Sunday, 30 April 2017

झरोका

एक झरोका....
उन्मत्त क्षितिजाशी फटकून वागणारा.
त्याने लावलाय सापळा
अस्वस्थ दुःखाच्या किनाऱ्यापासून
दूर होण्यासाठी.
हेही नसे थोडके!
झरोका...
निर्जीव बाहुल्याच्या निष्पाप
डोळ्यासारखी
भासते ही पोकळी;
मानभावीपणाच्या
वस्त्रगाळ लेपातून भरून न येणारी,
पण कुणी सांगितले
बाहुलीला जीव नसतो म्हणून?
जीव लावून तर बघा:
आरशातील प्रतिबिंबासारखी
भासेल ती!
करूणा तिची माझी
आसवांची
तिमिरातील स्वप्ने
ओळखीची
दोघी सारख्या;
एकाच झरोक्यातून वावरणाऱ्या,
डोळ्यात स्वप्ने घेऊन
आकाश पेललेल्या.
झरोक्यातून आता
सुगंध येऊ लागलाय,
मातीत गुलाबांची स्वप्ने
दफन केली वाटतय,
झरोका आणि क्षितिज आता
मित्र झाले म्हणतात.
आपलं म्हणून कुणीतरी हवं ना,
म्हणून!

               -भिवा रामचंद्र परब

Saturday, 4 March 2017

काळोख

क्षितिजाच्या पलिकडे काळोख
त्याही पलिकडे पावलांपावलावर मुडदे
रेखून त्या देहावर काळोखनक्षी;
स्वतःच न्याहाळले त्यांनी उद्याचे भविष्य!
क्षितिज अल्याड त्याला खुणावू लागले
साथीला कोणी नसतानाच
तत्त्वचिंतकाची करूणा व्यापक रूप
घेऊन त्याच्यासमोर आली.
काळोखाचं रूप पाहून
ती गहिवरली; तोही ओशाळला.
अवकाश तर निर्मम झाल्यासारखे
वाटले त्याला!
विश्वनिर्मात्याच्या कृतीचा त्याला
अर्थच कळेना.
प्रकाशाचे स्तोम माजविण्यासाठी;
कृष्णकृत्य लपविण्यासाठी का आपला जन्म?
का आपला वाली कोणीच नाही?
तो सैरभैर झाला.
अंतिम पर्वाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी
बेलगाम वाऱ्याच्या अश्वावरून उर फाटेस्तोवर
तो धावत राहिला.
पिढ्यांनपिढ्याचे  ओझे उतरविण्यासाठी...
काहीशा अंधुक अशा आठवणीने
तो पुन्हा मागे फिरला;
आपल्याच पाऊलखुणाचा मागोवा घेत.
रस्ता ठाऊक नव्हता तरी
वस्तीच्या शोधात चालला;
भरकटला; थकला.
अरण्यरूदन कोणाचे?स्वतःचेच?
प्रश्न पडला.
अरे, इथं तर कुणाचाच पत्ता नाही!
भास होता का?
भास करूणेचा;
भास वस्तीचा;
भास अरण्यरूदनाचा;
भास अस्तित्चाचा;
भास-आभासातच तो गुरफटत राहिला.
खरंतर या विश्वचक्राचाच
त्याला ऊबग आला.
तो आणखी काळाकभिन्न झाला
रागाने मुडदे पाडत राहिला;
हतबल होऊन आपल्याच कोषात मरून गेला
...काळोख.
                                  -भिवा रामचंद्र परब

