Saturday, 4 March 2017

काळोख

क्षितिजाच्या पलिकडे काळोख
त्याही पलिकडे पावलांपावलावर मुडदे
रेखून त्या देहावर काळोखनक्षी;
स्वतःच न्याहाळले त्यांनी उद्याचे भविष्य!
क्षितिज अल्याड त्याला खुणावू लागले
साथीला कोणी नसतानाच
तत्त्वचिंतकाची करूणा व्यापक रूप
घेऊन त्याच्यासमोर आली.
काळोखाचं रूप पाहून
ती गहिवरली; तोही ओशाळला.
अवकाश तर निर्मम झाल्यासारखे
वाटले त्याला!
विश्वनिर्मात्याच्या कृतीचा त्याला
अर्थच कळेना.
प्रकाशाचे स्तोम माजविण्यासाठी;
कृष्णकृत्य लपविण्यासाठी का आपला जन्म?
का आपला वाली कोणीच नाही?
तो सैरभैर झाला.
अंतिम पर्वाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी
बेलगाम वाऱ्याच्या अश्वावरून उर फाटेस्तोवर
तो धावत राहिला.
पिढ्यांनपिढ्याचे  ओझे उतरविण्यासाठी...
काहीशा अंधुक अशा आठवणीने
तो पुन्हा मागे फिरला;
आपल्याच पाऊलखुणाचा मागोवा घेत.
रस्ता ठाऊक नव्हता तरी
वस्तीच्या शोधात चालला;
भरकटला; थकला.
अरण्यरूदन कोणाचे?स्वतःचेच?
प्रश्न पडला.
अरे, इथं तर कुणाचाच पत्ता नाही!
भास होता का?
भास करूणेचा;
भास वस्तीचा;
भास अरण्यरूदनाचा;
भास अस्तित्चाचा;
भास-आभासातच तो गुरफटत राहिला.
खरंतर या विश्वचक्राचाच
त्याला ऊबग आला.
तो आणखी काळाकभिन्न झाला
रागाने मुडदे पाडत राहिला;
हतबल होऊन आपल्याच कोषात मरून गेला
...काळोख.
                                  -भिवा रामचंद्र परब

No comments:

Post a Comment