Sunday, 22 January 2017

महाभारतातील स्त्रियांच्या मनोधर्माचा शोध

महाभारत...महर्षी व्यासरचित एक अजोड ग्रंथ. भारतीय नीतीशास्त्रे, धर्मतत्वे, व्यवहारज्ञान, ज्योतिषशास्त्र, राज्यधर्म, उपनिषदे, अनेक कथा...उपकथा सांगणारे काव्य...एक कांदबरी...एक नाट्यवस्तूही आहे, म्हणूनच अनेक सृजनशील कलावंताना पौराणिक नाटकांपासून आजच्या कथा-कादंबऱ्या-ललित लेखांपर्यत अनेक विषय महाभारताने पुरविले.
      आजपर्यत महाभारतावर अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत, होत आहेत. त्यातील महाभारतातील स्त्रियांचे मनोधर्म हे प्रा.डॉ.सौ.सुनेत्रा देशपांडे यांचे हे पुस्तक. प्रबंध अभ्यासाच्या निमित्ताने त्यांनी महाभारतातल्या स्त्रीव्यक्तिरेखांचा अभ्यास केला त्यातून हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे. महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखांचे आकलन-रेखाटन त्यांनी विविध पातळ्यावरून वेगवेगळ्या पद्धतीने केल्याचे आढळते. त्यात प्रामुख्याने कुंती, गांधारी, द्रौपदी, सत्यवती यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तकात स्त्री पर्वाचे एकत्रित अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आलेले असून एकूण सहा प्रकरणातून महाभारतातील स्त्रियांचे मनोधर्म दर्शविण्याचे प्रयत्न केला आहे.
            कुंती, गांधारी, द्रौपदी या महाभारतातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखांत विलक्षण तेज आहे. उदात्तता आहे. कर्णाने मातृत्व नाकारणे हा कुंतीचा बाह्यकारी पराभव असला तरी स्त्रीला तो आपल्या मातृत्वाच्या अंतिम विजयच वाटला असेल. पाच पुत्रांच्या कल्याणासाठी त्यांचे तेज ती अखेरपर्यत जोपासत राहिली पण राज्य मिळताच ती विरक्त झाली. निपुत्रिक झालेल्या मातेचे मातेचे दु:ख तिनं जाणलं आणि पुत्र शोकाने विव्हळ झालेल्या दीर-भावजयीची सेवा करण्यास ती त्यांच्या बरोबर निघाली.
            डोळ्यावर बांधलेल्या पट्टीतून डोळसपणे पाहणारी माता गांधारी ही दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा. ती अतिशय बुद्धिमान असल्यामुळे पुढचे भवितव्य तिला स्वच्छ दिसते आणि म्हणूनच आपल्या शंभर पुत्रांच्या आणि कुरुकुलाच्या भीषण भवितव्याविषयी सतत चिंतीत असते. दुर्योधन युद्धावर जाण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी आला असता जिकडे धर्म तिकडे जय असा आशीर्वाद दिला. पण कितीही असली तरी ती माता आहे आणि पुत्रांना वाचविण्याच्या आत्यंतिक तळमळीतून ती विव्हळ होत असेल.विधिलिखित टाळणे गांधारीला शक्य झाले नाही. शतपुत्रांची माता बघता बघता निपुत्रिक झाली. संपूर्ण महाभारतात गांधारी न्याय-नीती, धर्म-अधर्म यांच्याबातीत कमालीची जागरूक दिसते.