Sunday, 19 February 2017

विलक्षण योगायोग

          सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तुळस हे तसे निसर्गरम्य खेडे, डोंगराच्या कुशीत वसलेले, तीन चार हजार लोकवस्तीचे, बहुसंख्य शेतकरी समाज, आधुनिकतेकडे वाटचाल करणारा, गावात एस.टी, वीज होती. मोठ्या शहरात होणाऱ्या सुधारणा हळूहळू गावात येत होत्या. दिवसभर शेतात राब राब राबणारा शेतकरी श्रमाचे चार घास सुखाने खात होता. पंचा, कुडता घालणारा, होडावड्याच्या किंवा वेंगुर्ल्याच्या बाजाराला जाताना झकपक कपडे करून जात होता.
          पण या सर्वापासून दूर असलेला रामू हा एक अडाणी शेतकरी, पण मनानं सरळ, चांगल्या स्वभावाचा, कुणाशी भांडण नाही की तंटा नाही, आपण बरे किंवा आपले काम बरे, असा एकमार्गी माणूस, गेल्या  एप्रिल महिन्यात त्याचे लग्न झाले होते. सुशीला त्याची बायको त्याच्यांच सारखी सालस व गुणी. आज तो सासुरवाडीला चालला होता. घरच्या शेतीवाडी, गुरेढोरे यांच्या उपद्व्यापात त्याला कुठे बाहेर जायला मिळालेच नव्हते. नाही म्हटलं तरी सुशीला दोनदा माहेराला जाऊन आली. तिच्याबरोबर सासूने प्रत्येकवेळी निरोप पाठविला. पण त्याने टाळाटाळच केली. पण बायको आज हट्टालाच पेटली  चलाच  म्हणाली.
          मे हिन्याचे कडक ऊन, अंग अंग भाजून काढत होते. अशा दुपारच्या कडक उन्हातून जाण्यापेक्षा संध्याकाळी जाऊन सकाळी यावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे दोघेही रमतगमत दिवस मावळण्याच्या सुमारास घरी पोहोचली. जावयाला पाहून सासूला खूपच आनंद झाला.
          ’’असां हो काय पाव्हण्यानू, किती दिवस झाले, तुम्ही इलास नाय ते?‘‘ आपल्या अनुनासिक आवाजात सासूने विचारले.
          ’’कसो येतलय? शेतीवाडीची कामां पडलीहत, फुरसतच मिळेना‘‘ बाहेर बसता बसता रामू म्हणाला.
          एवढ्यात गुरे चरावयास घेऊन गेलेला सासराही परतला. एकमेकांचे क्षेमकुशल, विचारपूस झाली.
          ’’पाव्हण्यानू, आता  ऱ्हावतलास मा चार-पाच दीस?‘‘
          ’’छा! छा!! उद्या सकाळी माका जावक व्हया, सुशीलाक ठेया व्हया तर दोन तीन दिवस!‘‘ इतक्यात सासू दाराच्या चौकटीत उभी राहिली. ’’खय जाताल्यास? मी काय दोन दिवस सोडनय नाय तुमका! ‘‘ आणि रामू मनात समजला. आता आणखी दोन दिवस इथे राहण्याशिवाय गत्यंतर नाही.
          थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सासरा बैलांना वैरण टाकण्यासाठी गेला. सुशीलाही शेजाऱ्या-पाजाऱ्याकडे गेली असावी. धाकटी मेव्हणी अधूनमधून त्याच्याबरोबर बोलत होती, पुन्हा घरात कामासाठी जात होती. घरात सासूची चाललेली  धावपळ त्याला बसल्या जागेवरून दिसत होती. एवढ्यात चाळऽऽऽ चुर्रर्रऽऽऽ असा स्वयंपाक घरातून आवाज आला आणि तो मनात हसला. सासू जावयासाठी घावने बनवित होती तर... तांदळाचे घावने त्याला त्याला खूप आवडायचे. सुशीलाने बहुधा घरात सांगितले असणार. सहज वेळ जावा म्हणून आवाजाच्या अनुषंगाने तो घावने मोजू लागला. एक... दोन... तीन... पंधरा, सोळा आणि आवाज येणे बंद झाला. म्हणजे सासूने एकशेर तांदळाचे घावने बनविले तर.. जेवताना बरोबर आकडा सांगून सासूची आणि मेव्हणीची जरा गंमत करावयाची त्याने ठरविले.
