २२ जानेवारी,२०१२ )

Wednesday, 12 October 2016

आकांताचे मृगजळ -भाग २

“प्रत्यंचेतून सुटलेला बाण कुणाचा बळी घेईल सांगता येणार नाही. बाणाला कांही कळत नाही. त्या बाणावर असेल क्रौंच पक्षी, भीष्म असतील, स्वतः भगवान श्रीकृष्ण असतील किंवा आताच्या काळात त्याच्या टोकावर कुणीही असू शकतो. तुम्ही-आम्ही कुणीही...काळ बदलला, पण ईर्षा तीच जीवघेणी!”
या आकांतातील जाणिवा हा एक वेगळा विषय आहे. या जाणीव कधी मृत्यूच्या चिरंतन सत्याकडे नेऊ पहातात तर कधी उन्मत्त आकाशाला गवसणी घालू पहातात. झरोक्यातून दिसणारे विश्व आणि संपूर्ण विश्वदर्शन हा वेगळा भाग आहे. आज फक्त 'मी' चा बोलबाला जास्त आहे. माझ्या अलिकडे पलिकडे एवढंच नव्हे तर माझ्या अवतीभवती 'मीच' ही विचारसरणी नांदते आहे. पण असा एक झरोका असू द्या, त्यातून निदान निर्वाणीच्या वेळी तरी कोणीतरी तुमच्या हाकेला ओ देईल किंवा त्या झरोक्यातून तुमच्या अस्तित्वाचा ठावठिकाणा कुणाला समजेल. म्हणूनच म्हणतो, आपण फक्त झरोक्याकडे लक्ष द्यावयाचे आहे. कारण संपूर्ण विश्व् पहाणे हे आपले काम नोहे, ते श्रीकृष्ण आणि त्यांचा शिष्योत्तम अर्जुन जाणे.आपण फक्त त्यांनी गीतेत सांगितल्या-प्रमाणे 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन:' या उक्तीवर ठाम राहून वर्तन करणे एवढेच करू शकतो. संपूर्ण विश्व पहाण्याचा हव्यास धरता धरता आपण त्या शिष्योत्तम अर्जुनास आव्हान देतो असे विनाकारण कोणासही वाटू नये. कारण आमची बुद्धी आणि शक्ती याचा ताळमेळ बसताना मुष्किल, तेथे हे फुकटचे दुखणे विकत का घ्या. कारण प्रत्यंचेतून सुटलेला बाण कुणाचा बळी घेईल सांगता येणार नाही. बाणाला कांही कळत नाही. त्या बाणावर असेल क्रौंच पक्षी, भीष्म असतील, स्वतः भगवान श्रीकृष्ण असतील किंवा आताच्या काळात त्याच्या टोकावर कुणीही असू शकतो. तुम्ही-आम्ही कुणीही... काळ बदलला, पण ईर्षा तीच जीवघेणी! 

लालसा, हव्यासापायी दुबळ्याला चिरडण्याची वृत्ती नसानसात भिनलेली. मातीतुन येशी, मातीत मिळशी याचा विसर पडलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम महाराष्ट्रातील कवीने  केले. मातीचा आकांत, तिचा तळतळाट त्यांनी काव्यात मांडला.
          माती सांगे कुंभाराला,पायी मज तुडवीशी
          तुझ्याच आहे शेवट,वेड्या माझ्या पायांशी
ज्या भूमीच्या उपकाराच्या ओझ्याखाली जगाने वाकायला हवे. त्याच भूमीवर हैदोस घालणाऱ्यांना या मातेचा आक्रोश का समजत नाही? सहनशक्तीचा कडेलोट झाला कि मग हीच छिन्नविछिन्न धरती निसर्गाच्या सहाय्याने उत्पात माजविते तेव्हा त्याच्या सामर्थ्याखाली सगळेच दबले जातात, दाबले जातात. कबीराला तर हे अगोदरच कळले होते. म्हणून माणसाच्या कळवळ्यापोटी पूर्वी हेच तर त्यांनी सांगून ठेवले.
          माटी कहे कुम्हार से तू क्या रौदे मोय
          एक दिन ऐसा आयेगा मैं रौदूंगा तोय
साधे सरळ तत्वज्ञान तुमची पण वेळ येईलच हे सांगणारे, बाणाच्या जागी आलेली आजची अग्निशस्त्रे मोडून टाकायची आहे का कुणाची हिंमत? असो. 

