महाभारत...महर्षी
व्यासरचित एक अजोड ग्रंथ. भारतीय नीतीशास्त्रे, धर्मतत्वे, व्यवहारज्ञान,
ज्योतिषशास्त्र, राज्यधर्म, उपनिषदे, अनेक कथा...उपकथा सांगणारे काव्य...एक
कांदबरी...एक नाट्यवस्तूही आहे, म्हणूनच अनेक सृजनशील कलावंताना पौराणिक
नाटकांपासून आजच्या कथा-कादंबऱ्या-ललित लेखांपर्यत अनेक विषय महाभारताने पुरविले.
आजपर्यत महाभारतावर अनेक पुस्तके प्रसिद्ध
झालेली आहेत, होत आहेत. त्यातील ‘महाभारतातील स्त्रियांचे मनोधर्म’ हे प्रा.डॉ.सौ.सुनेत्रा देशपांडे यांचे हे पुस्तक. प्रबंध अभ्यासाच्या
निमित्ताने त्यांनी महाभारतातल्या स्त्री–व्यक्तिरेखांचा अभ्यास केला त्यातून हा ग्रंथ सिद्ध झालेला
आहे. महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखांचे आकलन-रेखाटन त्यांनी विविध पातळ्यावरून
वेगवेगळ्या पद्धतीने केल्याचे आढळते. त्यात प्रामुख्याने कुंती, गांधारी, द्रौपदी, सत्यवती यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तकात स्त्री पर्वाचे एकत्रित अभ्यासपूर्ण
विवेचन करण्यात आलेले असून एकूण सहा प्रकरणातून महाभारतातील स्त्रियांचे मनोधर्म
दर्शविण्याचे प्रयत्न केला आहे.
कुंती, गांधारी, द्रौपदी या महाभारतातील तीन प्रमुख
व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखांत विलक्षण तेज आहे. उदात्तता आहे. कर्णाने मातृत्व
नाकारणे हा कुंतीचा बाह्यकारी पराभव असला तरी स्त्रीला तो आपल्या मातृत्वाच्या
अंतिम विजयच वाटला असेल. पाच पुत्रांच्या कल्याणासाठी त्यांचे तेज ती अखेरपर्यत
जोपासत राहिली पण राज्य मिळताच ती विरक्त झाली. निपुत्रिक झालेल्या मातेचे मातेचे
दु:ख तिनं जाणलं आणि पुत्र शोकाने विव्हळ झालेल्या दीर-भावजयीची सेवा करण्यास ती
त्यांच्या बरोबर निघाली.
डोळ्यावर बांधलेल्या पट्टीतून डोळसपणे पाहणारी
माता गांधारी ही दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा. ती अतिशय बुद्धिमान असल्यामुळे
पुढचे भवितव्य तिला स्वच्छ दिसते आणि म्हणूनच आपल्या शंभर पुत्रांच्या आणि
कुरुकुलाच्या भीषण भवितव्याविषयी सतत चिंतीत असते. दुर्योधन युद्धावर जाण्यापूर्वी
आशीर्वाद घेण्यासाठी आला असता ‘जिकडे धर्म तिकडे जय’ असा आशीर्वाद दिला. पण कितीही असली तरी ती माता आहे आणि पुत्रांना
वाचविण्याच्या आत्यंतिक तळमळीतून ती विव्हळ होत असेल.विधिलिखित टाळणे गांधारीला
शक्य झाले नाही. शतपुत्रांची माता बघता बघता निपुत्रिक झाली. संपूर्ण महाभारतात
गांधारी न्याय-नीती, धर्म-अधर्म यांच्याबातीत कमालीची जागरूक दिसते.