          सासूने जरा लवकरच जेवण वाढले. धाकटी मेव्हणी मध्येच चिवचिवत होती. रामूने आपल्या व सासÚयाच्या जेवणावरून नजर फिरविली. प्रत्येकी चार चार घावने वाढले होते. अरे घरात मग शिल्लक किती राहिले? रामू मनात हिशोब करू लागला. अजून तीन माणसे जेवायची आहेत आणि घावने तर आठ शिल्लक राहिले आहेत. त्याचे घावने खाऊन झाल्यावर जेव्हा सासू त्याला परत घावने वाढायला आली, तेव्हा भोळ्या मनाचा रामू सहज म्हणाला, मामी, घावने तुमका ठेवा, माका नको, सोळाच तर घावने झाले. आणि रामू मनात हसला, कशी गंमत केली या अर्थाने!‘‘ अरे, ह्यांका कसा कळला, मिया घावने सोळा केलय ते? ती तशीच घाईघाईने आतल्या खोलीत मुलीकडे गेली.
          ’’काय गो चेडवा, तू घोवाक् सांगितलस,घावने फक्त सोळाच केले म्हणून?‘‘
          मुलीच्या नकाराने ती आश्चर्यचकीत झाली. आपला जावई कुणी साधूपुरूष असावा, त्याला अंतर्ज्ञानाने सारे जळते याविषयी तिच्या मनात दुमत राहिले नाही आणि ती अतिशय आनंदित झाली. त्याच आनंदात तिनं घरातल्या कामाची आवराआवर केली आणि ती शेजारच्या घरी गेली. केव्हा हे सगळ्यांना सांगते असं तिला झालं. रात्रभर तिचा डोळ्याला डोळा लागला नाही.
          पण या गोष्टीची जाणीव नसलेला रामू मात्र डाराडूर झोपला. सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. चहा पिऊन होतो न होतो तोच एक-एक करता घरासमोर गर्दी जमू लागली. रामू बाहेर बाकड्यावर बसला होता, तो ही गर्दी पाहून आश्चर्यचकीत झाला. येणारा जाणारा त्याच्या पाया पडू लागला. कोण आपल्या आजारपणाबद्दल त्याला सांगू लागले तर कोणी घरातील कटकटीबद्दल त्याचा सल्ला विचारू लागले. त्याला कळेचना की हे लोक आपल्या पाया का पडतात? आपल्याला हे का सांगतात? त्याने हळूच त्याबद्दल बायकोला विचारले, तिनं सांगितले ते ऐकून त्याने कपाळावर हात मारून घेतला. सासूने पराचा कावळा केला आणि नसतं संकट मात्र ओढवले रामूवर. मनातल्या मनात रामूला राग आला त्यांचा.
          आता कसेही करून हे संकट निस्तरले पाहिजे असे त्यांनी ठरविले. तो अशिक्षित शेतकरी असला तरी व्यवहारचतूर होता. त्याला भेटायला आलेल्या लोकांना थातूरमातुर उत्तरे देऊन त्याने वाटेला लावले. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यत येथून निसटायचेच या विचाराने तो कुठे हाश्य-हुश्य करतो तोच एक शेतकरी धावत पळत येताना दिसला. रामू सावरून बसला. तो आला, भक्तिभावाने रामूच्या पाया पडला.
