Sunday, 15 January 2017

शिक्षणाच्या आयचा....भाग-१

मास्तर       :   च्यायला, आज इन्स्पेक्शन म्हणजे दिवाळीचा बैलांचा पोळा कार्यक्रम. पोरं एक दिवस सजवून-रंगवून टापटीपीने शाळेत आली खरी, आली कुठली त्यांच्या आईबापांना धाकदडपशाही दाखवून शाळेतील दांगट पोरांकडून एकेकाला पोरांला उचलून आणलीत. पण काय उजेड पाडणार देव जाणे! मुळातच आडातच नाही तर पोहोरात येणारच कसे? शासनाच्या परिपत्रका प्रमाणे दोन महिने निवडणुकीच्या कामासाठी, जनावरांची शिरगणती, जातीची शिरगणती या कामासाठी सदोदित शाळेबाहेर असल्यामुळे शाळेत पोरांना शिकविताच आले नाही, वे मिळाला तसे सगळे रेकॉर्ड मात्र अपडेट ठेवलेत. काय आहे, पोरं शिकली नाही तर तो माझा दोष नाही, दोष पोरांचा, त्यांच्या आईबापांचा.. पण रेकॉर्ड व्यवस्थित राहिले नाही तर माझे काही खरे नाही. पोरांची कागदावर १००टक्के उपस्थिती, सगळ्या विषयात वरच्या श्रेणीने सर्व पोरं पास.. सगळंअगदी व्यवस्थित आहे. तसं कारण नाही..पण? (अधिकारी येतो)
अधिकारी   :   काय मास्तर, कसं चाललंय?
मास्तर       :   तुमच्या कृपेने अति उत्तम!
अधिकारी   :   पोरांचं?
मास्तर       :   कुणाच्या?
अधिकारी   :   (रागाने) तुमच्या!
मास्तर       :   त्यांचं सुद्धा ठिक चाललय, माझा एक पोरगा...
अधिकारी   :   मास्तर, मी तुमच्या पोरांचं नाय इच्यारीत
मास्तर       :   अरे देवा, मग हो कुणाच्या पोरांचे?
अधिकारी   :   मी शाळेतल्या पोरांविषयी बोलतोय
मास्तर       :   साहेब,आता तर तुम्हीच इन्स्पेक्शन केलय ना?
अधिकारी   :   होय केलय ना!
मास्तर       :   मग?
अधिकारी   :   मग म्हणून काय विचारता मास्तर! अहो तुमच्या पोरांना काहीही येत नाही
मास्तर       :   असं! मला कसं नाही समजलं?
अधिकारी   :   कसं समजणार मास्तर, लक्ष देऊन कधी शिकविले असते तर पोरं चार बुकं शिकली असती. पाचवीच्या वर्गाला मास्तर तुम्हीच शिकविता ना? त्याच वर्गातल्या एका पोराला विचारलं, लोकमान्य टिकांचा जन्म कोठे झाला? पोराने काय उत्तर दिले माहीत आहे?
मास्तर       :   नाही,
अधिकारी   :   त्यांचा जन्म चिखलात झाला.
मास्तर       :   आयला उत्तर बरोबर दिलं की!
अधिकारी   :   काय बरोबर आहे? शुद्धिवर आहात का? की रात्रीची अजून उतरली नाही मास्तर!
मास्तर       :   मी घेतो ते तुम्हाला कोणी सांगितले, कुणा पोरानं सांगितले ते सांगा, नाय त्याला  कानफटावलं तर मास्तर नांव नाय सांगणार
अधिकारी   :   मास्तर कायदा काय सांगतो माहित आहे का? पोरांना शिक्षा करणे गुन्हा आहे.
मास्तर       :   कायदा गेला गा..
अधिकारी   :  (ओरडून) मास्तर..
मास्तर       :   मला असं म्हणायचं होतं, मी पण कायद्याचा आदर करतो
अधिकारी   :   हे असं? आणि मुख्य म्हणजे तुम्ही दारू पिता?
मास्तर       :   मी माणूस आहे साहेब
अधिकारी   :   पण त्या आधी शिक्षक आहात ते लक्षात ठेवा
मास्तर       :   त्या आधी शिक्षक कसा असणार साहेब? शिक्षक होण्यासाठी आधी माणूस असणे गरजेचे आहे, असं नाही वाटत का तुम्हांला? म्हणजे असं बघा ...
