Thursday, 12 January 2017

उत्कंठावर्धक नाट्यमय कादंबरी

               ‘जिहाद' ही प्रा.डॉ.उमेश कदम यांची दहशतवादावरची कादंबरी. ही कादंबरी अल कायदा, त्यांचा दहशतवाद, जिहादी, पाश्चात्य गुप्तहेर संघटना, त्यांची काम करण्याची पद्धत अशा विषयावर आधारीत आहे. यापुर्वी त्यांच्या संहार, उद्ध्वस्त, निर्दय व अमानुष अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मार्टीन स्टोर्म यांच्या ‘एजंट स्टोर्म : माय लाईफ इन् अल् कायदा’ यांच्या पुस्तकावरून प्रेरित होऊन लिहिलेली  ही रोमांचकारी कादंबरी आहे. कदम यानी आपल्या छोट्याशा प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मार्टीन स्टोर्मच्या अनुभवाचा गाभा, पुस्तकातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा, काही घटना तशाच ठेवून त्यावर आधारीत वास्तव व कल्पकता याचा सुंदर मेळ साधत ही कादंबरी आकाराला आलेली आहे. श्री कदम हे आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसमध्ये वरिष्ठ कायदा सल्लागार पदावर कार्यरत असल्यामुळे ते जगभर फिरत असतात. अत्याचाराच्या अनेक घटना त्यांना हाताळाव्या लागतात. त्या अनुभवाचा उपयोग त्यांना ही कादंबरी लिहिताना झालेला आहे.
            दहशतवाद हा साऱ्या जगाच्या चिंतेचा विषय. त्यांनी सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित केले आहे. इसिस, अल् कायदा, अल् शबाब सारख्या संघटनांनी अनेक देशांना वेठीला धरले आहे. अमेरिकेत नऊ-अकरा व हिंदुस्थानात सव्वीस-अकरा चे हल्ले झाले. पराकोटीच्या धार्मिक मानसिकतेतून तयार केलेले जिहादी यांच्याकडून हे हल्ले झाले. या दहशतवादाची झळ पोहचलेले काही देशही हाच दहशतवाद स्वत:च्या स्वार्थासाठी पोसत आहेत, तर काही देश याच दहशतवादाच्या विरोधात लढत आहेत.
           जिहाद म्हणजे धर्मयुद्ध. कादंबरीचे ढोबळमानाने दोन भाग करता येतील. पहिल्या भागात रेमंड नेव्हिस हा पाश्चात्य तरूण त्याच्या कटू बालपणामुळे गोंधळलेल्या अवस्थेत मुस्लिम धर्म स्वीकारतो आणि अल् कायदाच्या जाळ्यात अलगद ओढला जाऊन तो जिहादी बनतो. सुरवातीला संघटनेने त्याच्यावर ज्या संहारक दहशतवादी कामगिऱ्या सोपविल्या गेल्या मग ते अमेरिकन वाणिज्य प्रतिनिधी ब्रुस पÌलोरेन्सटाईन यांचे हत्येसाठी केलेले अपहरण असो किंवा अमेरिकन आरमाराचे लढाऊ जहाज युएसएस मिसुरी बॉम्बस्फोटाने उडविणे असो, तो यशस्वी करून दाखवितो आणि ओसामा-बिन-लादेनचा उजवा हात अन्वर अल् अवलाकी याच्यापर्यत पोहोचतो.
             कादंबरीच्या दुसऱ्या भागात अन्वर अल् अवलाकीच्या आदेशाने आपल्याच बांधवाच्या कराव्या लागणाऱ्या नृशंक संहाराच्या कल्पनेने तो व्यथित होतो. पश्चातापदग्ध रेमंड पाश्चात्य गुप्तहेर संघटनां अमेरिकेची सीआयए, ब्रिटनची एम्आय्एक्स आणि हॉलंडची जिस यांच्याकडे दुहेरी हेर म्हणून काम करू लागतो. अल् कायदाची खडानखडा माहिती तो या तिन्ही संघटनांचे गुप्तहेर रेने बोस्मन, आर्थर मेरॉन, जेसन डग्लस यांना देतो आणि त्याच्या माहितीच्या आधारे लपून बसलेल्या अन्वर अल् अवलाकी चा काटा काढला जातो. कादंबरीच्या शेवटी दोन्ही दरडीवर पाय ठेवलेल्या व्यक्तीची जी गत होते तीच रेमंडची झाली. सीआयए आणि एमआयएक्स आपली गुपिते बाहेर फोडू नये म्हणून रेमंडच्या जीवावर उठतात. पण जिस चा गुप्तहेर रेने त्याला मदत करतो आणि वाचवितो.
           क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी ही कांदबरी रोमांचकारी, नाट्यमय व उत्कंठावर्धक आहे. कादंबरी एकदा वाचायला घेतली की ती पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेववत नाही यातच कादंबरीचे यश आहे.
 -भिवा रामचंद्र परब

जिहाद (कादंबरी): उमेश कदम
प्रकाशक : ग्रंथाली
पृष्ठे : २०२ किंमत : रू.२००



No comments:

Post a Comment