चिमण्यांनो, कितीवेळा
सांगितलं तुम्हांला;
कुणी म्हणतो म्हणून
ज्वालामुखीच्या तोंडावर असं घरटं बांधत
जाऊ नका!
भावनेचा उद्रेक केव्हा होईल सांगता येत नाही ना!
आपले पंख कापल्यावर,
निरभ्र आकाशात उडण्याचे आमंत्रण
कसे पेलवेल तुम्हांला?
पण आता समुद्र उलथवण्याच्या आव्हानासाठी
काळीज घट्ट करा;
सामोरे जा, पहाडाच्या उंचच उंच
भिंतीना.
सूर्याला धरायला जाताना
पिसारा आणखी फुलवा;
सामावून घ्या त्याला आपल्या
इवल्याशा पंखात!
त्याच्या तळपत्या किरणांनी दिपून जाल,
मार्ग बदलाल तर खबरदार,
चोची करा आणखी धारदार;
ज्वालामुखी थोपण्याइतपत:
सामर्थ्यवान होऊ द्यात त्या!
जयापराजयाची तमा न बाळगता
तुटून पडा त्यावर!
मारूतीनं सूर्याला गिळले होते;
अगस्तीने समुद्र प्राशन केला होता;
मग अशक्य काय आहे तुम्हांला?
तशीच वेळ आली तर ज्वालामुखीच धरा चोचीत;
बुडवा त्याला समुद्रात खोलवर!
समुद्र आणि ज्वालामुखी;
दोन तुल्यबळात जुंपली की,
निर्धास्त रहा ज्वालामुखीच्या आत
घरटं बांधून.
राख मात्र तशीच राहू द्या आठवण म्हणून!
नाहीतर त्याचाही लिलाव मांडाल बाजारात.
जळल्यावर मोल अधिक येते;
गिऱ्हाईक पण जास्त आहेत;
हुरळून जाऊ नका.
लक्षात ठेवा,
त्याच राखेतून अग्नी पेटविला जाईल.
ज्वालामुखीपेक्षाही अधिक दाहक असेल ही आग!
आणि या आगीनं;
तुमचंच घरटं जाळलं जाईल अगदी तुमच्यासकट!
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment