सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तुळस हे तसे निसर्गरम्य खेडे, डोंगराच्या कुशीत वसलेले, तीन चार हजार लोकवस्तीचे, बहुसंख्य शेतकरी
समाज,
आधुनिकतेकडे वाटचाल करणारा, गावात एस.टी,
वीज होती. मोठ्या शहरात होणाऱ्या सुधारणा हळूहळू गावात येत होत्या. दिवसभर शेतात राब राब
राबणारा शेतकरी श्रमाचे चार घास सुखाने खात होता. पंचा, कुडता घालणारा, होडावड्याच्या
किंवा वेंगुर्ल्याच्या बाजाराला जाताना झकपक कपडे करून जात होता.
पण या सर्वापासून दूर असलेला रामू हा एक अडाणी शेतकरी, पण मनानं सरळ, चांगल्या
स्वभावाचा,
कुणाशी भांडण नाही की तंटा नाही, आपण बरे किंवा आपले काम बरे, असा एकमार्गी माणूस,
गेल्या एप्रिल
महिन्यात त्याचे लग्न झाले होते. सुशीला त्याची बायको त्याच्यांच सारखी सालस व
गुणी. आज तो सासुरवाडीला चालला होता. घरच्या शेतीवाडी, गुरेढोरे यांच्या उपद्व्यापात त्याला कुठे बाहेर जायला मिळालेच नव्हते. नाही म्हटलं तरी
सुशीला दोनदा माहेराला जाऊन आली. तिच्याबरोबर सासूने प्रत्येकवेळी निरोप पाठविला.
पण त्याने टाळाटाळच केली. पण बायको आज हट्टालाच पेटली ’चलाच’ म्हणाली.
मे महिन्याचे कडक ऊन, अंग अंग
भाजून काढत होते. अशा दुपारच्या कडक उन्हातून जाण्यापेक्षा संध्याकाळी जाऊन सकाळी
यावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे दोघेही रमतगमत दिवस मावळण्याच्या सुमारास
घरी पोहोचली. जावयाला पाहून सासूला खूपच आनंद झाला.
’’असां हो काय पाव्हण्यानू, किती दिवस झाले,
तुम्ही इलास नाय ते?‘‘ आपल्या अनुनासिक आवाजात सासूने विचारले.
’’कसो येतलय? शेतीवाडीची कामां
पडलीहत,
फुरसतच मिळेना‘‘ बाहेर बसता बसता रामू म्हणाला.
एवढ्यात गुरे चरावयास घेऊन गेलेला सासराही परतला. एकमेकांचे
क्षेमकुशल,
विचारपूस झाली.
’’पाव्हण्यानू, आता ऱ्हावतलास मा चार-पाच दीस?‘‘
’’छा! छा!! उद्या सकाळी माका जावक व्हया, सुशीलाक ठेया व्हया
तर दोन तीन दिवस!‘‘
इतक्यात सासू दाराच्या चौकटीत उभी राहिली. ’’खय जाताल्यास? मी काय दोन
दिवस सोडनय नाय तुमका! ‘‘
आणि रामू मनात समजला. आता आणखी दोन दिवस इथे राहण्याशिवाय
गत्यंतर नाही.
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सासरा बैलांना वैरण
टाकण्यासाठी गेला. सुशीलाही शेजाऱ्या-पाजाऱ्याकडे
गेली असावी. धाकटी मेव्हणी अधूनमधून त्याच्याबरोबर बोलत
होती,
पुन्हा घरात कामासाठी जात होती. घरात सासूची चाललेली धावपळ त्याला बसल्या जागेवरून दिसत होती.
एवढ्यात चाळऽऽऽ चुर्रर्रऽऽऽ असा स्वयंपाक घरातून आवाज आला आणि तो मनात हसला. सासू
जावयासाठी घावने बनवित होती तर... तांदळाचे घावने त्याला त्याला खूप आवडायचे.