          “पाव्हण्याणू, आमच्या पोलीसपाटलाचे तीन म्हशी काल दुपारपासून हरवलेले आसत. खय आसत ते सांगल्यास तर खूप उपकार होतीत.    आता आली का पंचाईत, पण घेतलेले सोंग तर वठविणे आवश्यक होते आणि त्याला आठवले, काल येताना गांवापासून अडीच-तीन मैलावरील एका ओढ्यात तीन म्हशी डुंबत होत्या. कडक उन्हामुळे त्या एवढ्या लांबवर जाऊन पाण्यात डुंबत असाव्यात. पण आता हे या शेतकऱ्याला सांगणार कसं? त्याला एक युक्ती सुचली. त्याने डोळे मिटले आणि मंत्र म्हटल्यासारखे दोन ओळी पुटपुटल्या.
                   शेराचे घावने पंधरा सोळा
                   पाटल्याच्या म्हशी बोंडगीच्या व्होळा
रामुने डोळे उघडले, “असेच  उत्तरेच्या बाजूला जा, दोन-अडीच मैलांच्या परिसरात म्हशी आढळतील
          भक्तिभावाने नमस्कार करून शेतकरी निघून गेला आणि तासाभरात खुद्द पाटीलच त्याला भेटायला आले. तेव्हा तो खरोखरच आश्चर्यचकीत झाला होता. काल दिवसभर शोधूनही न सापडलेल्या म्हशींचा ठावठिकाणा पाव्हण्याने अचूक सांगितला होता. ही बातमी वणव्यासारखी सगळीकडे पसरली. लोक एकसारखे त्याच्याकडे येत होते. आणि रामूची खरंच पंचाईत होऊ लागली. त्याने बायकोला आवराआवर करायला सांगितले. एवढ्यात दुसरेच एक संकट त्याच्यासमोर आ वासून उभे राहिले. त्याच गांवातील एक प्रतिष्ठित सावकार त्याच्याकडे आला. त्याची मुलगी आंघोळीला गेली असता गळ्यातील हार तिनं बाजुला काढून ठेवला, तो एकाएकी नाहीसा झाला. कुणी चोरून नेला म्हणावं तर आजूबाजुला चिटपाखरूसुध्दा नव्हत.
          सावकार गयावया करून सांगू लागला तसा रामू विचारात पडला. काय करावं आता? तो ओठातल्या ओठात पुटपुटू लागला. सावकाराला वाटले तो मंत्र म्हणतोय, एवढ्यात खळ्यात एका घारीने कोंबडीच्या छोट्या पिलावर झडप घातली. आणि रामूने डोके चालविल, कदाचित घारीने तो सर्प समजून हार उचलला नसेल ना? असेल किंवा नसेलही, पण रामुच्या मनात एक कडी जुळली आणि मंत्र पुटपुटल्याप्रमाणे तो बोलला.
                   शेराचे घावने पंधरा सोळा
                   पाटलाच्या म्हशी
                   बोंडगीच्या व्होळा
                   सावकाराच्या मुलीचा
                   हार घुशीच्या बिळा
झालं, सावकाराला पटलं, त्याने आपली माणसे सगळीकडे पाठविला. रामू मात्र मनात हसत होता.त्याला मा हित होते, प्रत्येकवेळा योगायोग घडतातच असे नाही. पाटलाच्या म्हशी त्याने प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. पण सावकाराला मारलेली शुध्द थाप होती. त्यामुळे सावकार परत येण्यापूर्वी तेथून त्याला सटकायचं होतं.
          सासू सासऱ्याचा आणि दोन दिवस राहून लोकांचे कल्याण करण्याचा आग्रह डावलून, त्याचां निरोप घेऊन रामू बाहेर पडणार एवढ्यात सावकार आनंदी चेहऱ्याने आला. त्याच्या पाया पडता पडता हार मिळाल्याची शुभवार्ता त्याने सांगितली. सावकाराची घरी चलण्याची विनंती डावलूनच त्याने आपल्या घराची वाट धरली. योगायोगाने आज त्याला तारले होते. पुन्हा या असल्या भानगडीत न पडण्याची त्याने शपथ घेतली.
-भिवा रामचंद्र परब