आवर्तनाच्या कडेकोट बंधनात स्वतःला बांधून घ्यावे असे कितीही वाटले तरी ते सहज शक्य नाही. कारण दूर डोंगरावरून झेपावणारा वारा कोणती बातमी आणून हे बंधन तोडायला भाग पाडेल, हे सांगता यायचे नाही. वाऱ्याला भान नसते, हे एक बरं आहे. जन्माजन्मांतरीचे हिशोब मागायला तो एका जागी थांबतही नाही.तो बरगडीच्या आतून (किंवा बरगडी पोखरून) जर निमिषार्धात परतला तर ठिकच आहे,अन्यथा बरगडीच्या जखमेवर विंचवाच्या नांग्या ठेवूनच त्याचा लेप लावावा लागेल.तेच एक गुणकारी औषध आहे. एक बरं आहे, नांग्याच्या लेपानी बरगडीच्या जखमा बऱ्या होतील पण अंतर्मनात झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी कोणते औषध लावायचे आणि त्यासाठी कुठल्या डॉक्टरकडे जायचे या विचारात सध्या मी आहे. कुणी काही सांगितले तर मी आज्ञाधारकपणे ऐकतो. होता होईल तेवढं करतोही.कारण करणे हे माझे कर्म आहे. नियतीचा फेरा कुणालाच चुकलेला नाही. भले भले या फेऱ्यात अडकले आणि नेस्तनाबूत झाले. रंकाचा राजा आणि राजाचा रंक ही नियतीची खेळी असेल तरी या खेळीचा एक भाग आपल्याही हातात असतो हे विसरून चालणार नाही. तो भाग म्हणजे आपले कर्तृत्व!
क्रमश: 
-भिवा रामचंद्र परब


Monday, 10 October 2016

रात्रीस खेळ चाले (गाऱ्हाणं)

आकेरीच्या नाईक कुटुंबात सध्या जे काय चाललेले आहे ते बघून माझ्यासारख्या अस्सल मालवणी माणसाला फार वाईट वाटले. दुसऱ्याच्या सुखात आपला सुख शोधणारा मालवणी माणूस नाईक कुटुंबावर एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटांनी व्यथित झाला नसता तर नवलच, त्यात छायाचा होणारा नवरा आणि गुप्त पोलीस हवालदाराच्या मृत्यूने तो आणखी काय काय होणार म्हणून चिंतेने ग्रासला. घरातला जाणता दत्ता याची सध्या चौकशी चालू आहे. मधेच कोणीतरी बातमी आणली या सगळ्यामागे निलीमाचा आणि सुसल्याचा हात आहे, आता नियमाने तो रात्री १०.३० वाजता आता पुढे काय घडेल म्हणून लवकर जेवून टीव्ही चालू करून बसतो. नाईक कुटुंब काही धुतल्या तांदळासारखे नाही, अण्णांनी आणखी काय काय घाण करून ठेवली म्हणून सगळे जण काळजीत आहेत. त्यांना अजूनही वेडी आशा आहे कि विश्वास नावाचा पोलीस अधिकारी तोतया असावा नाहीतर एवढे दिवस त्या घरात ऱ्हवाक त्येचो कुठ्लो पोलीस अधिकारी त्याका परमिशन देयत. पण येड घेवून पेडगावला जाणारी माणसे काय कमी नाहीत आणि आमच्या मालवणी माणसाला काय सांगायला नको (काय येतय काय काही ध्यानात? मालिका संपली कि विचारा, मग सांगतो) पण वादी-दुष्मनी कोणी असू दे त्याच्या घरात सुख नांदू दे यासाठी माझ्यासारख्या अनेक मालवणी माणसांनी देवांक गारायणी घातल्यांनी. त्यातल्या एका गारायण्यांक मिया उभो होतय. जा आयकल ता गारायणा :