        महाभारतातील मध्यवर्ती स्त्री व्यक्तिरेखा म्हणजे द्रौपदी...याज्ञसेनी. तिचा जन्मच मुळी प्रतिशोधातून झाला. महाभारतात ती एका वेगळ्याच तेजाने तळपते. एकाच वेळी मर्यादांची पूर्ण जाणीव, स्व:हक्क, सामर्थ्य यांचा सार्थ अभिमान तसेच सतत धगधगणारी अस्मिता यांचे अनोखे मिश्रण तिच्यात आहे. युधिष्ठर समेटाची-क्षमेची भाषा करतो तेव्हा ती कृष्णाला म्हणते, “पेटलेल्या अग्नीप्रमाणे हा संताप आज तेरा वर्षे मी पोटात साठवत आहे. युद्धाच्या क्षणाची मी आतुरतेने वाट पहात आहे. पांडव जर त्यांच्याशी युद्ध करण्याचे नाकारीत असतील तर माझे पुत्र, माझा अभिमन्यू माझ्यासाठी युद्ध करेल.
            महाभारत हा एक सूडाचा प्रवास असल्याचे म्हटले गेले आहे. त्या सुडाचे समर्थ दर्शन स्त्री-चित्रात प्रभावीपणे घडते. सौ. देशपांडे यांनी नेमके प्रसंग उद्धृत करून त्यातून स्त्री मनाचे पापुद्रे हलकेच उलगडून दाखविले आहेत. महाभारतातल्या या प्रवासात मिळणाऱ्या अंबा,राधा,सत्यवती याच बरोबर दमयंती, शकुंतला, शर्मिष्ठा, देवयानी यांच्याही वृत्ती, प्रवृत्तीच्या महाभारताच्या काळाच्या, रचनेच्या, कथेच्या संदर्भात आलेल्या गुणधर्माच्या-मनोधर्माच्या विचार प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.
अगतिकता आणि दु:ख
           महर्षी व्यासांनी महाभारतात स्त्रियांचे चित्रण करताना त्यांना देवत्वाच्या पातळीवर नेले नाही. मानवी पातळी वरील या स्त्रियांत उदात्तता जशी आहे, तसेच विलक्षण सळसळते चैतन्य आणि तेज आहे. मातृत्वाबरोबर असूया आणि प्रतिशोधाची भावना आहे. प्राप्तीची आणि कामपुर्तीची आकांक्षा असलेली ही स्त्री विशुद्ध सख्यभावही बाळगते. कृष्ण-द्रौपदी किंवा कुंती-विदुर यांच्यात नाते दीर भावजयीचे असले तरी त्याची प्रत निश्चितच वेगळी आहे. त्यात विशेष सख्यभाव आहे. अर्थात दीर भावजयीचे नाते  असेच विलक्षण आहे. समाज या नात्यावर भिन भावाच्या प्रेमाचा शिक्का मारतो.पण या प्रेमात मोकळेपणा अधिक असतो. समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्याची क्षमता स्वभावत: निर्माण झालेली असते. निर्विषय प्रेमाची एक उदात्त अनुभूती असलेले नाते सख्यत्वाचे मैत्रीचे अधिक असते. द्रौपदी कृष्णाची सखी आहे. तर विदुर कुंतीच्या दु:खाच्या प्रत्येक प्रसंगी पहाडासारखा उभा राहतो.