Wednesday, 15 February 2017

रस्ते बांधा रे !

          गेल्या वर्षी स्वाईन फ्लूमुळे शाळा बंद पडल्या आणि मुलांबरोबर मास्तरांनाही सुट्टया लागल्या. शासनाच्या आदेशाने पहिली घटक चाचणी रद्द करण्यात आली आणि दहावीला शिकविणारे मास्तर खऱ्या अर्थाने गोरेमोरे झाले. परीक्षा नाही तर त्यांचा कल कसा समजणार? कारण मास्तरापासून ते समाजापर्यत शाळेच्या  प्रगतीचा आलेख या दहावीच्या मुलांच्या निकालावर अवलंबून असतो, यावर सर्वाचे एकमत आहे. पहिली ते नववीचा कसाही निकाल लागो, पण दहावीचा निकाल उत्तमच लागला पाहिजे. येथे उत्तम म्हणजे शंभर टक्के बरं का! त्यासाठीच तर काही शाळांनी छान मार्ग निवडला. पहिल्यापासूनच हुषार पोरं निवडायची. त्यानाच दहावीत न्यायचं. (आता तर आठव़ीपर्यत कुणीच नापास होत नाही. शासकीय आदेश, नाईलाज है और नाईलाज को क्या इलाज भिडू!) बस्स! त्यांनाच घोकून घोकून शिकविले की झाले. किती सोपं, दहावीचा निकाल शंभर टक्के लागायला तशी अडचण काहीच नसते. पण तरीही काही नतद्रष्ट शाळा  असतात की अगदी जीव तोडून पोरांना पहिली पासून व्यवस्थित शिकवितात. यांचा नववीचा निकाल शंभर टक्के असतो आणि हो दहावीचाही! असो.
          मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने शासनाने पहिली घटक चाचणी रद्द केली तरी शिकविलेल्या काही धड्यावर (शासनाला नक, नाहीतरी शासनाला नकबऱ्याच गोष्टी शाळेत घडत असतात) एका शाळेने परीक्षा ठेवलीच. मराठीच्या 'रस्ते बांधा रे'आणि 'समन्वयाचा अभाव' या दोन धड्यावर घेतलेल्या गेल्या वर्षीच्या घटक चाचणीची एका विद्यार्थ्याने लिहिलेली उत्तरपत्रिका आमच्या हाती लागली. तीच आदर्श उत्तरपत्रिका खास इतर विद्यार्थ्यासाठी-
प्र.१ : परदेशातील रस्त्यापेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खराब, ओबडधोबड का? विस्तारपूर्वक लिहा.
        प्रस्तुत प्रश्न (कोणीतरी) रस्ते बांधा रे या धड्यातील आहे. (मुळात मराठीच्या पुस्तकात या धड्याचे प्रयोजन काय? हा प्रश्नच आहे) लेखक बांधकाम व्यावसायिक असून ते जादा तर परदेशात वास्तव्यास असतात. भारतातील अर्धेमुध्र्ये पूर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले आणि तेथे त्यांनी कुठल्यातरी फुटक संस्थेची फुटक डिग्री घेतली (येथे फुटक हा शब्द एवढ्यासाठीच वापरला आहे की, डिग्री कोणती हे मलाच माहित नाही. नेटवर शोधले पण या डिग्रीची माहिती नाही) ते तेथेच स्थायिक झाले. उद्योगधंदे उभारले. तेथल्या गोरगरीबांचीसेवा करण्यात त्यांचे अर्धे आयुष्य गेले.(भारतातील गोरगरिबांसाठी त्यांनी छदामही दिला नाही) आताच त्यांनी परदेशातील कुठल्याशा कार्यक्रमात एका परदेशी नामांकित संस्थेला काही डॉलर दान केले (हे धड्यात नाही, पण मला चौफेर ज्ञान आहे हे दाखविण्यासाठी लिहिले आहे) पण हे लेखक भारतात आपल्या उद्योगधंद्याचे जाळे विणू पहात असताना त्यांना आलेला रस्ते बांधणीसंबंधीचा दाहक अनुभव या धड्यात मांडलेला आहे.