बा देवा म्हाराजा, नाईक घराण्यावर जी  काय संकटा इली ती निवारूच्या साठी तुका गारायणा घालतत ता मान्य करून घे. हे  आदि नारायण परमेश्वरा, बारा पाच पुरी, देवी सातेरी, मायेचो पूर्वस, नाईक वस, रामेश्वर, रवळनाथ, आगयो येताळ, काळो देवचार, भावो वेताळ, बाराचो चव्हाटो, बाराची नीत, खैरोबोद, सिद्धमहापुरुष, गावडो गिरो, आज खासाखुस मालक, (व्हय म्हाराजा) तर देवा, आज हय् तुमका बारा पंच्यायतनाक तुळशीपानाचो इडो, (व्हय म्हाराजा) नारळ, केळी ठेयली आसत (व्हय म्हाराजा) त्यावर तू देवता राजी व्हवन, जी काय त्यांची मनोकामना आसा ती पूर्ण कर (व्हय म्हाराजा) आणि तुझी सेवाचाकरी करून घे.(व्हय म्हाराजा) त्याचपरमाणे तिऱ्हाईत देवतेक पाच तुळशीपाना ठेयली आसात. तुझा आणि त्या देवतेचा याक गणित करून तुझी तिऱ्हाईतकी घट करून ह्या लेकरांचा कल्याण कर....(व्हय म्हाराजा) त्याचपरमाने घरचो वस, निर्वशी, काशि कल्याणी बिरामण, दांडेकर बिराम, अवगत देवचार, मेलेली पितरगत, गिरोबा, इट्टलादेवी, सगळ्या देवांना मानपरमाणे पानपाकळी ठेयली आसा. (व्हय म्हाराजा)त्याच्यावर सर्व देवता राजी होवन तुमचा आणि पंचायतनाचा याक गणित करून या जमलेल्या लेकरांकडे, त्याच्या कुटुंबाकडे, (व्हय म्हाराजा) घरमटीकडे, जो काय किलेस आसात तो परिहार करून लेकरांची इच्छा, मनोकामना पूर्ण करून त्यांची सेवाचाकरी करून घे. (व्हय म्हाराजा) त्याचप्रमाणे आकेरीचा ह्या नाईक कुटुंब तुका गारायणा घालता म्हाराजा गेली काही वर्षा त्यांच्या घरावर संकटावर संकटा येतत. तेतुत्सून मार्ग काढूच्यासाठी तिराइत  देवान सांगल्याप्रमाणे भावकीतल्या पाचांका बोलवन पाच तुळशीपाना, योक आंब्याच्यो टाळ, ताब्यांची तार, गुंजभर सोना, सगळ्या देवांका नारळ, पांच केळी, जी कोण अवदसा त्रास दिता तिका केळीच्या पानावर हळद पिंजर लावलेलो दहीभात ह्या सगळा रस्त्याच्या जमिनीच्या वरच्या बाजूक ठेयला. नेणे वकिलांची जर काय त्या जागेवर आशा ऱ्हवली आसत म्हणान देवाच्या टेंभावर दोन कोंबे कापले पण देवा त्यांची संकटा काय कमी होनत नाय (व्हय म्हाराजा) देवा आमचो दत्तो घरातलो जाणतो. तरी ता लेकरू अज्ञानी आसा(व्हय म्हाराजा) त्याच्या सगळ्या गुन्ह्यावर पांघरून घाल. जो कोण विश्वास नावाचो पोलीस घरात शिरलो त्याका सुबुदधी दे. तो काय काय नको ता खोदून काढता त्याका पायबंद घाल. (व्हय म्हाराजा) मुळात तो पोलीस घरात घुसलो कसो? त्यांका परमिशन कोणी दिली? खाल्ल्या मीठाक जागाची त्याका बुद्धी दे. जर तो बरोबर काय पंचाक्री घेवन इलो आसत तर ता तियाच बघ. अभिराम देविकाचा लगीन जावन कितके दिवस झाले पण आजून काय पाळणा हालाचा नाव नाय. तो गणेश तसो. छायाचा लगीन ठरणा नाय. (व्हय म्हाराजा) यांच्या घरात कायमची रात.. कायमचो अंधार.. त्यांच्या लवकरात लवकर उजाडू दे रे देवा... (व्हय रेsssम्हाराजाssssss) 
-भिवा रामचंद्र परब