महाभारतातील मध्यवर्ती स्त्री व्यक्तिरेखा
म्हणजे द्रौपदी...याज्ञसेनी. तिचा जन्मच मुळी प्रतिशोधातून झाला. महाभारतात ती एका
वेगळ्याच तेजाने तळपते. एकाच वेळी मर्यादांची पूर्ण जाणीव, स्व:हक्क, सामर्थ्य यांचा सार्थ अभिमान तसेच सतत धगधगणारी
अस्मिता यांचे अनोखे मिश्रण तिच्यात आहे. युधिष्ठर समेटाची-क्षमेची भाषा करतो
तेव्हा ती कृष्णाला म्हणते, “पेटलेल्या अग्नीप्रमाणे हा संताप आज तेरा वर्षे
मी पोटात साठवत आहे. युद्धाच्या क्षणाची मी आतुरतेने वाट पहात आहे. पांडव जर
त्यांच्याशी युद्ध करण्याचे नाकारीत असतील तर माझे पुत्र, माझा अभिमन्यू माझ्यासाठी युद्ध करेल.”
महाभारत हा एक सूडाचा प्रवास असल्याचे म्हटले
गेले आहे. त्या सुडाचे समर्थ दर्शन स्त्री-चित्रात प्रभावीपणे घडते. सौ. देशपांडे
यांनी नेमके प्रसंग उद्धृत करून त्यातून स्त्री मनाचे पापुद्रे हलकेच उलगडून
दाखविले आहेत. महाभारतातल्या या प्रवासात मिळणाऱ्या अंबा,राधा,सत्यवती याच बरोबर दमयंती, शकुंतला, शर्मिष्ठा, देवयानी यांच्याही वृत्ती, प्रवृत्तीच्या महाभारताच्या काळाच्या, रचनेच्या, कथेच्या संदर्भात आलेल्या
गुणधर्माच्या-मनोधर्माच्या विचार प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.
अगतिकता आणि दु:ख
महर्षी व्यासांनी महाभारतात स्त्रियांचे चित्रण
करताना त्यांना देवत्वाच्या पातळीवर नेले नाही. मानवी पातळी वरील या स्त्रियांत
उदात्तता जशी आहे, तसेच विलक्षण सळसळते चैतन्य आणि तेज आहे.
मातृत्वाबरोबर असूया आणि प्रतिशोधाची भावना आहे. प्राप्तीची आणि कामपुर्तीची
आकांक्षा असलेली ही स्त्री विशुद्ध सख्यभावही बाळगते. कृष्ण-द्रौपदी किंवा
कुंती-विदुर यांच्यात नाते दीर भावजयीचे असले तरी त्याची प्रत निश्चितच वेगळी आहे.
त्यात विशेष सख्यभाव आहे. अर्थात दीर भावजयीचे नाते असेच विलक्षण आहे. समाज या नात्यावर भिन भावाच्या
प्रेमाचा शिक्का मारतो.पण या प्रेमात मोकळेपणा अधिक असतो. समोरच्या व्यक्तीला
जाणून घेण्याची क्षमता स्वभावत: निर्माण झालेली असते. निर्विषय प्रेमाची एक उदात्त
अनुभूती असलेले नाते सख्यत्वाचे मैत्रीचे अधिक असते. द्रौपदी कृष्णाची सखी आहे. तर
विदुर कुंतीच्या दु:खाच्या प्रत्येक प्रसंगी पहाडासारखा उभा राहतो.
महाभारतातील समाजचौकटीत ही स्त्री प्रेरक आहे, तिने पुरुषतेज चेतविले. मात्र ती सदैव दु:खी,अगतिक राहिली. दु:खाचे प्रकार वेगळे, कारणे वेगळी. दु:खे भोगणाऱ्या स्त्रियाही वेगळ्या. स्त्री दु:ख मात्र अपरिहार्य, एवढे भव्य, इतका देदीप्यमान इतिहास आणि वैविध्यपुर्णता हे
स्त्रियांच्या भूमिकेतून निर्माण झाले आहेत. एकटी द्रौपदी अथवा कुंती वगळली तर
महाभारत पूर्ण होऊ शकत नाही. या स्त्रिया रूढ अर्थाने दुबळ्या नाहीत, उलट कमालीच्या समर्थ आहेत. प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची त्यांची क्षमता
अलौकिक आहे, तरी समाजाच्या दृष्टीने त्या गौण आहेत. म्हणूनच
अपरिहार्य दु:खे आणि नियतीशरणता बऱ्याच वेळा त्याच्या वाटेला येताना दिसतात
तेज उदात्तता जरी महाभारतातील स्त्रियांचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी शेवटी त्या मानवी पातळीवरच जगत असतात. लेखिका लिहिते, “त्यांच्या जागी सहजसुलभ असलेला मत्सरही आढळतो, तर कधी प्रीतीचे विविधरंगी धागे विणणाऱ्या स्त्रियाही आढळतात. कमालीच्या समर्पण वृत्तीने प्रेम करणाऱ्या, प्रेमासाठी सर्वस्व उधळणाऱ्या जशा आहेत. तशाच प्रितीतल्या वैफल्याने कोसळून जाण्याचे त्याच्या आयुष्यातले क्षणही त्यांच्याइतकेच आपल्याला व्यथित करताना दिसतात. कधी निर्विषय प्रेमात झालेले प्रेमाचे उन्नयनही आहे. तर कधी प्रीती इतक्याच उत्कटतेने जपलेली प्रतिशोधाची ज्वालाही आहे” या साऱ्यांमुळे या व्यक्तिरेखांना सौदर्य आणि सामर्थ्य प्राप्त झाले तरी शेवटी त्या असहाय्य आहेत, अगतिकच आहेत. निसर्गदत्त दौबल्य, समाजभयाच्या अप्रतिष्ठतेच्या जाणीवेतून कधी ही अगतिकता आलेली दिसते. तर कधी नातेसंबंधातून अगतिकता जन्म घेते. साऱ्या मनोधर्मावर स्त्रीचे तेज, मंगल मातृत्व आणि तिची प्रीती यांवर मात करताना दिसते यातूनच दु:ख आणि दु:खच तिच्या वाट्याला आलेले आहे.
तेज उदात्तता जरी महाभारतातील स्त्रियांचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी शेवटी त्या मानवी पातळीवरच जगत असतात. लेखिका लिहिते, “त्यांच्या जागी सहजसुलभ असलेला मत्सरही आढळतो, तर कधी प्रीतीचे विविधरंगी धागे विणणाऱ्या स्त्रियाही आढळतात. कमालीच्या समर्पण वृत्तीने प्रेम करणाऱ्या, प्रेमासाठी सर्वस्व उधळणाऱ्या जशा आहेत. तशाच प्रितीतल्या वैफल्याने कोसळून जाण्याचे त्याच्या आयुष्यातले क्षणही त्यांच्याइतकेच आपल्याला व्यथित करताना दिसतात. कधी निर्विषय प्रेमात झालेले प्रेमाचे उन्नयनही आहे. तर कधी प्रीती इतक्याच उत्कटतेने जपलेली प्रतिशोधाची ज्वालाही आहे” या साऱ्यांमुळे या व्यक्तिरेखांना सौदर्य आणि सामर्थ्य प्राप्त झाले तरी शेवटी त्या असहाय्य आहेत, अगतिकच आहेत. निसर्गदत्त दौबल्य, समाजभयाच्या अप्रतिष्ठतेच्या जाणीवेतून कधी ही अगतिकता आलेली दिसते. तर कधी नातेसंबंधातून अगतिकता जन्म घेते. साऱ्या मनोधर्मावर स्त्रीचे तेज, मंगल मातृत्व आणि तिची प्रीती यांवर मात करताना दिसते यातूनच दु:ख आणि दु:खच तिच्या वाट्याला आलेले आहे.
व्यासप्रतिभेच्या या स्त्री व्यक्तिरेखांचे
समग्रतेने आकलन करणे तशी अवघड गोष्ट. महाभारतात ग्रंथाचा अभ्यास करून
प्रा.डॉ.सौ.सुनेत्रा देशपांडे या व्यक्तिरेखांच्या जवळच्या गेलेल्या आहेत. ओघवत्या
सुंदर भाषेमुळे प्रस्तुत पुस्तक संशोधन असूनही वाचनीय झाले आहे. या पुस्तकाच्या
निमित्ताने लेखिकेने महाभारताच्या जिज्ञासू,प्रेमी, रसिक वाचकांना स्त्रीच्या अंतरंगातील व्यथा, वेदना, त्रुटी, सामर्थ्य यांचे दर्शन घडविले आहे.
-भिवा रामचंद्र परब
(पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता पुरवणी
दि.०२.०४.१९८९)

No comments:
Post a Comment