         महाभारतातील समाजचौकटीत ही स्त्री प्रेरक आहे, तिने पुरुषतेज चेतविले. मात्र ती सदैव दु:खी,अगतिक राहिली. दु:खाचे प्रकार वेगळे, कारणे वेगळी. दु:खे भोगणाऱ्या स्त्रियाही वेगळ्या. स्त्री दु:ख मात्र अपरिहार्य, एवढे भव्य, इतका देदीप्यमान इतिहास आणि वैविध्यपुर्णता हे स्त्रियांच्या भूमिकेतून निर्माण झाले आहेत. एकटी द्रौपदी अथवा कुंती वगळली तर महाभारत पूर्ण होऊ शकत नाही. या स्त्रिया रूढ अर्थाने दुबळ्या नाहीत, उलट कमालीच्या समर्थ आहेत. प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची त्यांची क्षमता अलौकिक आहे, तरी समाजाच्या दृष्टीने त्या गौण आहेत. म्हणूनच अपरिहार्य दु:खे आणि नियतीशरणता बऱ्याच वेळा त्याच्या वाटेला येताना दिसतात
          तेज उदात्तता जरी महाभारतातील स्त्रियांचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी शेवटी त्या मानवी पातळीवरच जगत असतात. लेखिका लिहिते, “त्यांच्या जागी सहजसुलभ असलेला मत्सरही आढळतो, तर कधी प्रीतीचे विविधरंगी धागे विणणाऱ्या स्त्रियाही आढळतात. कमालीच्या समर्पण वृत्तीने प्रेम करणाऱ्या, प्रेमासाठी सर्वस्व उधळणाऱ्या जशा आहेत. तशाच प्रितीतल्या वैफल्याने कोसळून जाण्याचे त्याच्या आयुष्यातले क्षणही त्यांच्याइतकेच आपल्याला व्यथित करताना दिसतात. कधी निर्विषय प्रेमात झालेले प्रेमाचे उन्नयनही आहे. तर कधी प्रीती इतक्याच उत्कटतेने जपलेली प्रतिशोधाची ज्वालाही आहे या साऱ्यांमुळे या व्यक्तिरेखांना सौदर्य आणि सामर्थ्य प्राप्त झाले तरी शेवटी त्या असहाय्य आहेत, अगतिकच आहेत. निसर्गदत्त दौबल्य, समाजभयाच्या अप्रतिष्ठतेच्या जाणीवेतून कधी ही अगतिकता आलेली दिसते. तर कधी नातेसंबंधातून अगतिकता जन्म घेते. साऱ्या मनोधर्मावर स्त्रीचे तेज, मंगल मातृत्व आणि तिची प्रीती यांवर मात करताना दिसते यातूनच दु:ख आणि दु:खच तिच्या वाट्याला आलेले आहे.
            व्यासप्रतिभेच्या या स्त्री व्यक्तिरेखांचे समग्रतेने आकलन करणे तशी अवघड गोष्ट. महाभारतात ग्रंथाचा अभ्यास करून प्रा.डॉ.सौ.सुनेत्रा देशपांडे या व्यक्तिरेखांच्या जवळच्या गेलेल्या आहेत. ओघवत्या सुंदर भाषेमुळे प्रस्तुत पुस्तक संशोधन असूनही वाचनीय झाले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखिकेने महाभारताच्या जिज्ञासू,प्रेमी, रसिक वाचकांना स्त्रीच्या अंतरंगातील व्यथा, वेदना, त्रुटी, सामर्थ्य यांचे दर्शन घडविले आहे. 

