Tuesday, 3 January 2017

मुलीचा हट्ट धरणारा तो एक 'बाप' होता.

मोडकी खुर्ची सरकवून मी अभ्यासाला बसले. नुकतीच शाळेतून आले होते. चहा पिवून बाहेर हुंदडायला पडायचे होते. पण आईचे बारीक लक्ष होते. तिला चुकवून बाहेर पडणे शक्य नव्हते. म्हणूनच खाली मन घालून अभ्यासाचे केवळ नाटक करीत होते. पण लक्ष बाहेरच होते. दुसरंही एक कारण होतं. आईने मला खेळताना पाहिलं असतं तर कामालाच जुंपले असते. मला तर तेच नको होते.
आई आत बाहेर करीत होती, तशीच माझी नजरही आत बाहेर भिरभिरत होती. माझी भिरभिरती नजर तिनं ताडली आणि त्याचबरोबर ताडले तिनं माझं अभ्यासाचे नाटक!
अवदशे, बसलीस का इथे अभ्यासाचे नाटक करीत?” दाणादाण पाय आपटीत ती धावत आली. माझ्या हातातली पुस्तके तिने खसकन ओढली आणि भिरकावली. मी बसलेल्या खुर्चीवर तिनं दाणकन लाथ घातली. मी कोलमडून पडले तशीच ती ओरडली जा,जा कामाला लाग, आली मोठी अभ्यास करणारी! जन्माला आली आणि बापाला खाऊन बसली. धुसमुसत माझ्या पाठीवर दोन चार धपाटे माझे विव्हळणे आणि तोंडाने आजीचा धावा.
अग, कशापायी,पोरीवर वराडतिया?’ आजी तरातरा माझ्याकडे आली. मी तिच्या प्रेमळ पदराखाली दडले. माझी बाय ती, उगी, उगी! आजीचा प्रेमळ हात माझ्या पाठीवर फिरू लागला आणि त्या मायेने आणखी कढ आला. मी हमसाहमशी रडू लागले.  माझी बाय ग ती आजी पुन्हा पुन्हा मला गप्प करू लागली त्याच बरोबर ती आईला बोलू लागली. 
बाय ग, तुझे दु:ख मी जाणतेय, पण काय ग हा सगळा राग तू या कोवळ्या पोरीवर काय काढतेस? तुझ्या नवरा गेला, त्यात या पोरीचा काय दोष! तुझा नवरा तो माझा का कुणीच नव्हता? आज सा वर्ष झाली. का तु असा पोरीचा  छळवाद मांडला आहेस आता आजीचं धुसफुसणं चालू झालंपण ते ऐकायला आई होती कुठे? ती केव्हाच आत गेली होती. आजीचं बडबडणं चालू होतं अगदी मी झोपेपर्यत तरी ...आई चूप!
सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा हा प्रसंग आठवून मला हसू आले. हल्ली हा एक नवीनच छंद जडला होता. तो म्हणजे मुलं सुना कामावर गेली की नातवंडाशी खेळता खेळता मी भूतकाळात शिरते. आईच्या शिव्याशापाने विणलेल्या त्या माझ्या बालपणात मी नकळत गुरफटते. कधी हसते, कधी रडते आणि कधी त्या आठवणीने शहारते. आई नच वैरीण तू म्हणतानाच आजीची ठळक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. कारण सुदैव आजीच्या रुपानं माझ्या पाठीशी उभे होते, म्हणूनच माझं निभावलं अन्यथा आजचा दिवस पहायलाही मी जिवंत राहिले नसते खास, असे मला राहून राहून वाटते. 
स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ,ब्रिटीशांच्या गुलामगिरीतला. खावून पिवून सुखी घरातला जन्म, परंतु माझ्या जन्मांपूर्वी घरात बरेच रामायण घडले होते. माझे बाबा मिलिटरीत होते. आईशी लग्न होण्यापूर्वी त्यांची दोन लग्ने झालेली होती. अर्थात माझ्या सावत्र आयांना मुले काही झालीच नाही म्हणून बाबांनी तिसरे लग्न केले. माझ्या अगोदर आईला तीन मुले झाली आणि जन्मताच मेली. इथे एक सांगितले पाहिजे की, माझ्या बाबांना मुलींची खूप आवड होती. प्रत्येकवेळी मुलीच व्हावी असे त्यांना वाटे. तर उलट आईच. तिला मुलगाच हवा होता. आईच्या चौथ्या वेळी दोघांनी आपापल्या परीने देवाला नवस केले.
माझ्यावेळी आईला दिवस जाताच तिला कोणीतरी सांगितले की, तुझे जन्मलेले मुल कुणाच्यातरी ओटीत घाल म्हणजे ते जगेल. अशा घटना घडल्याचे कुणी कुणी सांगितले. पाचव्या महिन्यात बाबाही एकदा आईला पाहून गेले.