Sunday, 9 October 2016

पौराणिक नाटकांचा इतिहास


मिथक म्हणजे पुराणकथा अथवा दैवकथा. मिथक आणि नाटक याचे अतूट नाते आहे. मिथकातून नाटक उत्क्रांत होत गेले. हेच तथ्य समोर ठेवून मराठी पौराणिक नाटकाची आणि त्या निमित्ताने एकूणच नाट्यपरंपरेची जडणघडण कशी झाली ते विशिष्ट कालसंदर्भात "मिथक आणि नाटक" हे डॉ. तारा भवाळकर यांचे पुस्तक. या पुस्तकावर परीक्षणार्थ एक दीर्घ लेख दिनांक १९मार्च,१९८९ रोजीच्या दै. लोकसत्ताच्या 'लोकरंग' पुरवणीत लिहिला. नाट्य-अभ्यासकांना उपयोगी पडेल म्हणून येथे देत आहे

प्रारंभापासून १९२० पर्यंत मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण स्पष्ट करणारा प्रबंध डॉ. तारा भवाळकर यांनी पुणे विद्यापीठास सादर केला व पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर त्या वर्षीच्या सर्वोच्च प्रबंध म्हणून त्याला पुणे विद्यापीठाचा "डॉ. वि.रा. करंदीकर पुरस्कार" मिळाला. याच प्रबंधाचे लघुरुप म्हणजे "मिथक आणि नाटक" हे डॉ. तारा भवाळकर यांचे पुस्तक. केवळ पौराणिक नाटकाचाच नव्हे तर त्या अनुषंगाने एकूण नाट्याच्या उदयविकासाची मूलगामी मीमांसा करणारे हे पुस्तक नाट्यइतिहास आणि नाट्यसमीक्षा यांना वेगळे परिणाम प्राप्त करून देणारे आहे. मराठी रंगभूमीचा विकासक्रमभावे ते किर्लोस्करदेवल ते खाडिलकरकाही प्रश्न-काही उत्तरे अशा चार भागात पुस्तकाची मांडणी केलेली असून पुस्तकाच्या शेवटी १९२० नंतरच्या नाटकांचा धावता आढावा लेखिकेने घेतलेला आहे. पुस्तकाला प्रस्तावना श्री. रा. चिं. ढेरे याची आहे.

मिथक म्हणजे पुराणकथा अथवा दैवतकथा.मिथक आणि नाटक याचे अतूट नाते आहे. मिथकातून नाटक उत्क्रांत होत गेले. हेच तथ्य समोर ठेवून मराठी पौराणिक नाटकाची आणि त्या निमित्ताने एकूणच नाट्यपरंपरेची जडणघडण कशी झाली ते विशिष्ट कालसंदर्भात डॉ. भवाळकर यांनी उलगडून दाखविले आहे. विष्णुदास भावेअण्णासाहेब किर्लोस्करकाकासाहेब खाडिलकर या तीन नाटककारांना प्राधान्याने विवेचन-विषय बनवून त्यांनी परंपराशील नाट्यरूपापासून आधुनिक तंत्राच्या प्रगल्भ नाटकापर्यंत पौराणिक नाट्यसृष्टी बारकाईने तपासली आहे. या अभ्यासातील संशोधनातील त्यांचे मुख्य सूत्र मिथकाशी निगडीत आहे. मिथक आणि नाटक यांच्याशी निगडीत आहे.

मंत्रसामर्थ्याने अर्थात यातुविद्येने इप्सित साध्य होते म्हणतात.तसेच यातुशक्तीचा केंद्रीकरण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या मंत्रात आहेअशी यातुविधीची केंद्रवर्ती सत्ता म्हणजे मांत्रिक वा पुरोहित असतो. त्याच्या देहात प्रारंभ इथेच होतो. मानवाच्या जीवनातील प्रत्येक विधीत नाट्य आहे. सातत्याने मंत्र म्हणण्याचे यातुविधीतील कार्य विधिनाट्यात कथा गायकांच्या रूपाने भागवत सूत्रधाराकडे आणि विष्णुदासाच्या सूत्रधारापर्यंत येऊन पोहचते. म्हणजेच यातुविधीतील मांत्रिकच उत्तरावस्थेतील विधिनाट्याच्या सूत्रधार आणि आजच्या नाटकाचा दिग्दर्शक-व्यवस्थापक आहे.

