स्थळ : विद्याविहार सारखंच
उपनगरातील
एक रेल्वे स्टेशन.
एक नंबर प्लेटफॉर्म बाजूला
रेल्वे कार्यालयाच्या समोर मोकळी जागा.
सकाळच्या पारी येणाऱ्या-जाणाऱ्यांची तौबा गर्दी,
तो ही या गर्दीतलाच होऊन गेलेला.
लोंढ्याबरोबर नेहमीच्या शिरस्त्याने चालणारा.
खिंडकीकडे तिकिटासाठी रांग;
तोही त्याच रांगेतला एक प्रवाशी.
अचानक त्याची नजर गेली; अंग शहारलं,
एक ओली बाळंतीन विव्हळत होती.
कोनाड्यातल्या दगडमातीत, घाणीत.
चारही बाजूला घोंघावणाऱ्या माश्या;
भिकारीण,कचरा गोळा करणाऱ्यापैकीच
एक असावी ती!
ती दयेची भीक मागत होती.
तिच्या तोंडातून आवाज येत नसला तरी
आकांत करून तिचा घसा सुकलेला.
कितीवेळ झाला असेल?
पहाटेला केव्हातरी सुटका झालेली असावी.
तिच्या चारी बाजूला रक्ताचे थारोळे; सुकलेले.
एकाच नाळेने बाळ आणि आई बांधली गेलेली!
नाळ मध्येच लोंबकळत होती.
एकंदर दृश्य किळसवाणे पण
बाजूला सुंदर,नाजूक,गोरेपान बाळ
कुणीही उचलून घ्यावे असे; रक्ताळलेले,
निपचितपणे पडून होते.
जिवंत असेल का? कोण जाणे..
तो सोहळा पाहून पुरूष हळूच मान फिरवित होते.
हो, हो, सोहळाच होता तो!
स्त्री ने अर्भकाला जन्म देण्याचा सोहळा,
स्त्री साठी कृर्ताथेचा क्षण देणारा सोहळा,
स्त्री नावाला आईरूप देणारा सोहळा,
स्त्री चा आई नावाने पुनर्जन्म जणू!
पण आज हा उत्सव आनंदाचा
खचितच नव्हता.
मुत्यूपंथाला लागलेल्या स्त्रिचे नजरेने
लचके तोडू पहात होता समाज.
माणसांची गर्दी होती; गर्दीत माणूस नव्हता.
दया येऊन काहीजण तिच्या पुढ्यात
दहा-पाचच्या नोटा फेकून पुढे जात होते.
माणुसकी दाखविण्याचा तोच एक
सोपा मार्ग असावा!
बाया बापड्या नग्न लाजेने चूर होत
नजर वळवून पुढे जात राहिल्या.
त्या स्त्रिचा आक्रोश आता मंदावत चाललेला.
रेल्वेचा अधिकारी निगरगट्ट,
आपल्या दगडी केबिनमध्ये बंद.
एका भिकारिणीच्या वेदनेची किंमत ती काय?
त्याच्या दृष्टीने ती उकिरड्यावर लोळली असेल;
निसर्गानं आपलं काम चोख बजावलं इतकचं!
यात कसलं आलंय कौतूक?
प्राणी पक्षी असेच वितात;
जंगलातील झाडाझूडपात,रस्त्यावर,उकिरड्यावर.
कोण असतो त्यांच्याबरोबर?
देव, निसर्ग? छे!
त्यांच्याबरोबर असते ते त्यांचे स्वयंप्रेरित ज्ञान;
जन्मत: निसर्गाने बहाल केलेली स्वावलंबनाची दृष्टी.
मनुष्य प्राणी तर कायमचाच परावलंबी;
जन्मापासून मुत्यूपर्यत.
पण त्याच उकिरड्यावर उमललं होतं
एक छान,सुंदरसं फूल.
कोमेजून जात होते डोळ्यादेखत ..
माणुसकी, भावना, वेदना, संवेदना ही
लोपली होती.
यावेळी स्त्रिला गरज होती ती मायेची,
स्त्रिच्याच एका प्रेमळ स्पर्शाची.
पण एक आईच आज मरणासन्न होती.
‘ज्याने हे पाप केले असेल तो आपल्या घरात
निद्रिस्त असेल;
कदाचित या पापाची त्याला कल्पनाही नसेल,
पण त्याचा हा हिशोब नक्की कोठेतरी
मांडला जाईल. असं कोणीतरी म्हणालंसुध्दा!
निव्वळ भाबडेपणा! दुसरं काय?
तिच्या अंगावर कपडे असे नव्हतेच.
जे फाटके काही अंगावर होते,
त्यानी अंग झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करून
जणू स्त्रीची लाज, अब्रू ती झाकत होती,
भिकारीण का असेना, शेवटी ती एक स्त्रीच.