सुशीलाने बहुधा घरात सांगितले असणार. सहज वेळ जावा म्हणून आवाजाच्या अनुषंगाने तो
घावने मोजू लागला. एक... दोन... तीन... पंधरा, सोळा आणि
आवाज येणे बंद झाला. म्हणजे सासूने एकशेर तांदळाचे घावने बनविले तर.. जेवताना
बरोबर आकडा सांगून सासूची आणि मेव्हणीची जरा गंमत करावयाची त्याने ठरविले.
सासूने जरा लवकरच जेवण वाढले. धाकटी मेव्हणी मध्येच चिवचिवत
होती. रामूने आपल्या व सासÚयाच्या जेवणावरून नजर फिरविली. प्रत्येकी चार चार घावने
वाढले होते. “अरे घरात मग शिल्लक किती राहिले? रामू मनात हिशोब करू लागला. अजून तीन माणसे जेवायची आहेत
आणि घावने तर आठ शिल्लक राहिले आहेत. त्याचे घावने खाऊन झाल्यावर जेव्हा सासू
त्याला परत घावने वाढायला आली, तेव्हा भोळ्या मनाचा
रामू सहज म्हणाला,
मामी, घावने तुमका ठेवा, माका नको, सोळाच तर घावने
झाले. आणि रामू मनात हसला,
कशी गंमत केली या अर्थाने!‘‘ अरे,
ह्यांका कसा कळला, मिया घावने सोळा केलय ते? ती तशीच घाईघाईने आतल्या खोलीत मुलीकडे गेली.
’’काय गो चेडवा, तू घोवाक्
सांगितलस,घावने फक्त सोळाच केले म्हणून?‘‘
मुलीच्या नकाराने ती आश्चर्यचकीत झाली. आपला जावई कुणी
साधूपुरूष असावा,
त्याला अंतर्ज्ञानाने सारे जळते याविषयी तिच्या मनात दुमत
राहिले नाही आणि ती अतिशय आनंदित झाली. त्याच आनंदात तिनं घरातल्या कामाची आवराआवर
केली आणि ती शेजारच्या घरी गेली. केव्हा हे सगळ्यांना सांगते असं तिला झालं.
रात्रभर तिचा डोळ्याला डोळा लागला नाही.
पण या गोष्टीची जाणीव नसलेला रामू मात्र डाराडूर झोपला.
सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.
चहा पिऊन होतो न होतो तोच एक-एक करता घरासमोर गर्दी जमू लागली. रामू बाहेर
बाकड्यावर बसला होता,
तो ही गर्दी पाहून आश्चर्यचकीत झाला. येणारा जाणारा
त्याच्या पाया पडू लागला. कोण आपल्या आजारपणाबद्दल त्याला सांगू लागले तर कोणी
घरातील कटकटीबद्दल त्याचा सल्ला विचारू लागले. त्याला कळेचना की हे लोक आपल्या
पाया का पडतात?
आपल्याला हे का सांगतात? त्याने हळूच त्याबद्दल
बायकोला विचारले,
तिनं सांगितले ते ऐकून त्याने कपाळावर हात मारून घेतला.
सासूने पराचा कावळा केला आणि नसतं संकट मात्र ओढवले रामूवर. मनातल्या मनात रामूला
राग आला त्यांचा.
आता कसेही करून हे संकट निस्तरले पाहिजे असे त्यांनी
ठरविले. तो अशिक्षित शेतकरी असला तरी व्यवहारचतूर होता. त्याला भेटायला आलेल्या
लोकांना थातूरमातुर उत्तरे देऊन त्याने वाटेला लावले. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यत येथून निसटायचेच या
विचाराने तो कुठे हाश्य-हुश्य करतो तोच एक शेतकरी धावत पळत येताना दिसला. रामू सावरून बसला. तो आला, भक्तिभावाने रामूच्या पाया पडला.