सरळ पुराणकथा दृश्य रूपात मांडणे या भावेकालीन हेतूपासून आधुनिक-पौराणिक रंगभूमीचा प्रारंभ होतो. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी सांगली येथे "सीतास्वयंवर" हे मराठीतील पहिले नाटक लिहून त्याचा प्रयोग केला. या नाटकाच्या लिखित स्वरूपाबद्दल लेखिका लिहितेआज संवादयुक्त नाटकाची जी कल्पना आहेतिच्यापासून वाड.मयदृष्ट्या हे नाटक फार दूर आहे. कारण कथासूत्र गुंफलेली ही विविध पद्यांची मालिका आहे.पात्रमुखी काव्य (पद) नाही. एकाच व्यक्तीने कथन केलेली हि पद्यात्मकथाअसेच या काव्याचे स्वरूप आहे. मात्र एक व्यक्ती पद्यात्मक कथन करीत असता ती दृश्य अभिनित करण्याची अपेक्षा व सोय त्यात आहे. काव्यगुण फार नसून कथाकथन-कौशल्य तेही घटनाप्रधान कथा सांगण्याचे कौशल्य आहे. या पहिल्या प्रयोगानंतर रामायणापैकी दहा नाटके भावे यांनी सादर केली. पण यावर कीर्तनदशावतारी मेळेकर्नाटकी भागवततमाशालळीत इत्यादीचा पगडा बसून सिद्ध झालेली दिसतात

१९ व्या शतकाच्या मध्यावर असलेला भारतीय समाजपारंपरिक अंधश्रद्धा जपणारा होता. अर्थात त्या श्रद्धेला खतपाणी मिळेलअसे बरेच घटक त्या खेळात होते. प्रारंभी गणपतीसरस्वतीब्रह्मदेव इत्यादींच्या प्रार्थनात्याचे आगमननर्तनआशीर्वचन इत्यादी गोष्टी धर्मश्रद्ध मनाच्या भावना जपणाऱ्या होत्या. एकूण कथावस्तू व प्रयोगपद्धती या पारंपरिक धार्मिक बैठकीवर आधारलेल्या विधिनाट्याशी (ritual drama) जवळीक साधणाऱ्या होत्या. पण हळूहळू त्याच्या नाटकातून धार्मिकता गळू लागली.

विष्णुदास भावे यांच्या नंतरचे क्रांतिकारक नाटककार म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर. त्यांनीही आपल्या नाट्यलेखनाचा प्रारंभ भावे पद्धतीच्या नाट्यलेखनाने व त्या पद्धतीच्या प्रयोगाने केला. पण त्यांच्या 'सं. शाकुंतलया चार अंकी नाटकाच्या प्रयोगाने  मराठी रंगभूमीवर  'संगीतया विशेषणाने मंडित अशा नाटकाचे युग अवतरले.संगीताच्या स्वतंत्र सामर्थ्याचा प्रत्यय आला तर सं.सौभद्रात संगीत आणि गद्य या दोन्हीच्या समसमासंयोग झालेला दिसतो. हीच परंपरा खाडिलकरांपर्यंत अविरत चालली. पण पौराणिक नाटक संगीतप्रधान असावे या (गैर)समजाला प्रथम शह दिला तो खाडिलकरांनीं१९०७ साली लिहिलेले 'किचकवधहे नाटक संगीताविरहित असूनही परिणामकारक तारले. कारण कथावस्तू- बाह्य साचा- कल्पनाबंध हा जरी पुराणातला असला तरी त्याची हाताळणीमांडणीत्याचा अन्वयार्थ हे बदलले की आविष्काराची जुनी रीतही बदलते. सामाजिक आशयसामाजिक परिस्थिती यातूनच प्रकट होतो. सामाजिक विषयावरचे 'शारदाहे देवलाचे नाटक सोडले तर त्यांची अन्य नाटके भाषांतरित-रूपांतरित आहेत.

