Sunday, 13 November 2016

आकांताचे मृगजळ भाग-५


"इजिप्तची सौंदर्यवती राणी क्लिओपात्रा हिचे निखळ सौंदर्य ज्याच्यामुळे निखरून आले, मानवी शरीराच्या सौंदर्याची आणि आरोग्यदायी जीवनाची निसर्गनिर्मित गुरुकिल्ली ज्याच्यात आहे, त्या गाढविणीच्या दुधाची आणि कुरूप-बेढब गाढवाची उपेक्षा किती काळ चालणार?”
आपल्याला माहीत असलेला, सर्व प्राण्यात ज्याची गणना आपण निर्बुद्धात करतो त्यापैकी एक- घोडा आणि झेब्रा यांच्या जातकुळीतला पण वेगळा प्राणी म्हणजे गाढव. नियतीच्या दुष्टचक्राचा एक भाग बनलेला गाढव आकांत आणि फक्त आकांतच करीत राहिला, तोही आतल्या आत. परमेश्वराने त्याला लाथा झाडण्याची परवानगी दिली खरी पण आपला राग तो सगळ्यावरच लाथा झाडूनच काढू लागला, म्हणूनच असेल कदाचित त्याच्या लाथाळीत ताकद असते. दिसायला कुरूप आणि बेसुऱ्या आवाजाच्या गाढवावर कुणीही उठतो आणि आळशीपणाचा शिक्का मारतो. घरातली आळसावलेली  कुत्री, मांजरे घरचं फुकटचे खाऊन मालकाकडून लाड करून घेतात. पण ते लाड गाढवाच्या नशिबात नाही. मरमर काम करूनही काही खायला न देता त्याच्या पाठीवर मात्र दंडूक्याचे वळ. आजवर त्याला वेठीला धरून त्याच्यावर विनोद आणि बहुतेक खोट्याच असणाऱ्या कथा बक्कळ लिहिल्या  गेल्यात. पण त्यांचे दु:ख़ समजून घेण्यात आपण का कमी पडतो हा मला नेहमी सतावणारा प्रश्न! त्याचाच दूरदूरचा नातेवाईक तो घोडा त्याचे काय लाड करतोय, त्याच्या रुबाबदार, ऐटदारपणावर फिदा होतो आपण.

परवा रस्त्याने जाताना गाढवाचा तांडा चालला होता तो एकमेकांना लत्ताप्रहार करीत. मी अंग चोरून चाललो होतो आणि तसंही एखादा कळप पाहिला, मग तो प्राण्यांचा असो वा माणसांचा होता होईल तेवढं लांब होतो मी. उगाच नसती लचांड का घ्या लावून मागे. कारण कळपाला कसलेही नियम लागू नसतात. झुंडशाहीचे कायदे वेगळे, त्यांचे मानसशास्त्र वेगळेच! कुत्र्यांचा कळप कधी मागे लागला का तुमच्या? एरवी शेपटी हालवीत चालणारा कुत्रा कळपातून आला की कसा अंगावर येतो ते अजमावून पहा एकदा! या भटक्या कुत्र्यांना प्राणीमित्र कसे हाताळतात कुणास ठाऊक? म्हणूनच एखाद्या गाढवाचे लक्ष माझ्याकडे जायला नको म्हणून कडेकडेने चाललो होतो. उकिरड्यावरील मृगजळाच्या मागे धावणाऱ्या या प्राण्याची कीव करावी तेवढी थोडीच! नाहीतरी मालकाने हाकलल्यावर बिचारे जाणार तरी कुठे? तसं पाहिलं तर उकिरडा हे काही त्यांचे ‘लास्ट डेस्टिनेशन’ नाही. परंतु त्यांना दुसरे कोणतेही साधन माणसाने ठेवले नसल्यामुळे उकिरडा हेच त्यांचे ‘लास्ट डेस्टिनेशन’ असं आपण म्हणू शकतो.

मी ही गाढवाची बाजू मांडतोय, गाढवगीता वाचतो खरी पण त्यामुळे ‘गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता’ या म्हणीपेक्षा ‘गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच (म्हणजे मी बर का )गाढव होता’ असे कोणीतरी म्हणणारच नाही याच्यावर माझा विश्वास नाही.
                                                                                      
भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्या एकनाथ महाराजांनी दुष्काळात गाढवाला पाणी पाजले आणि त्याचा जीव वाचविला. त्या पाण्यात काय गुण होता नकळे, एका संताच्या हातचे पाणी होते ते. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व गाढवात शहाणपणा संचारले असावे असा एक शोध लागल्याचे आमच्या एका मित्राने आम्हांला सांगितले आणि एकूण गाढवाबद्द्लचा आमचा आदरभाव आणखी उंचावला. तुम्ही खरं माना अथवा खोटं, ज्या दिवशी गाढवाने भोळ्या कुंभाराला फसवायचे ठरविले त्या दिवशी गाढवाठायी सुद्धा शहाणपणा असतो याची प्रचिती मला आली. मी गाढवाचे चरणस्पर्श करायला वाकलो. मनात भीती होती की गाढव लाथ मारेल. परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला स्वसंरणार्थ काही ना काही दिलेले आहे. गाढवाचा लत्ताप्रहार हा त्याचा 'हक्क' आहे. पण याच हक्काचा काही प्रमाणात माणूसही भागीदार कसा झाला हे एक कोडेच आहे. गाढवाचे चरणस्पर्श करताना माझ्या मनातले चांगले विचार त्याला समजले तर ठीकच अन्यथा हाणायचा की लाथ कंबरड्यात. पण का कोण जाणे मी त्याला त्याचा भाऊबंद वाटलो असेल म्हणून म्हणा किवा एक तुच्छ मानव आपल्यापुढे झुकतो आहे याचा त्याला सार्थ अभिमान वाटला असेल म्हणून म्हणा त्याने लाथ वगैरे हाणली नाही. परंतु ‘बघा माझ्या पाठीवर सतत ओझी देणारा माणूस माझ्यासमोर वाकलाच की नाही’ अशी मग्रुरी-गुर्मी मला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. मागे एकदा नारदाच्या करामतीने अडलेला हरी असाच गाढवाच्या पायी वाकला होता, तेव्हाचा त्याचा माज आणि आताची गुर्मी तशीच. लाळघोटेपणाची पुटे मनावर चढली नसतील तर नम्रताच माणसाला उच्च स्थानी पोहोचविते ही गोष्ट जेथे माणसाला सांगावी लागते तेथे निर्बुद्ध गाढवाचा काय पाड! पण परमेश्वर तर सगळ्यांचा बाप. त्याने ते बरोबर लक्षात ठेवले आणि त्याच्यातील चांगल्या गुणांना झाकून ठेवून त्याच्या ठायी असलेल्या वाईट गुण जगापुढे ठेवले. त्याच्या वाटेत फक्त दु:खाची पखरण, जागोजागी काटे पेरून ठेवले. 

ही एका गाढवाची गोष्ट तुमच्या आमच्या माहितीतलीच! एक दुकानदार (कदाचित तो कुंभारही असू शकेल) नेहमी गाढवाच्या पाठीवर मिठाची गोणी चढवून आणत असे. नदीच्या पल्याड त्याचे दुकान असल्यामुळे गाढवाला येताना ती गोणी पाण्याला लागणार नाही, याची काळजी घेवूनच यावे लागे. त्यामुळे ते गाढव ओझ्याने आणखी वाकायचे, अगदी मेटाकुटीला यायचे. त्याचवेळी त्याच्या बिनडोक डोक्यात एक आईडिया आली आणि आम्हीही त्याला जवळचे वाटल्यामुळे त्याने ती आमच्या कानात त्यांनी सांगितली. त्याची आईडिया अशी होती की जर नदीतून येताना जर मीठ पाण्यात भिजले तर गोणी हलकी होईल. त्याने पाठीवरील मिठाची गोणी पाण्यात भिजवून तसा प्रयोग केला, मीठ पाण्यात विरघळून गेले. ओझं हलकं झालं. ही बाब मालकाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. एक दिवस त्याने पाठीवरील गोणीत माती भरली आणि गाढवाला पिटाळले. नेहमी पेक्षा जास्त ओझ्याचे गाढवाला काहीच वाटले नाही कारण पाठीवरील ओझे पाण्यात बुडविले की हलके होते हे त्याला सवयीने माहीत होते. ते ओझे घेऊन तो पाण्यात उतरला आणि हे काय? माती भिजून ओझे आणखी जड होत गेले. अरेरे, माझ्यापाठीही अपेक्षांचे ओझे वाढते आहे काय? एकदा बसून विचार करायला हवा.