“पाव्हण्याणू, आमच्या
पोलीसपाटलाचे तीन म्हशी काल दुपारपासून हरवलेले आसत. खय आसत ते सांगल्यास तर खूप
उपकार होतीत. आता आली का पंचाईत, पण घेतलेले सोंग तर वठविणे आवश्यक होते आणि त्याला आठवले, काल येताना गांवापासून अडीच-तीन मैलावरील एका ओढ्यात तीन
म्हशी डुंबत होत्या. कडक उन्हामुळे त्या एवढ्या लांबवर जाऊन पाण्यात डुंबत
असाव्यात. पण आता हे या शेतकऱ्याला सांगणार कसं? त्याला एक
युक्ती सुचली. त्याने डोळे मिटले आणि मंत्र म्हटल्यासारखे दोन ओळी पुटपुटल्या.
शेराचे घावने पंधरा सोळा
पाटल्याच्या म्हशी बोंडगीच्या व्होळा
रामुने डोळे
उघडले,
“असेच उत्तरेच्या
बाजूला जा,
दोन-अडीच मैलांच्या परिसरात म्हशी आढळतील“
भक्तिभावाने नमस्कार करून शेतकरी निघून गेला आणि तासाभरात
खुद्द पाटीलच त्याला भेटायला आले. तेव्हा तो खरोखरच आश्चर्यचकीत झाला होता. काल
दिवसभर शोधूनही न सापडलेल्या म्हशींचा ठावठिकाणा पाव्हण्याने अचूक सांगितला होता.
ही बातमी वणव्यासारखी सगळीकडे पसरली. लोक एकसारखे त्याच्याकडे येत होते. आणि
रामूची खरंच पंचाईत होऊ लागली. त्याने बायकोला आवराआवर करायला सांगितले. एवढ्यात
दुसरेच एक संकट त्याच्यासमोर आ वासून उभे राहिले. त्याच गांवातील एक प्रतिष्ठित
सावकार त्याच्याकडे आला. त्याची मुलगी आंघोळीला गेली असता गळ्यातील हार तिनं
बाजुला काढून ठेवला,
तो एकाएकी नाहीसा झाला. कुणी चोरून नेला म्हणावं तर
आजूबाजुला चिटपाखरूसुध्दा नव्हत.
सावकार गयावया करून सांगू लागला तसा रामू विचारात पडला. काय
करावं आता?
तो ओठातल्या ओठात पुटपुटू लागला. सावकाराला वाटले तो मंत्र
म्हणतोय,
एवढ्यात खळ्यात एका घारीने कोंबडीच्या छोट्या पिलावर झडप
घातली. आणि रामूने डोके चालविल, कदाचित घारीने तो
सर्प समजून हार उचलला नसेल ना? असेल किंवा नसेलही, पण रामुच्या मनात एक कडी जुळली आणि मंत्र पुटपुटल्याप्रमाणे
तो बोलला.
शेराचे घावने पंधरा सोळा
पाटलाच्या म्हशी
बोंडगीच्या व्होळा
सावकाराच्या मुलीचा
हार घुशीच्या बिळा
झालं, सावकाराला पटलं, त्याने आपली
माणसे सगळीकडे पाठविला. रामू मात्र मनात हसत होता.त्याला मा हित होते, प्रत्येकवेळा योगायोग घडतातच असे नाही. पाटलाच्या म्हशी
त्याने प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. पण सावकाराला मारलेली शुध्द थाप होती. त्यामुळे
सावकार परत येण्यापूर्वी तेथून त्याला सटकायचं होतं.
सासू सासऱ्याचा आणि दोन दिवस राहून लोकांचे कल्याण करण्याचा आग्रह डावलून, त्याचां निरोप घेऊन रामू बाहेर पडणार एवढ्यात सावकार आनंदी चेहऱ्याने आला. त्याच्या पाया
पडता पडता हार मिळाल्याची शुभवार्ता त्याने सांगितली. सावकाराची घरी चलण्याची
विनंती डावलूनच त्याने आपल्या घराची वाट धरली. योगायोगाने आज त्याला तारले होते.
पुन्हा या असल्या भानगडीत न पडण्याची त्याने शपथ घेतली.
-भिवा
रामचंद्र परब
No comments:
Post a Comment