-भिवा रामचंद्र परब

(पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता पुरवणी दि.०२.०४.१९८९)

Wednesday, 18 January 2017

धुंद या क्षणी

धुंद या क्षणी, जवळ ये साजणी, बघुनी प्रीतमणी
ये माझ्या प्रीतीफुला...
गार वाऱ्यात, गंध पेरीत, धुंद मनाने
ये माझ्या प्रीतीफुला...

हृदयात ठेविली तुझी मूर्ती
कधी होईल ग स्वप्नांची पूर्ती
प्रीत फासात, गुलाबी थंडीत, मन्मानिनी
ये माझ्या प्रीतीफुला...

तुझ्या माझ्या मिलनाला, साक्षी आहे चंद्र
ओलांडू दोघे प्रीतीचा समुद्र
हासत, नाचत, प्रीत पंखाने, ये ये साजणी
ये माझ्या प्रीतीफुला...


-भिवा रामचंद्र परब

Sunday, 15 January 2017

शिक्षणाच्या आयचा...भाग-२

                    भाग १ इथे वाचा 
मास्तर       :   पोरांना शिक्षा करायची नाही, त्यांना बोलायचे नाही, रागवायंच नाही, त्यांची परीक्षा घ्यायची नाही आणि तरीही त्यांना शिकवायचे, हे खूप कठीण काम आहे असं नाही वाटतं तुम्हांला? दुसर्या भाषेत सांगायचे तर मास्तरांचे हातपाय बांधायचे, त्यांच्या तोंडावर पट्टी चिकटवायची आणि त्यांना म्हणायचे, चला, मुलांवर चांगले संस्कार करा. त्यांना परीक्षार्थी बनवू नका, त्यांना ज्ञानार्थी बनवा!
अधिकारी   :   सरकार काहीएक योजूनच हे धोरण राबवित आहे.
मास्तर       :   धोरणबिरण सब झुठ आहे साहेब, काय आहे कोणी एक तुमच्या सारखा मोठा अधिकारी सरकारी खर्चात फॉरीनला  जातो आणि आपण काहीतरी करतो हे दाखविण्यासाठी त्या त्या देशाची धोरणे आपल्या देशात राबवू पहातो. तो आपल्या देशातील ना भौतिक सुविधांचा विचार करीत नाही की भौगोलिक वातावरणाचा. पाश्चात्यांच्या अंधानुकरणात आपण आपल्या पिढ्या बरबाद करतोय याचे कुणालाही भान नाही. परीक्षा नसल्यामुळे हा गोंध होणारच होता, तरी सुध्धा मुठभर लोकांनी परीक्षा रद्दची हाकाटी केली आणि तुम्ही बघता आहात साहे, याचमुळे केवयाचमुळे कधी नव्हे एवढा शिक्षणाचा दर्जा घसरलाच आहे. कायतर म्हणे विद्यार्थी आत्महत्या करतात म्हणून स्पर्धा नको. पण मग स्पर्धा नाही म्हणून विद्यार्थ्याच्या आत्महत्या थांबल्यात का? याचे उत्तरही दुदैवाने नाही असंच आहे, विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेण्याचा तुम्हांला काय अधिकार आहे? मान्य आहे की या नकत्या वयात जीवघेणी स्पर्धा नसावी. पण आयुष्यात पुढे जाण्यासाठी काहीतरी उदिष्ट हे समोर असलेच पाहिजे, मुलांच्या मनात खिलाडू वृत्ती कशी बाणेल यांचा विचार करा, पण नाही, प्रत्येक कामात चुकीची धोरणे राबवायची घाई... या नकत्या वयात आशी-सुखाशीन आयुष्याची चटक लागलेली ही मुले भविष्यात काय उजेड पाडणार देवाला माहित!
अधिकारी   :   खरं आहे ते! आपण तर हुकूमाचे ताबेदार!
मास्तर       :   पण शासनाच्या अधिकाऱ्याकडे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच. शिक्षणाचा दर्जा घसरला अशी बोंबाबोंब सुरू झाली आणि त्यावर त्यांनी पुन्हा शिक्षण मुल्यसंवर्धन उपक्रम आणलाच. म्हणजे अगोदर चुका करायच्या आणि त्या निस्तरण्यासाठी पुन्हा काही नवीन मखलाशी करायची, सगळं सोप्प झालं साहेब!
अधिकारी   :   मास्तर खूप बोललात, ऐकायला पण बरं वाटलं पण तुम्ही शिक्षक आहात हे विसरू नका
मास्तर       :   कसा विसरेन साहेब, माझं पोट तर या पोरांवर अवलंबून आहे.
अधिकारी   :   तुमचं पोटं सुटलं त्यावरून ते लक्षात येतं
मास्तर       :   तुम्ही जबरदस्ती केल्यावर असं पोटं पुढे येणारच साहेब
अधिकारी   :   अहो काय बोलता काय मास्तर? मी आणि जबरदस्ती? आणि...आणि मास्तर तुम्ही आहात तरी कोण?
मास्तर       :   मी.. मी कोण आहे, अहो मास्तर तुमच्या सारखाच आहे..दोन हात दोन पाय..एक नाक.. दोन डोळे..दोन कान..एक..साहेब तुमचा गैरसमज होतोय..
अधिकारी   :   अहो धडधडीत दिसत असताना, आणि तुम्ही कबूल करीत असताना मास्तर गैरसमज?
मास्तर       :   साहेब मला तसं म्हणायचं नव्हतं, गैरसमजातून जरा समजून घ्याना साहेब!
अधिकारी   :   मग कसं? असं कसं झालं म्हणता?
मास्तर       :   पुन्हा तेच, अहो त्याचं काय आहे?
अधिकारी   :   (साहेबांचे मास्तराच्या पोटाकडे लक्ष) कशाचं!
मास्तर       :   (लक्षात येऊन जोरात) ओ, इकडे बघा
अधिकारी   :   मास्तर, मला दम नाय द्यायचा, सर्विस बुकावर लाल शेरा मारून टाकेन, मग बस रे मास्तुरडर्या बोंबलत.
मास्तर       :   नका नका असं करू नका. साहेब माझं ऐकून तर घ्या!
अधिकारी   :   बोला,
मास्तर       :   अहो, मुलांना मधल्या सुट्टीत शासन जेवण देते.
अधिकारी   :   शालेय पोषण आहार योजनेचे, तेच ना?
मास्तर       :   (तिरकसपणे) नाही, म़ाझं घर धान्याने भरून वहातेय, त्यातील धान्य घेऊन त्यांना जेवण देतोय, शालेय पोषण आहार योजनेशिवाय दुसरे कसले जेवण देवू, कुणाच्या बाराव्याचे कि तेराव्याचे?
अधिकारी   :   मुद्दयाचे बोला, तुम्ही मास्तर लोक मुद्याचे सोडून बाकी सगळे बोलायला एकदम तयार हा,सवयच ती, नाही? पोरं काय गोठ्यातली गुरे, तुम्ही हाकारली काय ती चालली, मास्तर नेहमी खरंच बोलणार यावर त्यांची श्रद्धा! त्यामुळे तुम्ही खोटं बोलला तरी ठोकूनच बोलणार! कारण मास्तरांच्या चुका काढायची कुणा पोराची काय बिषाद! मास्तरांच्या चुका काढून त्यांना नापास थोडंच व्हायचंय! म्हणूनच तर शासनाने परीक्षा रद्द केलीय. तुमच्या हातातल्या पोरांना आणि त्यांच्या आईबापांना कह्यात ठेवण्याचा अधिकार काढून घेतलाय. काय आहे मास्तर, कोठडीत पोलीसांनी आरोपीला केलेली मारझोड आणि मास्तरांचा मार कुणाला कत नाही. चार भितींच्या आड जे चालते ते त्यांनाच माहिती! जगाला त्याची खबरबात नसते.
मास्तर       :   असं काय नाही हा साहेब, पोरं फार बिलंदर असतात. ते मास्तरांना ओखून असतात आणि त्याच्या सवयी ही! आणि आताची पिढी तर मास्तरांच्या पुढे आहे.
अधिकारी   :   मास्तर,मु मुद्दयाला हात घाला आता!
मास्तर       :   रोज रोज आहार येतो पोरांसाठी, काय आहे, आहार बाहेरून येत असल्यामुळे ते टेस्ट करावे लागते रोज,
अधिकारी   :   रोज?
मास्तर       :   होय रोज, काय आहे मुलांची काजी घ्यावी लागते ना आम्हांला, त्यामुळे मुलांसाठी जेवण आले की रोज ते चाखून पहावे लागते,
अधिकारी   :   कशी असते टेस्ट
मास्तर       :   रोज वेगवेगळे आणि फस्कलास!
अधिकारी   :   तुम्ही जेवणाचा डबा आणीतच नसाल ना?
मास्तर       :   कशाला, एक एक घास खाल्ला तरी पोटं भरते.
अधिकारी   :   असं कायमचं चालू असेल नाही?
मास्तर       :   काय करणार? करावी लागते मुलांची काजी, उद्या मुलांनी काय जेवणातून काहीबाही खाल्लं तर तुम्ही आम्हांला फासावर लटकावयाला तयारच आहात हातात दोर घेऊन.
अधिकारी   :   (तिरकसपणे) मग सुट्टीच्या दिवशी काय करता?
मास्तर       :   उपास.
अधिकारी   :   उपास?
मास्तर       :   मग, करावाच लागतो. आठवडाभर खा खा खाल्यावर एक दिवस तरी उपास नको करायला?
अधिकारी   :   धन्य आहे मास्तर तुमची, धन्य आहे.                                             
                                                        -समाप्त-