आज आपल्यासमोर असलेले नाटक हे पूर्णपणे धर्मश्रद्धेच्या बाहेरचे नाटक आहे. तरी त्याचे मूळ कोणत्याही नाटकाप्रमाणे यातुविधीत आहे. यातुविधि-विधिनाट्य ते आजच्या लौकिक अवस्थेपर्यंत नाटकाचा विकास ही उत्क्रांती प्रक्रिया आहे.त्यामुळे विकसित अवस्थेतही पूर्वावस्थेच्या खाणाखुणा शिल्लक दिसतात. भावेकिर्लोस्करखाडिलकर या मराठीतल्या १९२० पर्यंतच्या तीन प्रमुख नाटककारांच्या नाटकातून मराठी पौराणिक नाटकाच्या विकासक्रम स्पष्टपणे आढळतो. 

डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेले हे पुस्तक नाट्य इतिहासप्रेमींना अतिशय उपयुक्त असेच आहे.

-भिवा रामचंद्र परब 


Saturday, 8 October 2016

मनाच्या आरशातील दोन चित्रे (उत्तरार्ध )

 "हिंदुस्थानच्या सीमेवर आपले सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देतात म्हणूनच आपण येथे सुखाने झोपू शकतो. हिवाळ्यातल्या थंडीने आपल्या अंगात कापरे भरतेमग महिनोन महिने सीमेवरच्या बर्फात पहारा देणाऱ्या सैनिकांचे काय हाल होत असतील. त्याशिवाय पाकिस्तानी सैनिक आणि त्यांनी पोसलेले अतिरेकी यांच्या कचाट्यात सापडलेल्यांचे काय होते त्याचा हिशोब कुणाकडे नसतो. हिंदुस्थानसाठी लढणाऱ्याआपले कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांसाठीत्यांच्या कार्यासाठी सलाम! एक कराजर त्यांच्याबद्दल तुम्हांला आदर दाखवायचा नसेल तर निदान त्यांच्याकडे संशयाचे बोट दाखवू नका... विचार करा
मुंबईला येण्यासाठी एक्स्प्रेसमध्ये  बसलो तरी. ते दृश्य डोळ्यासमोर तरळत होते. त्या बाळाचा अकाली प्रौढ झाल्यासारखा चेहरा सारखा समोर येत होता. पण याला छेद देणारे जीवनाचे दुसरे रूप समोर आले ते एका म्हातार बाबाच्या रूपानं.

माझा प्राध्यापक मित्र तसा गोष्टीवेल्हाळबाजूला बसलेल्या दोन भैयांची मस्त फिरकी ताणत आमचा प्रवास चाललेल "अगर आप दिल्ली में मिले होतेतो आपका  कौनसा भी काम फोन पर ही कर देते"  या त्यांच्या बढाईवर "जब आप कभी मुंबई मे आयेंगे तो फोन करनाहम मुंबई के मशहूर पत्रकार हैं"(त्यावेळी  माझं पाक्षिक नुकतंच चालू झाल्यामुळे मी पत्रकार असल्याचे सगळ्यांना ठणकावून सांगत असे) अशी कडीवर कडी करीतप्रवासाची मजा लुटीत आमचा वेळ चालला होता.

मध्येच कुठलंतरी स्टेशन आलं आणि एक पोरगेलासा दिसेल असा तीसेक वर्षाचा तरुण गाडीत चढला आणि त्याचीही फिरकी घेण्याची आम्हांला लहर आली.
"कुठे चाललास"
"प्रथम मुंबईलातेथून मद्रासला जाणार."
"काम काय करतोस?"
"सैन्यात आहेकाश्मीर खोऱ्यात-पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली जरा घुमके आता हूँ" साध्या सैनिकाला प्रश्न काय विचारायचे म्हणून आम्ही गप्प बसलो तर तो आमच्यापेक्षा गोष्टीवेल्हाळ निघाला. बोलता बोलता त्याने आमची सर्व माहीती काढून घेतली. तोपर्यंत खूप रात्र झाली होती. झोपी गेलो.