हे सारं  सांगणारी माझी आजी मला अजूनही आठवते.मी जसजशी वयात येऊ लागले तसतसे कळू लागले.बालपणातले सारे आजी मला सांगू लागली. आजीच माझी आई झाली होती. सारंऐकून अस्सा राग यायचा, पण आज कळतात तिच्या वेदना,तिचं दु:ख परंतु आज आजी जिवंत नाही अन आईही..
हं, तर मी काय सांगत होते? आईला सातवा महिना असावा-एक जबरदस्त बातमी घरात आली. बाबांची कुठल्यातरी बर्फाळ प्रदेशात नेमणूक झाली होती, आजीला त्या बर्फाळ प्रदेशाचे नांव माहित नव्हते आणि मीही ते समजून घेतले नाही. बाबा ड्युटीवर असताना बर्फाचा कडा कोसळला आणि बाबासह सर्वजण जिवंत गाडले गेले. प्रेताचाही पत्ता लागला नाही.
अशाच आशयाचे पत्र घरात येताच हलकल्लोळ माजला. परंतु आजी धीराची. तिनं आईला धीर दिला. तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. घर कोसळता कोसळता सावरले ते आईने.
आईने सर्वाना सांभाळून घर चालवायला सुरवात केली. घर सुखवस्तू होते. कारण बाबांना जो काही पगार मिळत होता तो त्यात घर व्यवस्थित चाललात होते. परंतु बाबांच्या मृत्यूमुळे घरात येणारी आवक बंद झाल्यामुळे घर खर्चाची ओढाताण होऊ लागली. घरात असलेल्या अन्नधान्यावर गुजराण होईना, सगळी जबाबदारी आईवरच आणि त्यात करून आईला दिवस गेलेले.
आणि या साऱ्याचा राग आई माझ्यावर काढायची. माझा जन्मही झाला नव्हता. माझे पाय भुईवर लागले नव्हते तरी आई आधीपासूनच शापाचे जाळे माझ्याभोवती विणीत होती, पण म्हणतात ना मांजराचे दात तिच्या पिलाला लागत नाहीत, तसंच झालं. मला काही सुद्धा न होता माझा जन्म झाला. आईच्या म्हणण्याप्रमाणे बापाला खाऊन जन्मलेली मी, मरायलाच हवी होती. परंतु जगले. कदाचित बाबांचे आशीर्वाद आईच्या शापापेक्षा श्रेष्ठ ठरले असावेत.
मी जगलेले घरातले एकुलते एक अपत्य. बाबा असते तर..तर मला सर्वांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले असते. माझे कोडकौतुक झाले असते. पण कसचं काय? तर कसचं काय? सारंविपरीत घडलं.
आज काळ बदलला, समाज, रीतीरिवाज सारे बदलले. स्त्री पुरुष भेदाभेद राहिले नाहीत तरी सुद्धा मुलगी पेक्षा मुलगाच हवा ही भावना समाजाच्या कानाकोपऱ्यात घर करून आहे. सत्तर वर्षापूर्वीचा काळ त्या मानाने खूपच मागासलेला होता. त्यात करून माझे खेडेगांव. शहरी संस्कृतीपासून दूर पुरुषी वर्चस्वाखाली स्त्री भरडली जात होती, अशा परिस्थितीत माझ्या बाबांना मुलगी हवी होती हे ही एक आश्चर्यच! माझा जन्म झाला तोच मुली आईच्या मनाविरुद्ध आणि बाबांच्या मुळावर... आईने त्यावेळी माझ्या गळ्याला नख लावले नाही हे माझे नशीब. परंतु माझी फरफट करण्याचे मात्र तिने मनाशी निश्चय केला असावा.
माझ्या जन्मानंतर ना खुशीने का होईना, मला दुसरीच्या ओटीत घातले. आजीचा दणका होताच. माझ्या आईची अपेक्षा अशी होती की माझ्या पुढच्या तिन्ही भावंडाप्रमाणे मी ही काही दिवसांची सोबती आहे.परंतु छे! एक महिना गेला, दुसरा महिना गेला, मी जगले आणि जगतच राहिले.
आईच्या खस्ता वाढल्या. हाता तोंडाचा मेळ जमेना. त्यामुळे ती कष्टी होऊ लागली आणि त्या आईच्या रागात मात्र मी विनाकारण आणखी होरपळू लागले.
आपण आपल्या घरच्या कुत्र्याला अथवा मांजराच्या पिलाला जेवढी माया दाखवितो, तेवढी सुद्धा तो दाखवीत नव्हती. का कोण जाणे? वडिलांच्या मृत्यूला  मी कारणीभूत आहे हे तिनं मनावर घेतलंते अखेरपर्यत सोडलं नाही. आजी ताडताड बोलायची. तेवढ्यापुरती ती मला जवळ करायची. आजीचं लक्ष नाही असे पाहून ती पुन्हा मला बाजूला करायची. आईच्या या निष्ठूर वागण्याचे मला अजूनही आश्चर्य वाटते अजूनही...