गाढवाला गुळाची चव नसावी असा एक मतप्रवाह आहे. त्या बिचाऱ्याला चव कळून तरी काय करणार, उकिरड्यावर लोळून, उकिरड्यावरच मिळेल ते खायचे यात सारा जन्म नव्हे, साऱ्या पिढ्या गेल्या. मालकाची फुकटची चाकरी करण्यात त्याची इतिकर्तव्यता. परमेश्वराची लीला अगाध आहे हे म्हटले जाते ते काही वावगं नाही. कुरूप, बेढव असलेल्या गाढवीणीच्या दुधात मात्र मानवी आरोग्याला आणि सौंदर्याला उपकारक घटक असावे ही त्याचीच खेळी! नाही म्हटले तर गाढवीणीचे दुध लहान मुलांना पाजतात, मीही लहानपणी हे दूध प्यालो होतो, असे माझी आई सांगायची. रोगजंतू, रोगसंसर्ग,  जन्मजात अस्थमा असणाऱ्या बालकांसाठी हे दुध चांगले! आणि हे लिहित असताना आणखी असं ही कळलं पार तिकडे सर्बियात गाढवीणीच्या दुधापासून चीज बनवितात आणि ते आजवरचे जगातील सर्वात महागडे चीज आहे. त्या एक किलो चीजची किमत भारतीय चलनानुसार सुमारे दीड लाख रुपये आहे हे वाचल्यावर एखाद्याला गाढवे बाळगायचा छंद जडला तर आश्चर्य वाटायला नको. एवढचं नव्हे तर इजिप्तची राणी सौदर्यवती क्लिओपात्रा हिच्या सौंदर्याचे राज गाढवीणीच्या दुधात होते. ती रोज सातशे गाढवीणीच्या दुधात आंघोळ करायची आणि दररोज प्यायची म्हणे! गाढवीणीच्या दुधावरील गाढ विश्वासाने म्हणा किवा मला अस्थमा झालाच नव्हता म्हणून म्हणा त्यानंतरच्या जाणीवेत दमा केव्हाच झाला नाही. मला एक आश्चर्य वाटते याकडे भारतीय वैद्यकशास्त्राचेअजून लक्ष अजून कसे गेले नाही किंवा एखाद्या भारतीय उद्योगपतीने अजून पदरी गाढवे बाळगून नवा उद्योग धंदा सुरु का केला नाही, हे कळत नाही.

गाढविणीचे दुध तर प्यालो होतोच. त्याची भरपाई करून कशी द्यावी या विचारात होतो तेव्हाच आमच्या प्राध्यापक मित्राने हे सुचविले की गाढवावर काहीतरी लिही. गाढव उकिरड्यावर अरबट चरबट खात असते. त्याला ते पचते. तुही स्वत:ला लेखक समजून पांढऱ्यावर काहीतरी काळे करीत असतोस, तुलाही ते जमते. त्यामुळे त्या अर्थाने तू आणि गाढव दोघे सारखेच! अर्थात त्यामुळेच गाढवाच्या मागे हात धुवून लागलो (कुणा गाढवीणीच्या नव्हे)

कोणी (गाढवाने) गाढवाची मुलाखत घेतली तर ती खरंच बहारदार होईल. आपल्या लत्ताप्रहाराने आणि खिंकाळण्याने मालकालाही जेरीला आणणारे गाढव आपल्या पोतडीतून काय काय काढेल याचा नेम नाही. पळून जाऊ नये, लाथा झाडू नये म्हणून पाठीवर ओझं देऊन पायात दोरी अडकविणाऱ्या मालकाबद्दल त्याला काय वाटत असेल? उकिरडा फुंकायच्या अगोदर रस्त्यावरून चालताना असलेला पालापाचोळा खात आणि रस्ता साफ करीत जातो, त्याचे फळ म्हणून एखादा स्वच्छतेचा पुरस्कार त्याला का मिळू नये? पण त्यापेक्षा एखाद्या गाढविणीची मुलाखत घ्यायला हवी. हिमगारांचा पाऊस असो वा कडक उन्हाळा गाढवापेक्षा खेचर किंवा हिनी अधिक ओझे उचलते म्हणून बिचाऱ्या गाढवावर कोण अत्याचार केले जातात. त्याचा तो आक्रोश कानावर हात ठेवलेल्याना ऐकू जात नसणार. पाळीव हत्तीण माजावर आली की तिला म्हणे जंगलात जाड साखळदंडानी बांधून ठेवतात, असे कुठेतरी वाचले होते. येणारा हत्ती मग तो कुठलाही असो, येतो आणि आपला कंड शमवून जातो. मानवी वेश्येचे, हत्तिणीचे आणि गाढविणीचे दु:ख एकाच मापातले असे मला वाटते. अर्ध्या डझन पोरांना जन्माला घालून नामानिराळा रहाणारा माणसातला बाप हत्तीपेक्षा वेगळा तरी कसा? 

असलेला धंदा सोडून गाढवपालनाचा धंदा करता येईल का? घोडामैदान जवळ आहे.

भाग ६ इथे वाचा 
क्रमशः
-भिवा रामचंद्र परब  

No comments:

Post a Comment