अधिकारी   :   मास्तर नको त्या ठिकाणी नको ते तुमचे गुळगुळीत तत्वज्ञान वापरून आपल्या अवगुणावर पांघरूण घालू नका. मी कोठे म्हटले तुम्ही माणूस नाही, जनावर आहात म्हणून
मास्तर       :   म्हणायला कशाला पाहिजे, तुमचा चेहराच सांगतो,
अधिकारी   :   काय?
मास्तर       :   जनावर आहे म्हणून
अधिकारी   :   कोण?
मास्तर       :   (बेरकीपणे) काय कोण?
अधिकारी   :   तुम्हीच तर आता म्हणाला?
मास्तर       :   काय म्हणालो?
अधिकारी   :   कोणाला?
मास्तर       :   माहीत नाही, काय साहेब अख्खा दिवस कोण, काय, कुणाला यातच घालविणार की काय? पोराने काय चुकीचे उत्तर दिले, ते सांगा? चिखली गावात नाही का लोकमान्य टिकांचा जन्म झाला?
अधिकारी   :   चिखली गांव आणि चिखल यात किती फरक आहे?
मास्तर       :   (स्वत:शी) सगळा चिखलच आहे म्हणायचा!
अधिकारी   :   काय म्हणालात?
मास्तर       :   पोरांना मीच शिकविलं, चिखलमातीतून जसं सुंदर कम उमलते तसेच आपले लोकमान्य टिक चिखली गांवात जन्मले. पोरांनी फक्त चिखल लक्षात ठेवला त्याला मी काय करू.आणि साहेब जरा समजून घ्यायचं ना! चिखलीगांव, चिखल हा फरक तुमच्या-आमच्यासाठी साहेब. ही शेतकर्याची पोरं आहेत. ती आपल्या बापाबरोबर सतत चिखलातच राबत असतात. आम्ही त्याना समजेल अश्या भाषेतच त्यांना शिकवितो
अधिकारी   :   पण या  चिखलातून काय निर्माण होणार?लोकमान्य टिक की चिखलीकरच?
मास्तर       :   लोकमान्य टिकांचा जमाना गेला, आता चिखलीकरांचा जमाना आहे. कारण खालपासून वरपर्यत सगळीच दलदल! दलदलीतून एक बरबटलेला पाय बाहेर काढावा तो दुसरा पाय दलदलीत अधिक खोलवर रूतलेला.
अधिकारी   :   आणि शिक्षण?
मास्तर       :   त्यांचं काय मोठंसं, ते काय कधीही घेता येते? आणि त्यासाठी अभ्यासाची काय गरज? पास तर आपोआप होणार!
अधिकारी   :   काय? मी नाय समजलो,
मास्तर       :   अहो साहेब, आता तुम्हीच एक नियम केला की नाय
अधिकारी   :   कोणता नियम?
मास्तर       :   पहिली ते आठवीपर्यत परीक्षा नाही! मुलांना पास करायचे? बरोबर?
अधिकारी   :   अगदी बरोबर! कुठल्याही मुलांने नापास होऊ नये त्याचे शिक्षण थांबू नये, मुलांची होणारी शाळेतील ती थांबावी म्हणूनच शासनाने एक चांगला उपक्रम राबविला.
मास्तर       :   चांगला?
अधिकारी   :   मग?
मास्तर       :   अहो पण साहेब पोरांची परीक्षा नाही, पास होण्याची कटकट नाही, मग अभ्यास कोणी करेल  का? याचा कोणी विचार केलाय?
अधिकारी   :   पोरं स्वत:हून अभ्यास थोडीच करणार आहेत. त्यांनी अभ्यास करावा म्हणून तर शासन तुम्हांला पोसतंय. 
मास्तर       :   म्हणजे शासन आमच्यावर उपकारच करतय का?

अधिकारी   :   तसंच म्हणा हवं तर!

भाग-२ इथे वाचा 
क्रमशः 
-भिवा रामचंद्र परब 

1 comment:

  1. Hard Rock Hotel and Casino - Mapyro
    Hard Rock Hotel and Casino is an 여수 출장마사지 entertainment destination 경주 출장안마 located in Rock bet analysis Lake 거제 출장안마 Lake 제천 출장마사지 in Lake Tahoe, Nevada and is open daily 24 hours. Rating: 4.4 · ‎51 reviews

    ReplyDelete