-भिवा रामचंद्र परब

शिक्षणाच्या आयचा....भाग-१

मास्तर       :   च्यायला, आज इन्स्पेक्शन म्हणजे दिवाळीचा बैलांचा पोळा कार्यक्रम. पोरं एक दिवस सजवून-रंगवून टापटीपीने शाळेत आली खरी, आली कुठली त्यांच्या आईबापांना धाकदडपशाही दाखवून शाळेतील दांगट पोरांकडून एकेकाला पोरांला उचलून आणलीत. पण काय उजेड पाडणार देव जाणे! मुळातच आडातच नाही तर पोहोरात येणारच कसे? शासनाच्या परिपत्रका प्रमाणे दोन महिने निवडणुकीच्या कामासाठी, जनावरांची शिरगणती, जातीची शिरगणती या कामासाठी सदोदित शाळेबाहेर असल्यामुळे शाळेत पोरांना शिकविताच आले नाही, वे मिळाला तसे सगळे रेकॉर्ड मात्र अपडेट ठेवलेत. काय आहे, पोरं शिकली नाही तर तो माझा दोष नाही, दोष पोरांचा, त्यांच्या आईबापांचा.. पण रेकॉर्ड व्यवस्थित राहिले नाही तर माझे काही खरे नाही. पोरांची कागदावर १००टक्के उपस्थिती, सगळ्या विषयात वरच्या श्रेणीने सर्व पोरं पास.. सगळंअगदी व्यवस्थित आहे. तसं कारण नाही..पण? (अधिकारी येतो)
अधिकारी   :   काय मास्तर, कसं चाललंय?
मास्तर       :   तुमच्या कृपेने अति उत्तम!
अधिकारी   :   पोरांचं?
मास्तर       :   कुणाच्या?
अधिकारी   :   (रागाने) तुमच्या!
मास्तर       :   त्यांचं सुद्धा ठिक चाललय, माझा एक पोरगा...
अधिकारी   :   मास्तर, मी तुमच्या पोरांचं नाय इच्यारीत
मास्तर       :   अरे देवा, मग हो कुणाच्या पोरांचे?
अधिकारी   :   मी शाळेतल्या पोरांविषयी बोलतोय
मास्तर       :   साहेब,आता तर तुम्हीच इन्स्पेक्शन केलय ना?
अधिकारी   :   होय केलय ना!
मास्तर       :   मग?
अधिकारी   :   मग म्हणून काय विचारता मास्तर! अहो तुमच्या पोरांना काहीही येत नाही
मास्तर       :   असं! मला कसं नाही समजलं?
अधिकारी   :   कसं समजणार मास्तर, लक्ष देऊन कधी शिकविले असते तर पोरं चार बुकं शिकली असती. पाचवीच्या वर्गाला मास्तर तुम्हीच शिकविता ना? त्याच वर्गातल्या एका पोराला विचारलं, लोकमान्य टिकांचा जन्म कोठे झाला? पोराने काय उत्तर दिले माहीत आहे?
मास्तर       :   नाही,
अधिकारी   :   त्यांचा जन्म चिखलात झाला.
मास्तर       :   आयला उत्तर बरोबर दिलं की!
अधिकारी   :   काय बरोबर आहे? शुद्धिवर आहात का? की रात्रीची अजून उतरली नाही मास्तर!
मास्तर       :   मी घेतो ते तुम्हाला कोणी सांगितले, कुणा पोरानं सांगितले ते सांगा, नाय त्याला  कानफटावलं तर मास्तर नांव नाय सांगणार
अधिकारी   :   मास्तर कायदा काय सांगतो माहित आहे का? पोरांना शिक्षा करणे गुन्हा आहे.
मास्तर       :   कायदा गेला गा..
अधिकारी   :  (ओरडून) मास्तर..
मास्तर       :   मला असं म्हणायचं होतं, मी पण कायद्याचा आदर करतो
अधिकारी   :   हे असं? आणि मुख्य म्हणजे तुम्ही दारू पिता?
मास्तर       :   मी माणूस आहे साहेब
अधिकारी   :   पण त्या आधी शिक्षक आहात ते लक्षात ठेवा