लेखकाच्या मते भारतातील रस्ते तयार करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा आहे. पण शासनाच्या वाटेला शक्यतो स्वत:हून जायचे नाही, आणि आपल्या वाटेत शासन आले तर त्याला टाळायचे नाही या त्याच्या सूत्रानुसार त्याने शासनाकडे निविदा भरण्याचे त्याने टाले. लोकप्रतिनिधीना शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून असे रस्ते तयार करता येतात. हे त्याला कले, प्रथम एका छोट्याशा कामाचा अनुभव घ्यावा म्हणून लेखक आपल्या महाराष्ट्रातील आपल्या गांवातील एक छोटासा रस्ता बांधण्यासाठी (निधी मिविण्यासाठी) एका लोकप्रतिनिधीकडे गेला, पण लोकप्रतिनिधी स्वत: कधी पैशाचे व्यवहार करीत नसतात हे त्या लोकप्रतिनिधीनीने त्यांच्या लक्षात आणून दिले, त्यासाठी त्यांचा खाजगी सचीव नावाचा प्राणी असतो, (सायबांचे सर्व कार्यकर्ते स्वत:ला सायबांचे पीए समजतात हा भाग निराळा ) तो सायबांचे सगळे (यात लावणीपासून भजनानंदात किंवा आत्मानंदात टाळी लावण्यापर्यतच्या सर्व गोष्टी आल्यात बरं का!) सांभातो.  लेखक त्याच्या खाजगी सचिवाकडे गेला. तेव्हा त्याला कले की पीए चा रूबाब सायबाच्या वर आहे. लेखकाने आपण का आलो हे त्याला सांगितले तेव्हा कोणतीही भाडमुर्वत न ठेवता त्याने  एकूण मंजूर करण्यात येणाऱ्या रकमेपैकी पंधरा टक्के रक्कम सायबांना एडव्हांसमध्ये द्यावी लागेल, असे सांगितले. (त्याची फोड अशी बारा टक्के सायबाला, तीन टक्के त्याला म्हणजे सचीवाला). काहीतरी टक्केवारी द्यावी लागते हे लेखक महाशयानी वृत्तपत्रातून वाचले होते. मध्ये केव्हातरी टक्केवारीचे प्रकरण महाराष्ट्रात खुपच गाजले होते. पण ते परदेशात धंदे करीत असल्यामुळे त्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. त्यामुळे त्याला त्याचे काहीच वाटले नाही. पण गप्पाच्या नादात त्याला पुढे जे समजले ते ऐकून त्यांना धक्का बसतो. कारण रस्ताचे काम मिळेपर्यत सुमारे ४० टक्के वाटण्यात जाणार असल्याचे त्याला कले. उरते ती ६० टक्के रक्कम. कुठलाही व्यावसायिक आपला तोटा सहन करून धंदा करीत नाही. करोडो रूपयांच्या कॉन्ट्रक्टसाठी करोडो रूपये ओतायचे असतील तर तसा फायदा होणे आवश्यक आहे. म्हणजे तीस टक्के फायदा अपेक्षित आहे असे धरले तर उरलेल्या तीस टक्क्यात बाकीचे काम पूर्ण होणे आवश्यक असते.
          याचा दुसरा अर्थ असा होतो ज्या कामासाठी शंभर टक्के रक्कम खर्च करायची असते तेथे फक्त तीस टक्क्यात पूर्ण रस्ता तयार होतो म्हणजेच सिमेंटच्या जागी रेती वाळू. कारण त्यांना तेच परवडत असते. असा तयार झालेला रस्ता त्याचे उद्घाटन झाल्याबरोबर (कधीकधी उद्घाटन होण्यापूर्वीच) ओबडधोबड दिसू लागतो. म्हणजेच त्याच रस्त्यावर पुन्हा दुरूस्तीच्या नांवावर खर्च करायला राज्यकर्ते मोकळे. लेखकाला येथे स्व.राजीव गांधीचे एक समर्पक वाक्य आठवले, गरीबांसाठी ज्या योजना राबविते, त्या योजनेच्या एका रूपयातील फक्त दहा पैसेच तळागाळापर्यत पोहोचतात. लेखकाने याचा एवढा धस्का घेतला की त्यांनी यापुढे महाराष्ट्रात रस्ते बांधणीचे कॉन्ट्रक्ट घ्यायचे नाही असे ठरविले.