सकाळी उठून ताजेतवाने झाल्यावर गप्पा मारताना काश्मीरचा उल्लेख होणे अपरिहार्यच होते.त्याला खूपच माहिती होती. काश्मिरात नुकताच घडलेला बॉम्बस्फोट ज्याचे वृत्त कुठल्याच वृत्तपत्रात आले नाही. या स्फोटात मेजर जनरलसह पाच अधिकारी मारले गेले होते. अतिरेक्यांचे शरण नाट्यभारत पाकिस्तानचे राजकीय नाट्यबर्फात 'बंदे'(जवान)चे होणारे हालगोळी कुठून येईल आणि शरीराला छेदून जाईल याचा भरवंसा नाही. त्याशिवाय अतिरेकी/पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडल्यावर त्यांच्याकडून होणाऱ्या अमानुष हत्या (उदा.चमच्याने डोळे काढणे,नखे ओढून काढणेएक एक बोट तोडून टाकणे.इत्यादीजे सामान्य लोकांना केव्हाच समजत नाही) मुंबईत तीन रुपये लिटरने मिळणारे रॉकेल बर्फावरील छावणीत पोहचेपर्यत रुपये तीनशे रुपये लिटर होते याच्या आकडेवारीतून दर दिवशी संरक्षणविषयी केंद्र शासनाचा होणारा खर्च किती अफाट होतो याची तो माहिती आम्हाला देत होताअधिकारवाणीने बोलत होता. अर्थात येथे ही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहेहे लक्षात घेणे आवश्यक आहे. सध्या मुंबईत रॉकेल ४०रुपये लिटर आहे. तो तरुण असलिखित इंग्रजीत भारत पाक संबंधांबद्दल आणि पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल अधिकारवाणीने बोलत होता. त्याची मते स्पष्ट होती. जर राजकारण्यांनी राजकारण केले नाही आणि लष्कराचा निर्णय ग्राह्य धरला तर काश्मीर प्रश्न काही दिवसांत सुटू शकतो. कारण काश्मीर सर्वसामान्य जनतेला होणारी दुहेरी जाचातून सुटका हवी आहे. मग राज्य कुणाचेही येवो. काश्मिरी जनतेला कसा त्रास होतो आणि कुंपणच शेत कसे खाते याचे एक उत्तम उदाहरण त्याने दिले.

रात्री अपरात्री अतिरेकी तोंडावर फडका बांधून येतात आणि धमकावतात. 'अमुक एक रक्कम  द्यानाहीतर गोळ्या घालतो. कुटुंब घाबरून रक्कम देते. सकाळी हेच अतिरेकी पोलीस बनून येतात आणि धमकावतात" रात्री तुमच्याकडे अतिरेकी आले होते आम्हांला पक्की खबर आहे. चला आत" आणि मग त्यांच्याकडून आणखी रक्कम वसूल करून त्यांना सोडून दिल्याचे नाटक केले जाते. जे अतिरेकी करतात तेच पोलिसही करतात. आपल्या तीन बंद्यांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या तेव्हा चिडून आपल्या जवानांनी दहा अतिरेक्यांनी कसं टिपलं हे सांगताना त्याचा चेहरा अभिमानाने फुलला होता. तर ऐशी कॉलेज कन्यकांवर पाशवी बलात्कार करून अखेरीस लष्कर मागे लागल्यावर शरण आलेल्या अतिरेक्याला कोणतीही दयामाया न दाखविता त्याच्या मस्तकावर गोळ्या झाडल्या हे ही त्याने सांगितले. अतिरेक्याला असे मारण्यामागे त्याचे कारण तसे संयुक्तिक होते. शरण आलेल्या अतिरेक्याने ऐशी तरुणींना आयुष्यातून उठविले होते. त्याला पकडून तुरुंगात टाकले असते तर कोणी सांगावं एखाद्या नेत्याला त्याचा पुळका यायचा आणि त्याने त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करायचा. आम्ही शंभर दिवस खपून यशस्वी व्हायचं आणि त्याने एका दिवसांत त्यावर बोळा फिरवायचा-हेच त्याचे दु:ख होते.

आम्ही हे सगळे त्याच्या तोंडून ऐकताना मनात एकच प्रश्न होता. एका साध्या जवानाला एवढे अधिकार असतात काय?  त्याचे उत्तरही लगेच मिळालेआम्ही ज्याला साधा सैनिक समजत होतो तो शीख रेजिमेंटचा मेजर होता. आयत्या वेळी मिलिटरीच्या स्पेशल डब्याचे रिझर्वेशन मिळाले नाही म्हणून आमच्या डब्यातील रिझर्वेशन त्याने घेतले होते.