आई माझ्याबाबतीत एवढी विशिप्त वागायची की, केव्हा केव्हा मला ती जवळ घ्यायची नाही. दुधही पाजायची नाही. मी जास्तच रडायला लागली की, ती कळवळून आईला विनवायची, “बयो, मी तुझ्या पाया पडते, दुध पाज तिला
मरू दे तिला खड्डा खण आणि पुरून टाक तिला, मला तोंड सुद्धा बघायचे नाही तिचे! आई करवादायची.
अग,अग असंकाय करतेस?पोर बघ कसं टाहो फोडतंय कळवळून, आई आहेस की कोण?राक्षसिणी कुठं फेडशील हे पाप शेवटी ती फणकारायची.
बापाला कौन बसली आणि आम्हाला हा वनवास आला, मला खस्ता खाव्या लागतात बाबांचे नांव आले की, आईच्या डोळ्यातून पाणी गळायचे आणि आजीही विरघळायची. माळ हळूच आईच्या ओटीत ठेवायची आणि लेकाच्या आठवणीने तीही कुठल्या तरी कोपऱ्यात कुढत बसायची.
कुठल्याही संदर्भात माझं नांव आले की, आई विलक्षण संतापायची. बापाला खाऊन बसली या शब्दाने तिची सुरुवात असायची. तर रांड, अवदसा, पांढऱ्या पायाची हे शब्द माझ्यासाठी जागोजागी पेरलेले असायचे.
दिवस येत होते आणि जात होते. आईपेक्षा आजीच्या पदराखाली मी वाढत होते. घरकामात मदत करू लागले, तीही आईच्या आग्रहाखातर! तरीही धुसपूस चालू असायची.
माझ्या शाळा प्रवेशाच्या वेळी तिनं असाच मोडता घातला. अर्थात आताचा शाळा प्रवेश आणि त्यावेळचा शाळा प्रवेश यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
आईच्या त्रासातून घटकाभर तरी पोरीची सुटका होईल या हेतूने (पोर शाळेत गेली तर चार बुकं शिकेल म्हणून नव्हे बरं का?) आई घरी नसताना एक दिवस आजीने माझं बोट पकडून मला शाळेत पोहचविले. माझ्याकडे ना पाटी पेन्सिल, तरीही वर्गात बसले.
आई घरी आली. संध्याकाळी शाळेत जायला मिळतंय या आनंदात खेळून, दमून भागून घरात आले तर आईला मी शाळेत गेल्याचे कळले. तिनं हाती जे मिळेल त्यांनी मला झोडपून काढले. नेहमीप्रमाणे आजी मध्ये पडली. कधी नव्हे ते तिनं आईला दोन चार ठेवणीतल्या शिव्या हासडल्या आणि मला सोडवून घेतलं. मला आजही हे स्पष्टपणे आठवतेय.
आजी आणि आई केव्हाच भांडल्या नव्हत्या, निदान माझ्या समजुतीत तरी. पण त्या दिवशी दोघांचे जंगी भांडण झाले. दोन चार दिवस बोलणे नव्हते दोघांचे. त्यावेळी दोघांची अजाण मध्यस्त मी! आणि हळूहळू मला समजायला लागले.एकाच वेळी आईविषयी राग-लोभ-भयाच्या व्यामिश्र भावना गर्दी करायच्या. आईच्या छळामुळे एक दोनदा सोडण्याचा प्रयत्न केला खरा प्रत्येकवेळी समजावणारी, समजूत घालणारी आजी मध्ये असायची.
कालांतराने लग्न ठरले. माझ्या सुदैवाने चांगल्या घराण्यात पडले.आजीने पोट भरून आशीर्वाद दिला अन आईच्या पाया पडायला वाकले नि चमत्कार झाला. कालपर्यत दु:स्वास, तिरस्कार करणारी माझी आई मला मिठीत घेऊन हमसाहमशी रडत होती. मीही तिच्या कुशीत  शिरले, जणू कित्येक वर्षाची भरपाई करून घेत होते मी. या आसवांत तिच्याबद्दलचा आकस, संताप धुवून गेला.
आज मी माझ्या नातवंडाची आजी आहे. जेव्हा जेव्हा मी त्या मुलांत रमते, तेव्हा माझ्या बालपणाच्या या आठवणी मनात फेर धरतात. आजी पदाच्या या पायरीवर माझी कुणाकुणाशीही कटुता नाही, आकस नाही. माझी प्रेमळ आजी आणि संतापणारी आई माझ्या स्मृतीत आहेतच पण त्याच बरोबर आजीने सांगितलेल्या पण कधीही न पाहिलेल्या बाबाविषयीचे एक धूसर चित्र मी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवले आहे. कारण मुलीचा हट्ट धरणारा असाही तो एक 'बाप' होता.

-भिवा रामचंद्र परब 


No comments:

Post a Comment