मास्तर       :   त्या आधी शिक्षक कसा असणार साहेब? शिक्षक होण्यासाठी आधी माणूस असणे गरजेचे आहे, असं नाही वाटत का तुम्हांला? म्हणजे असं बघा ...
अधिकारी   :   मास्तर नको त्या ठिकाणी नको ते तुमचे गुळगुळीत तत्वज्ञान वापरून आपल्या अवगुणावर पांघरूण घालू नका. मी कोठे म्हटले तुम्ही माणूस नाही, जनावर आहात म्हणून
मास्तर       :   म्हणायला कशाला पाहिजे, तुमचा चेहराच सांगतो,
अधिकारी   :   काय?
मास्तर       :   जनावर आहे म्हणून
अधिकारी   :   कोण?
मास्तर       :   (बेरकीपणे) काय कोण?
अधिकारी   :   तुम्हीच तर आता म्हणाला?
मास्तर       :   काय म्हणालो?
अधिकारी   :   कोणाला?
मास्तर       :   माहीत नाही, काय साहेब अख्खा दिवस कोण, काय, कुणाला यातच घालविणार की काय? पोराने काय चुकीचे उत्तर दिले, ते सांगा? चिखली गावात नाही का लोकमान्य टिकांचा जन्म झाला?
अधिकारी   :   चिखली गांव आणि चिखल यात किती फरक आहे?
मास्तर       :   (स्वत:शी) सगळा चिखलच आहे म्हणायचा!
अधिकारी   :   काय म्हणालात?
मास्तर       :   पोरांना मीच शिकविलं, चिखलमातीतून जसं सुंदर कम उमलते तसेच आपले लोकमान्य टिक चिखली गांवात जन्मले. पोरांनी फक्त चिखल लक्षात ठेवला त्याला मी काय करू.आणि साहेब जरा समजून घ्यायचं ना! चिखलीगांव, चिखल हा फरक तुमच्या-आमच्यासाठी साहेब. ही शेतकर्याची पोरं आहेत. ती आपल्या बापाबरोबर सतत चिखलातच राबत असतात. आम्ही त्याना समजेल अश्या भाषेतच त्यांना शिकवितो
अधिकारी   :   पण या  चिखलातून काय निर्माण होणार?लोकमान्य टिक की चिखलीकरच?
मास्तर       :   लोकमान्य टिकांचा जमाना गेला, आता चिखलीकरांचा जमाना आहे. कारण खालपासून वरपर्यत सगळीच दलदल! दलदलीतून एक बरबटलेला पाय बाहेर काढावा तो दुसरा पाय दलदलीत अधिक खोलवर रूतलेला.
अधिकारी   :   आणि शिक्षण?
मास्तर       :   त्यांचं काय मोठंसं, ते काय कधीही घेता येते? आणि त्यासाठी अभ्यासाची काय गरज? पास तर आपोआप होणार!
अधिकारी   :   काय? मी नाय समजलो,
मास्तर       :   अहो साहेब, आता तुम्हीच एक नियम केला की नाय
अधिकारी   :   कोणता नियम?
मास्तर       :   पहिली ते आठवीपर्यत परीक्षा नाही! मुलांना पास करायचे? बरोबर?
अधिकारी   :   अगदी बरोबर! कुठल्याही मुलांने नापास होऊ नये त्याचे शिक्षण थांबू नये, मुलांची होणारी शाळेतील ती थांबावी म्हणूनच शासनाने एक चांगला उपक्रम राबविला.
मास्तर       :   चांगला?
अधिकारी   :   मग?
मास्तर       :   अहो पण साहेब पोरांची परीक्षा नाही, पास होण्याची कटकट नाही, मग अभ्यास कोणी करेल  का? याचा कोणी विचार केलाय?
अधिकारी   :   पोरं स्वत:हून अभ्यास थोडीच करणार आहेत. त्यांनी अभ्यास करावा म्हणून तर शासन तुम्हांला पोसतंय. 
मास्तर       :   म्हणजे शासन आमच्यावर उपकारच करतय का?

अधिकारी   :   तसंच म्हणा हवं तर!

भाग-२ इथे वाचा 
क्रमशः 
-भिवा रामचंद्र परब