एवढ्या तरुण वयात मेजर हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक होते. पण त्याचे ओळखपत्र पाहून खात्री पटली आणि अरे-तुरे वरून आमची संबोधने आदरार्थी झाली. आणि ते त्याच्याही लक्षात आले. "नही  दोस्तदोस्ती मे ताल्लुकात की क्या बात हैमै तो दोस्त हूँ आपकादोस्तआपके लिए सिर्फ दोस्त! आम्हांलाही त्याच्या दोस्तान्याची ओळख पटली. एक कथित पत्रकारएक प्राध्यापक आणि एक मेजर. तिघांच्या गप्पात वेळचे भान कुणालाच राहिले नाही.

गाडी कुठल्या तरी स्टेशनात थांबली. पोटात भूक होती म्हणून खाली जाऊन तिघांसाठी खाणे आणले. आमच्या पिशवीत शेव चिवडा होता. तो ही  बाहेर काढला.  आम्ही तिघेजण त्यावर तुटून पडलो. गाडी सुटता सुटता आमच्या रिझर्वेशन डब्याच्या मोकळ्या जागेत एक म्हातारा येऊन बसला. हातापायाच्या काड्यामळकट धोतरफाटके शर्टहातात काठीतिथे बसता बसता तो आडवाच झाला. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे डब्यात उष्ण हवा होती. डबा बहुतांशी रिकामा होता. त्यामुळे आमच्या मेजर मित्राने दया त्याला येऊन सीटवर बसायला सांगितले. तो बाजूच्याच सीटवर संकोचून बसला.
मी आमच्या पुढ्यातील थोडे पदार्थ घेतले आणि मेजरच्या आग्रहावरून त्या म्हाताऱ्याला देवू लागलो. पण तो म्हातारा काही घेईनाअधिक आग्रह केला तेव्हा त्यानं घेतलाथोडं खाल्यासारखं केलं आणि पुरचूंडी बांधून ठेवली आणि आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत तो सांगू लागला, "माझ्या घरी माझी वाट पाहणारं एक लेकरू आहे आईबापाविना"त्याच्या सांगण्यानुसार त्याची एकुलती एक लेक म्हाताऱ्याच्या पदरात एक पोरं टाकून निघून गेलीपाठोपाठ जावयाचे राम म्हटलाआणि म्हाताऱ्याबरोबर लेकराच्या वाटेला दुःख आलंम्हाताऱ्याने रानातल्या काटक्या लाकडे विकून दोघांच्या उदरनिर्वाह चालविला. पण म्हाताऱ्याच्या वयोमानानुसार आता तेही काम जमत नाही. आणि म्हातारा फक्कन रडला, "भीक मागतो स्टेशनवरमाझं काय लाकडं गेली मसणातपण माझ्या लेकराचं काय होणारत्याच्यासाठी जीव तीळ तीळ तुटतो माझा"

म्हाताऱ्याने डोळे पुसलेआमचा मेजरही मित्र आतून हेलावलादुसऱ्या स्टेशनात गाडी शिरता शिरता म्हातारा काठी टेकीत उठला आणि लगबगीने खाली उतरू लागलाएक सेकंद आमच्या तिघांच्या नजरा एक झाल्या आणि प्रत्येकाने खिशात हात घातला. तिघांनीही हात बाहेर काढले तेव्हा पन्नासेक रुपये झाले. क्षणार्धात मेजर उठला आणि घाईघाईने खाली उतरून ती रक्कम म्हाताऱ्याच्या हातात कोंबली. प्लॅटफॉर्मवरून म्हातारा दिड:मुख होवून तसाच हातात पैसे धरून उभा होता आणि गाडी हाललीपिकल्या दाढीतून दोन असावं ओघळलीम्हाताऱ्याने हात जोडलेआम्हाला तो आशीर्वादच वाटला. आम्ही फक्त एवढंच  करू शकत होतो.
-समाप्त- 
-भिवा रामचंद्र परब