नुकत्याच
सेवानिवृत्त झालेल्या आपटेबाई कामधाम आटोपून वाचीत पडल्या होत्या. एवढ्यात
दरवाजाची बेल वाजली. बाईनी काहीशा अनिच्छेने दरवाजा उघडला. दरवाजात निलेश उभा होता. त्यांचा माजी
विद्यार्थी. परदेशात उच्च शिक्षण घेऊन तो नुकताच भारतात परतला होता. बाई नुकत्याच
सेवानिवृत्त झाल्याचे त्याला कळले म्हणून तो त्यांना भेटायला आला होता. इकडच्या तिकडच्या
गप्पा झाल्यावर तो निघून गेला. पण बाई मात्र आपल्या लाडक्या विद्यार्थ्याच्या
आठवणीत गुरफटल्या. निलेशच्या बाबतीत काही वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग त्यांना
जशाचा तसा आठवला.
.....सातवी इयत्तेच्या अ वर्गात आपटेबाई शांतपणे शिकवीत होत्या.
वरकरणी त्या शांत दिसत असल्यातरी गेले काही दिवस मुलां-मुलींच्या तक्रारी होत्या
की,
त्यांच्या दप्तरातील काही वस्तू गायब होतात. कुणाची पट्टी, पेन्सिल, कुणाचे पेन तर
कुणाची वही मिळत नाही. अशा प्रकारचे तक्रारीचे
स्वरूप होते. सातवीची मुले म्हणजे बारा-तेरा वर्षाच्या आत-बाहेरची. एक दोघाच्या
तक्रारी असतील ते काही गांभीर्याने घेण्यासारखी बाब नसते हे त्यांना एवढ्या
वर्षाच्या अनुभवानंतर त्यांना कळले होते. पण काही मुले सातत्याने तक्रारी करीत होती आणि
त्यातील गांभीर्याची बाब म्हणजे ही सर्व मुले एकाच मुलाकडे बोट दाखवीत होती.
म्हणूनच तर बाई बुचकळ्यात पडल्या होत्या. या गोष्टीचा आज सोक्षमोक्ष लावायचाच, असा त्यांनी निर्धार केला होता.
निलेश वर्गात
शांतपणे बसलेला असायचा. अतिशय हुशार नाही
पण एकदम ढ ही नाही असा हा विद्यार्थी. विचारलेल्या प्रश्नांची येतील तेवढीच उत्तर
देणे. कळलं नाही तर विचारणे नाही. कळलं तर अधिक बोलणं नाही. मुलांच्यात
खेळणं नाही की कामाच्या व्यतिरिक्त
मिसळणं नाही. शाळा भरायच्या अगोदर पाच निमिटे नित्यनियमाने येणे आणि घंटा
झाल्याबरोबर निमूटपणे जाणे,
असा हा विद्यार्थी सर्वच शिक्षकांना एक कोडं वाटायचा.
त्याने खेळात, स्पर्धात भाग घ्यावा म्हणून सर्वानी बरेच प्रयत्न केले पण व्यर्थ! कोडं काही सुटत नव्हतं.
आणि अशा या अबोल
निलेश कडे सर्वजण संशयाने पाहात होते,हे केवळ आश्चर्य!
आपटेबाईना सुद्धा याच गोष्टीचे नवल वाटत होते.
टण.. टण.. टण..
मधल्या सुट्टीची घंटा झाली. मुलाच्या गोंगाटात त्या वर्गाबाहेर पडल्या. त्याबरोबर
मुलांमुलींचा घोळकाही बाहेर आला. बाई
स्टाफरूममध्ये आल्या तेव्हा त्यांच्या सर्व सहकार्यांनी खाण्याचे डब्बे उघडले, पण आज बाईचे खाण्याकडे लक्ष नव्हते. काही वेळ तिथेच विचार करून
त्या उठल्या आणि सहज म्हणून जाण्याच्या अविर्भावात आपल्या वर्गासमोरून गेल्या.
जाता जाता त्यांनी वर्गात लक्ष टाकले. वर्गात निलेश एकटाच बसलेला होता. बाईनी मनात
म्हटलं,
मुलांच्या तक्रारीत तथ्य असेल तर निलेशला निश्चितच पकडू!
बाई दरवाजाच्या आडोशाला उभे राहून निलेश काय करतेा आहे ते पाहू लागल्या. वर्ग सर्व
खाली झाला हे पहाताच निलेश हळूच उठला आणि त्याने अविनाशच्या दप्तरात हात घातला. आता मात्र
बाईँना खात्री पटली की मुले बोलतात ते खरं आहे. वर्गातील चोरीमागे निलेशचा हात
आहे. आजपर्यत आपण त्याला एक चांगला मुलगा समजत होतो. मुलांना चांगले संस्कार मिळावे, ते देशाचे एक चांगले
नागरीक बनावेत यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न करतो; पण मग ही मुले अशी का वागतात? आपण त्यांना संस्कार देण्यात कमी पडतो का? त्यांचे विचारचक्र सुरू झाले. यापूर्वीही बाईनी निलेशची सहज
म्हणून त्याच्या घरची चौकशीही केली होती. पण त्यातून हाती काही लागले नाही. त्याचे
आईवडील दोघेही नोकरीला;
तेही चांगल्या हुद्यावर! निलेशने मागावे आणि आईबाबांनी ते
त्याला त्वरीत आणून द्यावे,
अशी घरची उत्तम परिस्थिती असताना त्याने चोरी का करावी? आणि ही चोरी तो केव्हापासून करतो? या विचाराने बाईचे डोके भणाणले. प्रथम आपण शांत रहावे. सहकारी
शिक्षकांचा सल्ला घ्यावा आणि मगच निलेशबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी ठरविले.
नवीनच बदलून आलेल्या
त्यांच्या सहकारी साटमबाई म्हणाल्या, ’अग,
गेल्या वर्षी मी दुसऱ्या शाळेत होते ना,
त्या शाळेत माझ्या वर्गात असा एक मुलगा होता. चोरी करायचा. एक दिवस त्याला मी खूप मारलं आणि
त्याच्या आईवडिलांना बोलावून त्यांना सगळं सांगितलं. त्यांनीही त्याला बेदम मारला. पण त्याच्यात
काहीच सुधारणा झाली नाही. अखेर त्याला शाळेतून काढून टाकला. एकदा का चोरीची सवय लागली की ती सुटणं कठीण ग
बाई ! साटम बाईनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. दुसऱ्या दळवीबाई वयस्कर होत्या. अनुभवी पण धार्मिक आणि देवभोळ्या. त्यांनी आपटेबाईना सांगितले, ’वर्गात जी व्रात्य, दंगेखोर मुले असतात, त्यांना एका
बाजूला घेऊन मी त्यांच्या कानात हळूच सांगते की, तुम्ही जे
काही करता ते सगळं देव पाहतो आणि
रात्री झोपल्यावर तो तुमचा कान कापून नेतो. दुसऱ्या दिवशी तुमचा कान जाग्यावर असला तरी तुम्हांला अजिबात ऐकू
येणार नाही. देव तुम्हांला अशी शिक्षा करील. काही मुले ऐकतात आणि खोडकर आणि व्रात्यपणा सोडून देतात.'' बाईचा हा सल्ला ऐकून
तशाही स्थितीत बाईना हसू आले, बाई अजूनही आपल्या
जुन्या जमान्यात वावरत आहेत तर...? त्या
मनातल्या मनात पुटपुटल्या. अर्थात हे दोन्ही मार्ग त्यांना पसंत पडणे शक्य नव्हते.
कारण आजपर्यत त्यांनी वर्गात
केव्हा छडीचा आधार घेतला नव्हता. कधी प्रेमानं तर कधी केवळ नजरेच्या धाकानं
त्या मुलांना गप्प बसवीत. पण आजची ही घटना सामान्य दिसत असली तरी त्याचा दुरगामी
होणारा परिणाम ओळखून पावले उचलणे आवश्यक होते.
त्यांनी मनात काही एक विचार केला. निलेशच्या प्रामाणिकपणाला अप्रत्यक्ष आवाहन
करायचे. जर तो खरोखरच प्रामाणिक असेल तर तो सगळं सांगून मोकळा होईल. नाहीतर बघू पुढे काय करायचे ते!
मधल्या सुट्टीमध्ये
वर्ग पुन्हा भरले. बाईने सावकाशीने आपल्या वर्गात निघाल्या. वर्गात शिरताच शिल्पा
व अविनाशने पेन,
पेन्सिल चोरीला गेल्याची तक्रार केली. मात्र जो तो निलेशकडे
पाहू लागला. निलेशने खाली मान घातली.
’सर्वानी माझ्याकडे पहा!' बाईनी आदेश दिला तसा सारा वर्ग जिज्ञासेने
बाईकडे पाहू लागला.
’निलेश उभा रहा आणि तुझ्याकडे असलेले पेन, पेन्सिल इकडे
घेऊन ये''
निलेश जाग्यावर उभा राहिला.स्तब्धपणे, कदाचित त्याला हे अनपेक्षित असावे. ’निलेश, पहिल्यांदा इकडे ये.
मधल्या सुट्टीत मी दाराच्याआड उभी राहून सर्व पाहिले आहे. मला जास्त बोलायला लावू
नको''
बाईच्या मनात नसताही बाईचा स्वर करडा झाला होता. आता मात्र
निलेश उठला. आणि वर्गाच्या कचरापेटीत टाकलेले पेन आणि पेन्सिल आणून त्याने बाईना
दिली. सगळा वर्ग शांत झाला.
अगदी पिनड्राप सायलेन्स! खाली मान घालून लटपटत्या पायाने निलेश उभा होता. बाईनी
बोलायला संथपणे सुरूवात केली.
’मुलानों, आज आपण सर्वानी निलेशचे कौतुक करूया'' सर्व मुले आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागली. बाईनी आपले
बोलणे पुढे चालू ठेवले. ’त्याने शिल्पा, अविनाशच्या
हरवलेल्या दोन्ही वस्तू आणून दिल्या. त्याने वस्तू घेतल्या नव्हत्या. आपल्या
वर्गातील मुलांच्या वस्तू दुसराच कोणतरी पळवित होता. आपल्याला त्याचे अद्याप नांव कUलेले नाही, पण तुम्हां
दोघांच्या वस्तू नेताना त्याला निलेशने पाहिले. त्यामुळे घाबरून त्याने त्या वस्तू कचऱ्याचे पेटीत टाकून पलायन केले. निलेशने त्याला नक्की पाहिले
असणार,
आपल्याच मित्रापैकी कोणी असेल म्हणून तो सांगत नसणार, पण केव्हातरी तो नांव सांगेलच, पण त्याआधी आपण त्याचे टाÈयांच्या गजरात कौतुक करूया!
महद्आश्चर्याने काहीच न कळल्यामुळे मुलांनी जोरजोराने टाळ्या वाजविण्यास सुरवात केली.
निलेश आतापर्यत सारे
ऐकत स्तब्धपणे उभा होता. त्याला हे अचानक काय होते आहे हेच कळेना. त्याच्या डोळ्यातून घळाघळा आसवे वाहू लागली. हुंदक्यावर हुंदके देत तो रडू लागला. गदगदत्या स्वरात तो
म्हणाला,
’बाई,
माझं कोतुक करू नका. मीच तो चोर आहे’
’छे, काहीतरीच काय? कसं शक्य आहे
ते?
तुझ्या सारखा एवढा चांगला
मुलगा असे करील असे मला तर वाटत नाही''
’बाई, खरंच सांगतो, आतापर्यत
मुलाच्या वस्तू मीच पळवीत होतो. मी चांगला मुलगा अजिबात नाही''
’ठीक आहे, तूच सांगतोस म्हणून मी क्षणभर विश्वास ठेवतो. पण या
मुलांच्या वस्तू का घेतल्यास? बाईनी आणखी सौम्य
शब्दांत त्याला विचारले.
’ही सगळी शिल्पा, अविनाश, विनायक, अनिकेत,सौरभ, मंदार, मंदा, अहमद, वैशाली हे सर्वजण
मला चिडवतात- मी चोर आहे म्हणून''
’अस्सं? पण ही मुले तुलाच का चिडवतात?
’बाई, गेल्या महिन्यात मला सौरभचे पेन सापडले होते. मी ते त्याला
द्यायला गेलो तर ते पेन मीच चोरले म्हनून सौरभ व अविनाशने मला मारले आणि सर्वजण मला
चोर चोर म्हणून चिडवू लागले. त्यामुळे चिडून त्यांना धडा शिकविण्यासाठी मी यांच्या काहींना काही
वस्तू पळवू लागलो. दडवून ठेवू लागलो.
’एकूण प्रकार असा आहे
तर! बरं,
दडविलेल्या बाकीच्या वस्तू कोठे आहेत?
’आपल्या बागेतल्या
एका झाडाखाली लपवून ठेवल्या आहेत''
’जा पटकन् आणि घेऊन
ये,
ज्यांच्या आहेत त्यांना त्या देऊन टाक'' निलेशने त्या वस्तू आणून ज्याच्या त्यांना देऊन टाकल्या.
बाईनी हातात पट्टी घेतली. मुलांना वाटले बाई आता निलेशला चोपून काढणार. पण बाईनी
बोलायला सुरूवात केली. ’आजच्या घटनेला जेवढा निलेश जबाबदार आहे तेवढीच किंबहुना
त्यापेक्षा जास्त ही सात मुले जबाबदार आहेत. कारण निलेशने प्रामाणिकपणे पेन परत
केल्यामुळे त्याला चोर म्हणून
त्याला हिणवले. त्यामुळे एका प्रामाणिक मुलाला अप्रामाणिकपणे वागावे लागले. बाकींच्या मुलांची ही
प्रथमच वेळ आहे म्हणून मी
त्यांना शिक्षा करीत नाही. मात्र निलेशला त्याच्या या कृतीबद्दल फार मोठी शिक्षा
करणार आहे''
आपटेबाईनी आपले बोलणे थांबविले. सर्व मुलांची उत्सुकता आता
शिगेला पोहचली होती. सर्वाची उत्सुकता अधिक न ताणता बाईनी पुन्हा बोलायला सुरवात
केली. ’मी निलेशला अशी शिक्षा जाहीर करते की, त्याने या वर्षापासून वर्गात सतत पहिल्या क्रमांकाच्या
स्पर्धेत असले पाहिजे. त्याने शाळेचा आदर्श विद्यार्थी बनावे , हीच ती शिक्षा!''
क्षणभर बाई काय
बोलतात हेच वर्गाला कळेना. पण त्याचा अर्थ लक्षात येताच मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. निलेश होकारार्थी मान हालवित आणि डोळयातील आसवं पुसत जाग्यावर
जाऊन बसला.
...आज निलेश भेटायला
आला आणि बाईना हे सगळे आठवले. आपण त्यावेळी दाखविलेला विश्वास निलेशने सार्थ करून दाखविला. आपण केलेले संस्कार वाया गेले
नाहीत याचा बाईना अभिमान वाटला.