'मन:शांती' ही अनुवादित कादंबरी. इस्तुंबल विद्यापीठातील तुर्की वाड्मयाचे अभ्यासक अहमद हमदी तानपिनार यांची 'हुजूर’ (Huzur)ही तुर्की भाषेतील कादंबरी १९४९ मध्ये चार भागात क्रमश: प्रसिध्द झाली होती. तुर्की भाषेत हुजूर म्हणजे शांती. हीच कादंबरी त्यानंतर 'A Mind At Peace’ या नावाने ही इंग्रजीमध्ये भाषांतरित झाली. या कादंबरीचा मराठी अनुवाद सविता दामले यांनी केला आहे.
या कादंबरीचा काळ दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा. ओटोमन राज्याची फाळणी झाल्यामुळे नवीन सरकार स्थापन झाले आणि त्यानंतर तुर्कस्तानला आपल्या जुन्या रूढी परंपरा यांना तिलांजली देऊन पाश्चात्य संस्कृतीशी जुळवून घ्यावे लागले. आधुनिकीकरणाच्या रेट्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, जे परिवर्तन होऊ पाहत होते, त्या परिवर्तनातून जाणाऱ्या मुमताझ या सर्वसामान्य तरुणाची आणि त्याच्या जीवनात आलेल्या इहसान, नुरान, सुआद यांची ही कहाणी आहे. चार भागांत विभागलेली ही कादंबरी तुर्की समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहास कथन करते. तानपिनार यांनी तुर्की आणि मुस्लीम संस्कृतीचा मेळ साधत समाज,त्यातील सामाजिक-सांस्कृतिक बदल सूक्ष्मपणे टिपले आहेत आणि आपल्या अलंकारिक भाषेतून आणि ओघवत्या शैलीतून कथन केले आहेत.
ओटोमनवर कब्जा करतानाच्या धुमश्चक्रीत आठवडाभराच्या अंतराने अकराव्या वर्षी मुमताझचे आईवडील मारले गेले. पोरक्या मुमताझला त्याच्या चुलतभाऊ इहसान आपल्या मुलांसारखा संभाळतो. त्यामुळे तो मुमताझसाठी गुरू, गाईड सर्वकाही आहे. याच इहसानच्या आजारपणाने कादंबरीची सुरुवात होते. आपल्या भूतकाळातील अनेक आठवणी जाग्या करीत खचलेले मुमताझ, बॉस्फरसच्या फेरीबोटीतील प्रवास, त्याची अनाकलनीय विवाहीत प्रेयसी नुरान आणि त्यांची आकाराला आलेली आणि मध्येच संपलेली प्रेमकहाणी, दरम्यानच्या त्याच्या प्रणयलीला, या दोघांमध्ये आलेले सुआद, मुमताझच्याच घरी सुआदची आत्महत्या, या आणि अशा अनेक घटना एकापाठोपाठ एक घडत जातात. ढोबळमानाने असे म्हणता येईल की कादंबरीचा भाग पहिला आणि चौथा विषाद, दु:ख, तणाव, युद्धाच्या घडामोडी यांनी व्यापलेला आहे तर दुसरा आणि तिसरा भाग हा मुमताजचा भूतकाळ आहे.
राजकीय बदलामुळे आणि दुसऱ्या युद्धाच्या संभाव्य परिणामांमुळे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय ज्या घडामोडी घडतात त्याचे सामाजिक आणि राजकीय पडसाद कादंबरीत उमटत राहतात. अनिश्चितेच्या वातावरणामुळे समाजमन आतल्या आत गुदमरत असते. नात्यांच्या ओढाताणीतून मानसिक आणि भावनिक स्थिस्तंतरे चालूच असतात. पुस्तकाच्या नावांत शांती आहे. परंतु सततचे ताणतणाव, चिंता आणि युद्धाची स्थिती, अस्थिरता अशा विरोधाभासातून कादंबरीचे कथानक पुढे सरकते. सविता दामले यांनी मराठी भाषेची नजाकता संभाळून कादंबरीचा छान अनुवाद केला आहे.
पुस्तकाचे नाव : मन:शांती
मूळ लेखक : अहमद हमदी तानपिनार
अनुवाद : सविता दामले
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठे : ५१०. किंमत : रु ५५०/-
-भिवा रामचंद्र परब
(दै. सामना रविवार पुरवणी च्या सौजन्याने)
No comments:
Post a Comment