अचानक त्याच्या लक्षात आले;
तिकिटासाठीची रांगही आता वाढू लागली होती.
लोकांच्या बुभूक्षित नजरा थेट भिरभिरत
तिच्या देहावर स्थिरावलेल्या.
नजरांनीच त्या देहाची चिरफाड चालली होती;
श्वापदं वळवळत होती आतल्या आत.
गर्दी हेही विसरली होती,
अशाच एखाद्या स्त्रीच्या पोटी आपणही जन्म घेतला!
त्याच्या अंगात कपडे होते.
त्याक्षणी अंगातील शर्ट काढून त्या स्त्रीच्या
उघड्या देहावर वस्त्र पांघरावे वाटले त्याला;
पण क्षणभरच! त्या आड आली ती त्याची
पांढरपेशी मध्यमवर्गीय संस्कृती!
त्याने मनाचा हिय्या केला आणि खिशातला
वीतभर रूमाल तिच्याकडे फेकला.
तीला तर शुध्दच नव्हती; फक्त कण्हत होती ती!
आणि चमत्कार झाला (असं त्याला वाटले)
विणीच्या वेदना पचवलेली एक प्रौढा पुढे आली.
तिनं अंगावरची ओढणी त्या स्त्रिच्या अंगावर
पसरली हळूवारपणे, मायेने.
समोरच्या सायबाच्या केबिनचे दार धाडकन
आपटत तीनं साहेबाला खडसावले:
“क्या करे? ये तो हमारा काम नही है ना बहेनजी”
“अरे, फिर किसका काम है?”
“रेल पुलीस या पुलीस का”
“तो तू इधर क्यूँ बैठा है? तुमची मुलगी, बायको
अशी रस्त्यावर तडफडत असती तर..
काय केलं असतं?”
वेदनेचा आवेग तिलाही आवरेनासा झाला.
आणि राष्ट्रीयभाषेवरून ती मातृभाषेवर आली.
हा आपलेपणाचा घाव मात्र वर्मी लागला.
शेवटी तोही माणूसच!
बाहेर बघ्याबरोबरच आता बायकांही गोतावळा
जमू लागला; कालवाकालवी वाढली.
पंधरा मिनिटात सुत्रे हालली.
इस्पितळाच्या वाहनातून आई आणि बाळ
पुढच्या प्रवासाला निघाले.
तो प्रवास कसा झाला असेल ते मला
तरी एक अज्ञातच!
ते बाळ जिवंत असेल तर,
काय लिहील सटवी त्याच्या ललाटलेखात?
आईसारखंच बेवारसपण, रस्त्यावरचा भिकारी
की सुशिक्षित समाजाचा एक घटक?
००००
नजरेआड अशा कितीतरी घटना घडतात;
त्याचा ना हिशोब; ना ताळेबंद!
पण समोर जेव्हा घडतं तेव्हा,
ज्याची सद्विेवेक बुध्दी शाबूत आहे,
असा एखादा कळळवळतो;
मायेने,स्त्री वेदनेच्या जाणिवेनं एखादी धावत येते;
ती खूण असते खऱ्या माणुसकीची!
तो माणूस असतो तुमच्या-आमच्यात.
अशाच माणसांनी सुजाण समाज घडत असतो.
पण तत्क्षणी एक विचार मनात तरळून गेला.
ती भिकारीण असो, नाही तर स्वत:ला सभ्य
समाजातील म्हण़विणारी कुणी स्त्री,
आईच्या आधी ती स्त्रीच असते,
आपल्या देहाचा आपल्या वेदनांचा असा
बाजार तिलाही नको असतो,
पण वेदनांचा कळस ती निमूटपणे सहन करते;
अतोनात कष्ट करते केवळ आपल्या बाळासाठी!
याच समाजाचा घटक बनलेला हा बाळ
कितपत जाणीव ठेवतो या सर्वाची?
तो सतत सानिध्यातच असतो स्त्रिच्या.
ती स्त्री एकतर आई असते नाहीतर बायको.
बायको घरात आली कि सुटला जातो आई
नावाच्या स्त्रिचा हात आपोआप
आणि सुरू होतात तिच्या आयुष्याचे दशावतार.
पैलतीराकडे डोळे लावलेली स्त्री शेवटी सख्ख्या
पोराच्या मायेलाही परकी होते.
अर्थात याला अपवाद असतीलही,
०००
हे सारं पाहिल्यावर वाटलं,
अर्भकाचा जन्म होताचक्षणी पाचव्या दिवशी
सटवीनं एक करायला हवं;
आईची जाणीव राहील अशी भळभळणारी एक वेदना
त्याच्या ललाटी लिहायला हवी जन्मभरासाठी,
मातेचे महन्मंगल स्तोत्र हाच त्यावर जालीम उपाय असेल!
०००००
-भिवा रामचंद्र परब