प्रश्न २ : समन्वयाचा अभाव सोदाहरण स्पष्ट करा.
          शासनाच्या कुठल्याही दोन विभागात एकवाक्यता नसणे हे शासनाच्या कार्यप्रणालीचे व्यवच्छेदन लक्षण! जरी एकाच इमारतीचा एकाच मजल्यावर तीन शासनयंत्रणांची कार्यालये असतील तरीही शासनाच्या कार्यपध्दतीप्रमाणे ती त्यांनाच माहिती नसतात. मात्र त्याचा फटका सर्वसामांन्याना बसतो. याबाबतचा एक किस्सा येथे लेखकाने वर्णन केलेला आहे. गॅस कंपनी, वीज मंड आणि रस्ते महामंड या शासन यंत्रणा कशी काम करतात ते पहा. रस्ते महामंडळाने गुळगुळीत रस्ते बनविले की वीज मंडळाला अचानक जाग येते. कारण त्यांची वायर या रस्त्याच्या खालून गेलेली असते, आणि त्यात काही फॉल्ट निघालेला असतो. तो गुळगुळीत झालेला रस्ता ते खणून काढतात. त्यात काही महिने निघून जातात, कसंबंस ते रस्ते बुजवून दुसऱ्या चांगल्या रस्त्याची वाट लावायला जातात. आणि मग येतात ते इमर्जन्सीवाले-गॅसवाले. कसाबसा झाकलेला तो रस्ता ते पुन्हा उखडतात आणि त्यात काही महिने घालवून तो पुन्हा बुजवून टाकतात. हे चक्र सतत चालूच असते.
          लेखकाला प्रश्न पडतो की तयार असलेले चांगले रस्ते दोन-तीनदा खोदून ते ओबडधोबड करण्यासाठी का करोडे रूपये खर्च करतात? जनता यांना जाब का विचारीत नाही? त्याचे उत्तरही त्यानेच शोधून काढलेले आहे ते असे. एकच रस्ता तीन तीनदा खोदण्यामुळे अधिकाऱ्यापासून ते सबंधित नेंत्यापर्यत सर्वाचेच हात ओले होतात. शासनाचा जो निधी असतो तो खर्च होणे आवश्यक असते, जर कामे काढली नाही तर हा निधी खर्च कसा होणार? मग अशी कामे काढली की निधी खर्च होतो, नेतेमंडळीना आपण सामाजिक काम केल्याचे दाखविता येते आणि आणि आपली पोतडीही भरता येते आणि जनतेचे म्हणाल तर त्यांना राग येतो, पण करता मात्र काहीही येत नाही.

-भिवा रामचंद्र परब 

Tuesday, 14 February 2017

किती वदाव्या कहाण्या प्रीतीच्या

किती कथाव्या किती वदाव्या कहाण्या प्रीतीच्या
किती स्मराव्या किती उराव्या कहाण्या मिलनाच्या

कशी सप्तरंगात प्रीत नभीची अवतरली
कळत नकळत अवनीवरती बहरली
शब्दफुलांचे हार गुंफीत आली पाचूच्या
 किती स्मराव्या किती उराव्या कहाण्या मिलनाच्या

स्पर्शात जादू... भूल पडली वेड्या मनाला 
रोमांचित सुखासीनता आली साऱ्या देहाला
किती लपाव्या किती पुसाव्या खुणा या ओठाच्या
किती स्मराव्या किती उराव्या कहाण्या मिलनाच्या

हसून रुसून प्रीत साजरी झाली चांदण्यात
नव्या पहाटेचे नवे स्वप्न रंगविले छायेत
किती पहाव्या किती साहाव्या घटना जीवनाच्या
किती स्मराव्या किती उराव्या कहाण्या मिलनाच्या

                                          -भिवा रामचंद्र परब